वालचंद डायरीज् – भाग १८
वालचंद डायरीज् – भाग १८
Efficycle ची सुरुवात
जानेवारी २०११ मध्ये पहिले Baja झालं. टीमला बक्षीस नाही
मिळालं पण कॉलेजमध्ये त्याची पुरेशी हवा झाली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून
मिळालेले अनुभव इतके विलक्षण होते की लगेचच पुढची टीम तयार व्हायला लागली. पहिली टीम
तयार होताना २५ जण मिळतील का अशी शंका होती तर आता कोण २५ निवडायचे असा प्रश्न पडला. आधीचा अनुभव,
तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य अशा काही कसोट्या लावून २५ जणांची टीम
तयार झाली. पुढचा वादाचा मुद्दा आला की संघाचा कप्तान कोण? पहिली
टीम तयार होताना असा काही वाद झालाच नव्हता. किंवा झाला असला तरी आमच्या पर्यंत
आलेला नव्हता. (नंतरही २०१९ पर्यंत जवळ जवळ वीस टीमबरोबर अशा वेगवेगळ्या
स्पर्धांसाठी काम केलं पण कप्तान पदावरून कधीच वाद झाला नाही.) यावेळी कप्तान
व्हायला दोघे उत्सुक होते. दोघेही तुल्यबळ होते. जवळजवळ आठ दिवस यावर चर्चा,
भांडणं चालू होती. निर्णय घेणं आम्हाला दोघांनाही अवघड वाटत होतं.
शेवटी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला आणि एकाचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं. पण
लगेच दुसरा इच्छुक उमेदवार आणि त्याच्या बरोबर आणखीन दोन तीन लोकांनी संघातून
बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांमध्ये इतकं टोकाचं राजकारण किंवा
गटबाजी बघून त्या दिवशी मी खूप उदास झालो होतो.
पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच! दुसऱ्या दिवशी हेच तीन चार जण
भेटायला आले तो एक नवा प्रस्ताव घेऊनच. त्याच्या आदल्या वर्षीच SAE च्या उत्तर भारत विभागाने एक स्पर्धा सुरू केलेली होती. Efficycle.स्पर्धेचे स्वरूप साधारण Baja सारखंच . पण तयार
करायचं वाहन वेगळं, म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर अधिक
आव्हानात्मक. एकावेळी दोघे बसू शकतील आणि चालवू शकतील आणि त्याशिवाय इलेक्ट्रिक
मोटरच्या साह्याने पण चालू शकेल अशी तीन चाके असलेली सायकल डिझाईन करून बनवायची- Hybrid
Electric Tandom Tricycle! टीम ८ च विद्यार्थ्यांची. तर ह्या
स्पर्धेत भाग घ्यायचा प्रस्ताव घेऊन ही मंडळी आली होती. हो म्हणण्याशिवाय पर्याय
नव्हता आणि खरंतर मला राहवलंही नाही. विद्यार्थ्यांमधल्या भांडणं, गटबाजी, किंवा राजकारणाचं हे पॉझिटिव्ह रूप! यातून Efficycle
नावाच्या नवीन पर्वाचा प्रारंभ झाला.
स्पर्धेचे स्वरूप आणि संरचना Baja सारखेच
असल्याकारणाने थोडा अनुभव गाठीशी होता. पण स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होत असल्याने वेळ
कमी होता. टीममध्ये इलेक्ट्रिकल मधल्या
एका विद्यार्थ्याचाही समावेश झाला होता. स्पर्धेचा आवाका थोडा छोटा
असल्यामुळे म्हणा किंवा वेळ आणि पैसे वाचावेत म्हणून म्हणा काही चांगले बदल केले
होते. पहिली फेरी, म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक टीमने आपले
डिझाईन प्रेझेंट करायचे असते ती फेरी, ऑनलाइन होणार होती.
स्मार्टफोन, 4जी इंटरनेट कनेक्शन असं काही नसताना उचललेले हे
पाऊल क्रांतिकारी म्हणावे लागेल. प्रत्येक टीमने आपलं प्रेझेंटेशन ई-मेल करून
संयोजकांना पाठवायचं. प्रत्येक टीमला ठरावीक वेळ (time slot) दिलेला होता. त्यावेळी पूर्ण टीमने एकत्र येऊन फोन वरून आपलं डिझाईन
प्रेझेंट करायचं. आधी पाठवलेलं प्रेझेंटेशन समितीसमोर असणार होतंच. समोरचा श्रोता
दिसत नसताना प्रेझेंटेशन द्यायचं, प्रश्नांची उत्तरे द्यायची
हे वेगळं आव्हान अन् अनुभव होता. (आजही zoom आणि google
meet च्या जमान्यात ते फार सुखावह नाहीये). पण या संघाकडे
उत्साहाबरोबरच खुन्नस मधून आलेली जिद्द पण होती. योग्य जागा, पुरेसा मोठा आवाज असणाऱ्या स्पीकर फोन याची जुळवाजुळव झाली. टेलिफोनिक
प्रेझेन्टेशन सुद्धा छान पार पडलं आणि दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली.
या प्रकल्पाची एक गंमत होती. बघणाऱ्याला किंवा ऐकणार्याला वाटायचं की काय
साधी सायकल तर बनवायची आहे ना, सोपं आहे की. पण सोपं काहीच
नसतं. यामध्ये पण खूप तांत्रिक आव्हाने होती. तीन चाकाची रचना कशी, दोन चालक शेजारी शेजारी असावेत की पुढे मागे, मोटर
कुठली वापरायची, मोटार कडून चाकापर्यंत power
transmit कशी करायची असे अनेक प्रश्न होते. त्यावेळेपर्यंत यो-बाईक
सारख्या इलेक्ट्रिक दुचाकी पण मोठ्या प्रमाणात बाजारात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे
बॅटरीची क्षमता, मोटरची क्षमता व प्रकार, त्यासाठी लागणारे circuit याविषयी फारशी माहिती
कोणाकडेच नव्हती.
अतिशय साधी वाटणारी, नेहमीच्या सायकल सारखी चालवायला
सोपी, पुढेमागे बसणारे दोन चालक पुढे एक चाक आणि मागे दोन
चाके असं साधं सोपं डिझाईन तयार झालेलं होतं. प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग करताना
अडचणी येत गेल्या. सगळे मिळून त्या सोडवत गेलो. फक्त पॅडल मारून चालणारी सायकल
त्या मनाने पटकन तयार झाली. इलेक्ट्रिकलच्या भागानी मात्र चांगलं दमवलं.
प्रत्यक्ष स्पर्धा होती
चंदीगडला. मुंबईमध्ये रेल्वे बदलून प्रवास करायला लागणार होता. हे एक वेळ ठीक होतं पण बनवलेली सायकल न्यायची कशी
हा मोठा प्रश्न होता. स्वतंत्र टेम्पो मधून नेणे शक्य होतं पण खूप जास्त खर्चिक
होतं. रेल्वेमधून नेणं हे सगळ्यात स्वस्त होतं पण त्यात बनवलेली सायकल सुरक्षित
(मोडतोड यादृष्टीने) राहील का हा प्रश्न होता. मग त्यावर पण तोडगा काढला. बनवलेली
सगळी सायकल परत सुट्टी करायची. सगळे सुट्टे भाग bag किंवा
बॉक्स इत्यादी मध्ये भरून रेल्वेतून बरोबर
न्यायचे. फक्त सांगाडा luggage कंपार्टमेंटमध्ये द्यायचा.
चंदीगड मध्ये जाऊन स्पर्धेपूर्वी सगळी सायकल परत जोडायची. मार्ग मिळाला पण
मुंबईमध्ये गाडी बदलायची होती. सांगलीहुन जाणारी गाडी दादर किंवा सीएसटीला जाणार
तर चंदीगडची गाडी बांद्रा टर्मिनस वरून सुटणार. सीएसटी ते बांद्रा प्रवास कसा
करणार तो सांगाडा घेऊन? पण दोन गाड्यांमध्ये सहा तास वेळ
असल्याने काहीतरी मार्ग निघेल असा विश्वास होता.
स्पर्धेसाठी निघायच्या आधी दोन दिवस वेगळीच समस्या समोर आली. टीममध्ये दोन
विद्यार्थिनी होत्या आणि कॉलेजच्या नियमानुसार बरोबर कुणीतरी महिला शिक्षिका जाणे
आवश्यक होते. हा नियम आम्हाला माहीतच नव्हता. मेकॅनिकल विभागात कोणीच महिला
प्राध्यापिका नव्हत्या आणि इतर विभागांमध्ये कोणी जायला तयार होणं शक्य नव्हतं. मग
विद्यार्थिनी सोडून इतर सगळ्यांनी जायचं... हे तर खूपच अन्यायकारक. एक तोडगा
निघाला की कोणी महिला पालक (शक्यतो मुलींपैकी) बरोबर असाव्यात. पण इतक्या
आयत्यावेळी नऊ-दहा दिवसांसाठी जायला कोण तयार होणार? शेवटी एका
विद्यार्थ्यांची मोठी बहीण तयार झाली.
विभाग स्तरावर ही समस्या सोडवली. पण तिकडे मा. संचालकांचे म्हणणे वेगळेच. आठ
मुलांच्या संघासाठी दोन तर सोडाच पण एका शिक्षकांनी सुद्धा आठ-दहा दिवस
कॉलेजमधले नियमित कामकाज सोडून जायची गरज
नाही. विषय संपला. विनंती, चर्चा, वाद
हे सगळं करूनही परवानगी मिळाली नाहीच. शेवटी फक्त टीमने स्पर्धेला जायचं ठरलं. सहज
विचार करा. छोट्या गावांमधून आलेले विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेर
कधी फारसा प्रवास केलेला नाही, मुंबई पण पाहिली नाही. आणि
आता एकदम गाडी बदलून एवढं सगळं समान घेऊन एकदम चंडीगडला जाणार, ते ही राष्ट्रीयस्तरावरच्या स्पर्धेसाठी. एकंदर स्पर्धेपर्यंत पोचणे हीच
मोठी स्पर्धा होती.
सायकलचे dismantling, पॅकिंग, लेबलिंग,
सगळ्यांचे वैयक्तिक सामानाचे पॅकिंग असं सगळं झालं. मिरजेला जाऊन luggage बुकिंग झालं. प्रत्यक्ष luggage च्या डब्यात सायकलचा
सांगाडा नेऊन ठेवला. मुलांना शुभेच्छा देऊन आम्ही दोघं परत आलो. सगळे सुखरुप
चंदीगडला पोचू देत अशी प्रार्थना करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं. पण
निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. त्या रात्री प्रचंड पाऊस पडला. कधी नव्हे ते
सासवड-जेजुरी त्या टप्प्यात रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे गाडी थांबली. पुढे परत
बदलापूर-अंबरनाथला रूळ पाण्याखाली. सकाळी सहा वाजता सीएसटीला पोचणारी आणि सहसा लेट
न होणारी महालक्ष्मी एक्सप्रेस त्या दिवशी अकरा वाजता कल्याणला पोचली.
चंदिगडसाठीची पश्चिम एक्स्प्रेस बारा वाजता बांद्रा टर्मिनस वरून सुटणार होती.
काहीही झालं तरी ती गाडी पकडायला पाहिजे होती. कल्याणला उतरून टॅक्सीने बोरिवलीला
जाऊन गाडी पकडता येईल असा अंदाज होता. दोन टॅक्सीवाले तयार झाले. पण रेल्वेचे नियम
आडवे आले. सीएसटी साठी नोंदवलेलं luggage कल्याणला बाहेर
काढायला नकार दिला गेला. पण ज्यासाठी आधीचे सहा-सात महिने काम केलंय ही स्पर्धा
अशी सहजासहजी सोडून तर द्यायची नव्हती. मग मुलांनी अजब निर्णय घेतला. बाकी संघाने
सगळं सामान घेऊन बोरवलीला जाऊन गाडी पकडायची आणि दोघांनी मागे थांबून सीएसटीला
जाऊन सांगाडा ताब्यात घ्यायचा. सुदैवानं पश्चिम एक्सप्रेस पण उशिरा निघाली
त्यामुळे बोरिवलीला सगळ्यांनी गाडी पकडली. मागे राहिलेल्या दोघांचं काय? दुपारी चार वाजतामहालक्ष्मी
रेल्वे सीएसटीला पोचली. पुढे काय? दोघजण रेल्वे
अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. नेमकं काय बोलले त्यांचे त्यांनाच ठाऊक पण संध्याकाळी
सात वाजता सुटणाऱ्या पंजाब मेल मध्ये दोन तिकीटं आणि लगेच बुकिंग मिळालं. दुसऱ्या
दिवशी संध्याकाळी ते दोघे दिल्लीला उतरले. सांगाडा घेऊन आयएसबीटी (इंटरस्टेट बस
टर्मिनस) ला गेले. चंदिगडला जाणाऱ्या बसच्या टपावर सांगाडा चढवला. सकाळी चंदिगड..
नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी सायकलसह पोहोचायचं होतं. एकीकडून हे दोघे सांगाडा
घेऊन आणि दुसरीकडून आदल्या दिवशी पोहोचलेले बाकी सगळे अन्य साहित्य घेऊन असे बरोबर
नऊ वाजता पोचले. तिथून पुढे स्पर्धेत भाग घेणं खूप सोप्प वाटलं असणार सगळ्यांना!
इकडे मुंबईमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगायला संचालकांकडे गेलो. म्हटलं आता
तरी जायची परवानगी द्या. यावेळी आम्ही जिंकलो. सरांनी एकदम विमान प्रवासाची
परवानगी दिली पण एकसाठीच. दोघांनाही जायचं होतं. मग चक्क toss केला. माझा नंबर लागला. रात्रीच्या बसने मुंबई आणि लगेच
सकाळच्या विमानानी चंदिगड असं ठरलं. तोपर्यंत कधी विमानाचे तिकीट काढायची पण वेळ
आली नव्हती.( टाटामधे असताना जर्मनीला जाऊन आलेलो पण विमान तिकिट हा विषयच नव्हता
तेंव्हा) नवे नवे अनुभव. रात्री बसने निघालो. पहाटे ठाण्याजवळ बस बंद पडली.
प्रवासातल्या अडचणी सुरू होत्या तर. सुदैवानं दुसरी बस मिळाली आणि वेळेत एअरपोर्टला
पोहोचलो. विमान प्रवास सुरळीत झाला. दुपारी बारा वाजता स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो. सकाळी ९ ते १२ मध्ये सायकल पूर्ण
तयार करून टीम तयार होती. वा! This
is Walchand spirit !!!
स्पर्धा सुरू झाली. सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच एका टेस्टमध्ये बॅटरी
जवळ स्पार्किंग झालं. आता काय?? पण त्या स्पार्क पेक्षा
मुलांच्या डोक्यातला स्पार्क मोठा होता. तासाभरात दुरुस्ती झाली. स्पर्धेच्या
शेवटच्या टप्प्यात दीड तासाची शर्यत होणार होती. म्हणजे सलग दीड तास सायकल
चालवणारे चालक पाहिजेत. संघ निवडताना त्याचा विचार केला होता आणि निवडलेल्या
दोघांनी सराव पण केला होता. पण त्यातल्या
एकाचा आठ दिवस आधी हात मोडला. प्लास्टरमधला हात घेऊनच तो स्पर्धेसाठी आलेला होता
पण सायकल चालवू शकणार नव्हता. बाकी गोंधळामध्ये पर्यायी ड्रायव्हर कोण हा निर्णय
झालाच नव्हता. स्पर्धा सुरू झाल्यावर कॅप्टनने जाहीर केलं की पर्यायी चालक तो
स्वतः असणार आहे. Captain leading from thefront! एकदा
नेत्यानं निर्णय जाहीर केला की मग त्यावर चर्चा नाही हा
संकेत होताच. पण खरं सांगू का सायकल चालवणे हा माझा पण प्राणप्रिय उद्योग
असल्याने इतर सगळ्यांसारखंच मला पण वाटलं
होतं की आपण चालक व्हावं. अर्थात ते शक्य नव्हतं. असो. पुढे प्रत्येकच स्पर्धेवेळी
हात शिवशिवत राहिले. पण faculty advisor पडलो ना !!
स्पर्धा उत्तम झाली.
शेवटच्या शर्यतीमध्ये एकदा किरकोळ प्रॉब्लेम झाला पण विशेष नाही. बक्षीस मिळालं
नसतं तरी वाईट वाटलं नसतं इतकं या स्पर्धेने सगळ्यांना दिलेलं होतं. त्यामुळे
बक्षीस समारंभाला आम्ही औपचारिकता म्हणून बसलो होतो. पण काय आश्चर्य. Fastest acceleration आणि एकुणात तिसरा क्रमांक अशी दोन बक्षिसे
मिळाली. दुधात साखर!!
Baja आणि Efficycle
च्या पहिल्या स्पर्धांविषयी सविस्तर लिहिले. स्पर्धामधलं आव्हान,
त्यात भाग घेणाऱ्यांमध्ये झालेला बदल आणि त्यांना झालेला फायदा या
सगळ्यामुळे दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायची एक परंपरा तयार झाली. २०१२ मधल्या
दोन्ही स्पर्धा छान पार पडल्या. त्यावर्षी efficycle मध्ये
तीन बक्षिसे मिळाली. दोन्ही वेळा प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी इनामदार सर गेले
होते. त्यामुळे मी जास्त लिहीत नाही. एक मात्र नक्की वालचंद कॉलेज आणि टीम Aaryans
हे नाव ह्या स्पर्धांमध्ये आदराने घेतले जायला लागले. efficycleमधे तर दरवर्षी नियमात होणारे बदल हे आमची सायकल बघून, तशी सायकल परत करता येऊ नये म्हणून केले जात होते की काय अशी शंका
येण्यासारखे होते. दरवर्षी ही स्पर्धा टप्प्याटप्प्याने अवघड होते आहे आणि सगळ्याच
टीम ते आव्हान पेलत आहेत.
२०१२ च्या अखेरीस विभागामध्ये बदलाचे वारे वाहू लागले. या स्पर्धांमध्ये भाग
घेऊन काही फायदा नाही असं म्हणणाऱ्या शिक्षकांचा एक गट तयार झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा पण कमी व्हायला लागली. २०१३ मध्ये फक्त efficycle मध्ये भाग घेतला. २०१४-१५ ह्या शैक्षणिक वर्षात एकाही
स्पर्धेत भाग घेतला नाही. पण जे खरंच चांगलं असतं, विद्यार्थी
हिताचं असतं त्यांना कुठलीही शक्ती दीर्घकाळ रोखू शकत नाही. विद्यार्थी गटामधली
अंतःप्रेरणा या सगळ्या शक्तींवर मात करतेच. २०१५-१६ मध्ये efficycle, १६-१७ मध्ये Baja आणि अन्य काही स्पर्धांची नव्याने सुरुवात कशी झाली? कॉलेजमधला – विशेषतः विभागामधल्या प्रखर विरोधाला
तोंड देत, अनेक बक्षिसं मिळवत सगळ्यांनी मिळून ही परंपरा कशी
चालू ठेवली याची कथा पुढच्या दोन भागांमध्ये वाचायला आवडेल ना?
(गेल्या भागाच्या शेवटी
म्हंटल्याप्रमाणे अनेक आठवणी, किस्से, अनुभव
आहेत..पण सगळं वाचणं वाचकांना कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे ज्यांना अधिक भर
घालायची आहे ते कमेंटस् लिहून जरूर भर घालू शकतात..या परंपरेतील आणखी काही भाग
उद्याच्या भागात )
अमर परांजपे
Comments
Post a Comment