वालचंद डायरीज् – भाग १९


वालचंद डायरीज् भाग १९
Efficycle ची नव्याने सुरुवात
      विभागामधील बदललेलं वातावरण, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मुलांनी वेळ वाया घालवू नये अशा मताचे शिक्षक, त्यामुळे मुलांमध्ये पसरलेला निरुत्साह आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा यांच्याकडे वाढलेला ओढा  अशा सगळ्या कारणांमुळे Baja आणि efficycle मध्ये सहभागी व्हायची परंपरा २०१४ -१५ या वर्षात खंडीत झाली. पण निखारा पूर्णपणे विझलेला नव्हता. थोडी धुगधुगी शिल्लक होती. सुरुवातीपासूनच आधीच्या टीमने पुढची टीम तयार करायची, त्यासाठी जुनियरना प्रेरित करायचं, त्यांची निवड करायची अशी पद्धत पडलेली होती. टीमने मिळवलेले बक्षीस पुढची टीम तयार होण्यासाठी जास्त उपयोगी पडायचे. मार्च-एप्रिल २०१५ मध्ये कोणीतरी या धुगधुगी शिल्लक असलेल्या निखाऱ्यावर फुंकर घातली, नेमकी कुणी हे  माहिती नाही पण माझेच कोणीतरी सहकारी शिक्षक असावेत. त्यावेळी second year पूर्ण करून third year मध्ये जाणाऱ्या वर्गात मग थोडा उत्साह आला. अंतिम वर्षातले कोणी फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे third year मधल्या विद्यार्थ्यांची टीम  बनायला लागली. फक्त third year मधल्या मुलांना जमेल का अशी शंका माझ्या मनात होती. पण आता पेटलेला निखारा विझू द्यायचा नव्हता. त्याच वेळी अंतिम वर्षातले दोन जण भेटायला आले. पुरेसे उत्साही होते. त्यांना आधीची दोन वर्षं शिकवलेलं असल्यामुळे माहितीचे होते. मग ते दोघं आणि तिसऱ्या वर्षातले आठ जण अशी टीम तयार झाली.
स्पर्धा दरवर्षी अधिकाधिक कठीण होत होती. सायकल डिझाईन करायला जास्तीत जास्त अवघड होईल असे बदल नियमात केले जात होते. उदाहरणार्थ २०१५ च्या स्पर्धेसाठी पुढे दोन चाकं आणि मागे एक चाक अशी रचना कंपल्सरी होती. तसेच दरवर्षी एका थीमला प्राधान्य दिलं जात होतं. २०१५ ला कमीत कमी वजन ह्याला प्राधान्य होतं. एका वर्षाचा खंड पडल्यामुळे  टीममध्ये अनुभवी कोणी नव्हतं आणि स्पर्धा जास्ती कठीण होऊ लागली होती. वालचंदकडे बघून आता आजूबाजूच्या कॉलेजमधून पण अशा स्पर्धांमध्ये सहभाग वाढायला लागला होता. त्यामुळे चार टीमच्या सायकल एकत्र करून एका मोठ्या टेम्पो मधून स्पर्धा ठिकाणा पर्यंत पाठवता येणार होत्या.
स्पर्धेचे ठिकाण चंदीगड मधून बदलून जालंदर च्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये गेलं होतं. प्रवासातल्या अडचणी लक्षात घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी किमान २४ तास आधी पोहोचायचं नियोजन करायला सुरुवात केलेली होती. मुलं पोहोचली. आम्ही दोन दिवसांनी प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी पोहोचणार होतो. टेम्पोही वेळेपूर्वी पोहोचला. सायकल उतरवताना लक्षात आलं की प्रवासादरम्यान आदळून आदळून सायकलला बऱ्यापैकी इजा पोहोचलेली आहे. LPU पासून जालंदर दहा-बारा किलोमीटर. तिथली दुकानं शोधून, योग्य ते पार्टस आणून एका दिवसात सगळ्यांनी मिळून सायकल दुरुस्त केली. पण मागच्या बाजूला वापरलेले विशिष्ट चाक तिथे मिळेना. सांगलीमध्ये टीम मध्ये नसलेल्या दोघांनी ते विकत आणलं आणि दुसऱ्या दिवशी जाताना मी विमानातून ते घेऊन गेलो. 
या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केल्यावर आणखीन एक केलं होतं. बनवायच्या गाडी किंवा सायकल मधला काही आव्हानात्मक भाग शेवटच्या वर्षातली मुलं प्रकल्पासाठी घेत होती. यावेळी पण एका गटाने सायकलच्या ट्रान्समिशन डिझाईनवर प्रकल्प केलेला होता. त्यानुसार नवीन इलेक्ट्रिक मोटर विकत घेतलेली होती. पण महागडी लिथियम आयन बॅटरी घ्यायला जमले नाही. ते काम २०१६ मध्ये केले. अशी दरवर्षी टप्प्याटप्प्याने प्रगती करत होतो.
स्पर्धा छान पार पडली. शेवटच्या रेस दरम्यान steering joint तुटला. पण फक्त पाच ,दहा मिनिटात वेल्डिंग करून सायकल परत पळायला लागली होती. शर्यत संपली आणि एकदम ज्या ज्या संघांनी स्पर्धा पूर्ण केली होती त्यांच्या सायकली संयोजकांनी ताब्यात घेतल्या. प्रत्येक सायकलची कसून तपासणी केली. आमच्या इलेक्ट्रिक मोटर बद्दल त्यांना संशय आला. त्यामुळे परत सगळी तपासणी झाली. काय झालं कळत नव्हतं. बक्षीस मिळणार नाही म्हणून हताश झालेला एक जण थोडा चिडून मला म्हणाला, “ सर, बाकी टीम सगळे नियम पाळत नाहीत. इथेही त्यांना अडवले जात नाही. तुम्ही सगळे नियम पाळायला लावता. त्यामुळे सायकल जड होते. पळत नाही आणि मग बक्षीस मिळत नाही.मी काहीच बोललो नाही. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुरू होणार होता.
यावेळी स्पर्धेसाठी कॉलेज कडून परवानगी मागताना आणि विशेषतः TEQIP च्या ग्रांट मधून पैसे मागताना बराच वाद झाला होता. काही लोकांच्या पोटात दुखत होतं. मग फक्त १० मुलांसाठी एक लक्ष रुपये कसे खर्च करणार वगैरे मुद्दे आले... दुसरे कोणी मागत असतील तर त्यांना द्या पण बाकी कोणी मागत नसतील तर ज्या मुलांनी मागितले आहेत त्यांना दिले पाहिजेत अशी आम्ही भूमिका घेतली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये काही लोक टीमला बक्षीस मिळू नये म्हणून देव पाण्यात घालून बसले होते.( इथे कदाचित काहींना माझ्या सडेतोड लिखाणाचा राग येईल,पण इलाज नाही. जे घडले तेच मी लिहितोय.)
बक्षीस समारंभ चालू झाला. ज्या एका टीमने अनेक ठिकाणी चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि शेवटची रेस पण जिंकली होती त्यांचं नाव घेतले जात नव्हतं. आमची आणि त्यांची इलेक्ट्रिक मोटर सारखी दिसणारी होती आणि त्यावर संशय पण घेतला गेला होता. मग काय.. संपलंचं की! एकेक बक्षीसं देत खूप आदराचं मानलं जाणारं बेस्ट डिझाईनचे बक्षीस जाहीर करायची वेळ आली. बक्षीस जाहीर करणाऱ्यानं उत्सुकता ताणण्यासाठी “Its team from Maharsahtra” असं  सांगितलं तरी आम्हाला वाटलं की COEP किंवा पुण्यातल्या कुठलं तरी कॉलेज असेल. पण नाही टीम आर्यन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग सांगलीहे शब्द कानावर पडले. मग त्या भल्यामोठ्या ऑडिटोरियम मध्ये मागे कुठेतरी बसलेल्या आमच्या टीम मधले सगळे पळत स्टेजवर. मजा आली. काही देवांना आता पाण्यातच राहावं लागणार होतं. बाहेर आल्यावर मघाशी चिडून बोलणाऱ्या त्या विद्यार्थ्याला म्हटलं, “काय मित्रा, आता काय म्हणतोस?” हाच मुलगा पुढे खूप चांगला मित्र झाला. आजही आहे. कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरी मिळाली नाही तरी स्वतःच्या हिमतीवर बाहेरून त्या तोडीची नोकरी मिळवताना efficycle मधल्या अनुभवाचा उपयोग झाल्याचं  अजूनही सांगत असतो. २०१६ च्या सप्टेंबर मध्ये भेटायला आला होता. सर, सगळे नियम पाळून पहिल्या पगारातून तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे.आजही रोज सकाळी त्याने दिलेल्या कॉफी मग मधून कॉफी पिताना मला हे सगळे प्रसंग आठवतात.
२०१५ मध्ये efficycle ला पुन्हा सुरुवात झाली. आज अखेर त्यात खंड पडलेला नाही. अडचणी येत होत्या पण त्यावर मात करायची शक्ती पण मिळत होती. त्याच दरम्यान Efficarनावाची आणखीन एक स्पर्धा सुरू झाली. यात BTechबरोबरच MTechकरणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला परवानगी होती. जानेवारी 2016 मध्ये चंदीगडला ही स्पर्धा झाली. ठरवून ठेवलेल्या टेम्पोला दोन दिवस आधी अपघात झाला. त्यावेळी जाधव सरांचे ओळखीतून दुसरा टेम्पो मिळाला. टेम्पो चालक आणि मालक श्री राजू बिराजदार यांच्याशी चांगलाच स्नेह जुळला. त्यानंतरच्या कित्येक  स्पर्धांच्या वेळी राजूकडे गाडी सोपवली की आम्ही निर्धास्त असायचो.  टीममधले सदस्य असल्यासारखा त्यांचा सहभाग असायचा. ह्या Efficarस्पर्धेतही टीमला बेस्ट डिझाईनचे बक्षीस मिळाले. वर्गात machine design शिकवणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकाला अजून काय पाहिजे. या सायकल design करतानाचे अनेक किस्से त्याच्या technical बाजू सकट वर्गात सांगत होतो. त्यालाच management मधे case study म्हणतात हे नंतर कळले!
      या सगळ्या स्पर्धांसाठी बराच मोठा खर्च यायचा त्यातला मोठा भार कॉलेजच्या TEQIP च्या grant मधून मिळायचा. पण त्यासाठी आवश्यक प्रस्ताव लिहिणे, तो सादर करणे, ऑफिस ऑर्डर काढून घेणे, हिशोब ठेवणे, पावत्या जमा करणे हा बराच मोठा उपद्व्याप असायचा. विद्यार्थ्यांचे आणि माझेही चांगले प्रशिक्षण होत गेले. प्रत्येक स्पर्धेचा हिशोब खूप काटेकोर ठेवला पाहिजे यावर माझा कटाक्ष असायचा. त्यासाठी एक्सेल मध्ये केलेला format खूप उपयोगी पडत होता. आजही कुठल्याही स्पर्धेमधलं हिशोबासंबंधित काहीही विचारलं तरी मी संगणक बघून काही मिनिटात उत्तर देऊ शकतो. अर्थात टीममधल्या हिशोब ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण त्यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत.
२०१६ चे efficycle स्पर्धेवेळी नेमकी NBAची कमिटी कॉलेजमध्ये यायची होती. मी खुपदा विचारुनही संचालकांनी परवानगी दिली नाही. अन्य कोणीही जाऊ शकले नाही. त्यामुळे आजही त्या टीममधले विद्यार्थी थोडे चिडून आहेत. तुम्ही आला असतात तर बक्षीस मिळालं असतंयाला काय उत्तर देणार. पण बरोबर कोणी शिक्षक नसताना घेतलेला स्पर्धेचा अनुभव, गट म्हणून केलेली सगळी धडपड त्यांना जास्ती उपयोगी पडेल हे नक्की. त्यानंतर थोड्याच दिवसांनी Efficarची दुसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी गोष्ट झाली. पहिल्यांदाच किंवा खरंतर आत्तापर्यंत एकदाच, एका मुलीनं ड्रायव्हरचं काम केलं. पण  त्यावेळी प्रत्येक ठिकाणी टीमचा परफॉर्मन्स उत्तम होऊनही एकही बक्षीस मिळाले नाही. आम्हालाच नाही तर इतर टीमना पण ह्याचे आश्चर्य वाटत राहिले. पंजाब मधल्याच संघांना बक्षीस देण्याचा प्रकार नंतर लक्षात आला. मग संयोजकांकडे यासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हे सगळं सुरु असताना विभागामधून होणारा त्रास , अडवाअडवी, विरोध हे सगळं सुरु होतंच. पण ते सगळ्यांनाच सरावाचं झालं होतं. उशिरापर्यंत workshop मधे काम करायला परवानगी न देणे हे सगळ्यात त्रासदायक. एक दोन वेळा तर कॉलेजचं workshop असताना बाहेर काही काम करावं लागलं. २०१४ मधेच कॉलेजने AICTE कडे एक प्रस्ताव पाठवलेला होता. “Learning Factory”, म्हणजे नीती आयोगच्या Atal Tinkering Lab किवा Makers space च्या धर्तीवर,  प्रयोगशाळा उभी करण्याचा हा प्रस्ताव होता. २०१६ पर्यंत तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. मग कॉलेजने स्वतःच अशी प्रयोगशाळा उभी करण्याचं ठरवलं आणि अचानकपणे त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. कमीतकमी खर्चात पण विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी प्रयोगशाळा उभी करायची होती. जागा शोधली, ताब्यात घेतली, किरकोळ दुरुस्ती आणि light ची व्यवस्था करून घेतली. कुठलीही साधनं नव्हती. पण टीम मधल्या विद्यार्थ्यांना हक्काची जागा झाली. सुदैवाने २०१७ मधे AICTE कडून ४३ लक्ष रुपयांना मंजुरी मिळाली. मग 3d printer सारखी सुविधा पण उपलब्ध झाली.  
२०१७ चं efficycle वेगळा अनुभव देणारं ठरलं. नेहमीप्रमाणे २०१६ च्या टीमने पुढची टीम निवडली. टीम कामाला लागली. मे महिन्यापासून अखंड काम चालू होतं. ह्यावेळ पर्यंत हळूहळू बदल होत सगळी टीम तिसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांची झालेली होती. या टीमने एक अनोखा पण फार चांगला उद्योग केला. प्रकल्पासाठी आर्थिक मदत मागणारा प्रस्ताव त्यांनी काँलेजच्या माजी विद्यार्थ्यांना फेसबुक, ईमेल या माध्यमातून पाठवला. १९७७ ते १९८१ च्या बँचमधील माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि  मोठी रक्कम त्यातून उभी राहिली.  माझ्याबरोबर दुसरे faculty advisor म्हणून electrical department चे प्रमुख असलेले डॉ. मोरे सर सहभागी झालेले होते. मग तिथून पुढे सगळे प्रस्ताव, बीलं इत्यादी कागद HoD, Electrical ह्यांचे मार्फत पुढे जायला लागले. mechanicalविभागाकडून होणाऱ्या त्रासाला असा वळसा दिला गेला.  अर्थात मोरे सरांचं अन्य तांत्रिक मार्गदर्शन पण महत्त्वाचं होतंच. आमच्या विभाग प्रमुखांनी ह्यावरून बराच गोंधळ करायचा प्रयत्न केला. पण Multi-disciplinary project असल्यामुळे कुठल्याही एका विभाग प्रमुखांची सही पुरेशी ठरत होती. मग विद्यार्थ्यांना त्रास द्यायचे प्रयत्न सुरु झाले. टीम म्हणून हा त्रासही सगळे आनंदाने झेलत होते. एका विद्यार्थ्याने ह्या सगळ्या प्रकाराला “work hardening” असे नाव दिले होते. (तांबे किंवा पितळ्याला मजबुती येण्यासाठी ठोके देतात ना)! एकदा तर workshop मधे काम करणाऱ्या एका सहशिक्षकावर दबाव टाकून  माझ्या विरुद्ध खोटी तक्रार द्यायला लावली गेली. अर्थात मी पण एव्हानी तयारझालेलो होतो!!
तर efficycle २०१७. स्पर्धेच्या खूप आधी सायकल तयार होती. २०१५ मधे १७६ किलोअसणारी  आमची सायकल २०१६ मधे १४५ किलोची झाली तर २०१७ मधे वजन १०४ किलो भरलं. सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टीचा काटेकोर विचार केला गेला होता. तरी १०० किलोचं उद्दिष्ट गाठायला जमलं नाही (ते २०१८ मधे पूर्ण झाले). प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी पण Saftey checking, brake test, electric test, असं सगळं खूप भराभर पूर्ण होत गेलं. ह्यावेळी नव्याने सुरु केलेल्या electric drive excellence test मधे ती सायकल ज्या प्रकारे चालवली, पळवली, वळवली ते बघून सगळेच आश्चर्य चकित झालेले. ह्या टीमने इतर अनेक संघाना खूप मदत केली. अनेक नवीन संघ त्यामुळे अंतिम स्पर्धेमध्ये पोचू शकले. देशभरातल्या अनेक प्राध्यापकांची ह्या निमित्ताने ओळख झाली. विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यामुळे मी “Best faculty advisor” साठी मुलाखत दिली. गप्पांच्या स्वरूपात झालेली ही मुलाखत खूपच छान झाली होती. शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून काय आणि कसं काम केलं आणि किती सातत्यानं काम केलं हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा होती. एकंदर स्पर्धेविषयी माझी मत मांडायला चांगली संधी मिळाली. स्पर्धा उत्तम पार पडली. टीमचा नंबर ४४ होता आणि बक्षीस समारंभात ४ वेळा व्यासपीठावर जायची संधी मिळाली. मलाही “Best faculty advisor” साठीचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. गंमत म्हणजे ४ बक्षीसं मिळूनही टीम आनंदी नव्हती. एकुणात तिसऱ्या नंबरचं बक्षीस फक्त ७ गुणांनी हुकल्याचं दुःख जास्ती होतं.
२०१७ मधे ४ बक्षिसं मिळाली आणि २०१८ मधे एक पण नाही. त्याने काहीच फरक पडला नाही. त्या त्या वेळी तात्पुरता आनंद किंवा दुःख झालं, नाही झालं असं नाही. पण सहभागी विद्यार्थ्यांचं झालेलं अनुभव शिक्षण त्याच तोलामोलाच होतं. राष्ट्रीय पातळीवर आपला कस तपासून बघायला मिळाला. इतर विद्यार्थी काय काय करतात हे पाहायला मिळालं. आपल्यातल्या उणीवा समजल्या. कॉलेजमधल्या उर्वरित एक वर्षामध्ये त्यावर काम करायला वेळाही उपलब्ध आहेच.
कॉलेजचा विचार केला तर विद्यार्थ्यांनी अशा अनेकानेक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, त्यातून वेगवेगळे अनुभव घ्यावेत, त्या आधारावर स्वतःमधल्या engineer ला अजून पैलू पाडावेत हे खूप गरजेचं आहे. भविष्यातही अशी परंपरा चालू रहावी हे सदिच्छा!
                                                           अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem