वालचंद डायरीज् – भाग १७


वालचंद डायरीज् भाग १७
BAJA– एका वेगळ्या परंपरेची सुरुवात
नोव्हेंबर किंवा डिसेंबर २००९ मधली एक सकाळ. Third year मधल्या चार-पाच विद्यार्थ्यांचा एक गट भेटायला आला. बहुधा ही सगळीच मंडळी सांगलीकर होती म्हणजे कॉलेजच्या भाषेत बोलायचं झालं तर localities. एका स्पर्धेविषयी त्यांना माहिती कळलेली होती आणि कॉलेजची टीम म्हणून त्यात भाग घ्यावा असं त्यांना वाटत होतं. त्यांनी त्यावेळी मला सांगितलेली माहिती अशी - BAJA (उच्चार बाहा ) नावाची ही स्पर्धा जगभरात अनेक देशांमध्ये होते. SAE म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअर ही संस्था/संघटना/ऑर्गनायझेशन या स्पर्धेचे आयोजन त्या-त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करते.  भारतात ही स्पर्धा सुरू होऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि दरवर्षी साधारण जानेवारी मध्ये ही स्पर्धा इंदोरला होते. पण स्पर्धा कसली? तर २५ विद्यार्थ्यांच्या टीमने मिळून एक गाडी म्हणजे All Terrain vehicel (ATV) डिझाईन करायची, कॉलेजमधे बनवायची आणि स्पर्धेच्या ठिकाणी विविध ट्रॅकवर चालवायची. वाचून खूप भारी वाटला ना? माझीही अवस्था काहीशी तशीच झाली. त्या मुलांचा पुढचा प्रस्ताव असा होता की कॉलेजची टीम तयार केल्यावर 2 मार्गदर्शक किंवा फॅकल्टी ॲडव्हायझर आवश्यक आहेत आणि मी त्यापैकी एक असावं. माझी निवड कशाच्या आधारे केली याचा विचार एकीकडे करायला लागलो. कारण त्यावेळी कॉलेजमध्ये प्रा. भिडे सर आणि प्रा. गजेंद्रगडकर सर असे दोघं ऑटोमोबाईल क्षेत्रातले दिग्गज होते. कदाचित टाटा मोटर्स मधला अनुभव माझ्याकडे होता म्हणून असेल किंवा माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या वयात त्यावेळी खूप कमी अंतर होतं म्हणून असेल असं मी गृहीत धरलं. माझ्याबरोबरच डॉ. केदार इनामदार यांच्याकडे मुलांनी मोर्चा वळवला. आम्ही दोघेही साधारण बरोबरच कॉलेजमध्ये जॉईन झालेलो होतो आणि काही बाबतीत समदुःखी  / समसुखी होतो. मग दोघांनी मिळून होकार दिला.
मुलं तर प्रचंड उत्साहात होती. आमच्या होकारामुळे त्यांची एक समस्या सुटली होती. आमचा सहभाग त्यांनी बहुदा नावापुरताच गृहित धरला होता. त्यामुळे आम्ही पण निवांत होतो. २०१० मधल्या स्पर्धेत सहभागी होणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी २०११ च्या स्पर्धेत सहभागी होण्याचे नियोजन केलेलं होतं. एकंदर ही दीर्घकाळाची शर्यत होती तर. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही प्राथमिक अटी होत्या. त्याचाच एक भाग म्हणून कॉलेजमध्ये SAE INDIA WCE Collegiate club स्थापन केला गेला. हेतू अतिशय चांगला होता की ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल उत्साही असणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन अभ्यासक्रमापलीकडे काही उपक्रम करावेत. (त्या काळातलं Placement Statistics पाहिलं तर पन्नास टक्क्यांहून अधिक मुलं ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित कंपनीमध्ये प्लेस होत होती.)  एकीकडे क्लब स्थापन करण्याच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करत असतानाच चौघेजण 2010 ची स्पर्धा बघण्यासाठी इंदूरला जाऊन आले. ही कल्पनासुद्धा मुलांचीच  बरं का! एकदा स्पर्धा प्रत्यक्ष पाहून आल्यावर त्यातली आव्हाने सुद्धा लक्षात आली आणि आपणच डिझाईन करून बनवलेली गाडी आपणच चालवू शकतो हा आत्मविश्वास वाढला.
 पुढचा महत्त्वाचा टप्पा होता २५ जणांची टीम तयार करण्याचा. आता खरा कस लागणार होता. पण आम्ही काहीही हस्तक्षेप न करता २५ नावांची यादी तयार झाली. चार-पाच जण खालच्या वर्गातले आणि बाकी सगळे तिसऱ्या वर्षातले ( म्हणजे 2011 मध्ये प्रत्यक्ष स्पर्धा होईल तेंव्हा अंतिम वर्षातले) अशी टीम तयार झाली. प्रत्यक्ष स्पर्धेसाठी टीम रजिस्ट्रेशन करण्याबरोबरच एका अनोख्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यावेळी आम्हाला कोणालाच हे माहीत नव्हतं की अनेक अडचणींनी भरलेला हा प्रवास खूप आनंददायी आणि अनुभव देणारा असणार आहे. Team Aaryans हे नाव तेंव्हापासून आजपर्यंत वालचंद मध्ये  घुमत राहिलंय.
स्पर्धेसाठी नाव दाखल केलं, उडी मारली. आता तरून पैलतीर गाठायचाच होता. सुरुवात करताना या एकंदर प्रकल्पासाठी आर्थिक अंदाजपत्रक तयार करायला हवं हे आम्हा कोणालाच लक्षात आलेलं नव्हतं. एकंदर किती खर्च येईल, ती रक्कम कोठून उभी करायची याचा काहीही  विचारच केलेला नव्हता. पहिल्या टप्प्यात फारसा खर्च नसल्याने काहीच फरक पडला नाही.
पहिला टप्पा होता Virtual Round. म्हणजे तज्ञ व्यक्तींसमोर आपले डिझाईन प्रेझेंट करायचे. तांत्रिक दृष्ट्या डिझाईन किती चांगले आहे याबरोबरच कमीत कमी वजन, कमीत कमी किंमत, तसेच वेगळेपणा ह्या गोष्टी तपासल्या जातात. अर्थात हे सगळं हळूहळू कळत गेलं.  पहिल्या वर्षी सगळंच नवखेपण होतं. संयोजकांनी दिलेल्या template नुसार प्रेझेंटेशन तयार करणे आणि तत्पूर्वी दिलेले सगळे नियम पाळून डिझाईन करणे इतकेच उद्दिष्ट होतं. जून २०१०  मध्ये दिल्ली इथे ही पहिली फेरी झाली. निकाल लागला. एकूण २०० संघांमधून  फक्त ८० संघ निवडले गेले होते. यादी बघत गेलो, बघत गेलो. तर आमचं नाव सगळ्यात शेवटी. म्हणजे आम्ही काठावर पास झालो की काय? नंतर कळलं, त्या शेवटच्या क्रमांकाला वालचंद मधला W  जबाबदार आहे!
आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची एक्साइटमेंट होती. पण अनुभव शून्य होता. स्मार्टफोनचा उदय अजून झालेला नव्हता. त्यामुळे फोटो माहिती मिळणे खूप अवघड होते. सुरुवात कुठून करायची हेच कळत नव्हतं. गाडीच्या सांगाड्याचं डिझाईन तयार होतं. पण ते बरोबर होतं का, सुरक्षित होतं का, ड्रायव्हरची जागा, steering, brake हे सगळं योग्य प्रकारे त्यात अकाउंट होणार होतं का ? इंजिन ,गिअर बॉक्स ,सस्पेन्शन योग्य प्रकारे बसणार होतं का?  अशा सगळ्या शंकांना उत्तर मिळत नव्हती. एकदा सांगाडा बनला की बदल करणं खूप अवघड होतं. पण उत्साह होता, प्रत्येक समस्येवर उत्तर काढायची इच्छा होती. कोणालातरी सुचलं की बांधकामाला वापरतात त्यातल्या एकदम छोट्या सळ्या आणून एक कच्चा सांगाडा करुन पाहिला तर. तोपर्यंत इंजिन, टायर वगैरेची ऑर्डर देऊन झालेली होती. त्यामुळे खर्च-जमा यांचा विचार सुरू झाला होता. प्रत्येक गोष्ट कमीत कमी खर्चात कशी होईल हा विचार आपोआप व्हायचा. कॉलेजमध्ये कुठेतरी बांधकाम चालू होतं तिथून तात्पुरत्या सळ्या आणल्या. कच्चा सांगाडा तयार झाला. हे सगळं करायला कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये स्वतंत्र जागा मिळाली. मुलांचा उत्साह, धावपळ बघून वर्कशॉप मधील सगळी मंडळी आपण होऊन मदत करायला लागली. मुजावर सर, शिंदे सर, घाडगे सर, गुंडे सर, कांबळे सर यांची मदत आणि मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. शिवाजी सुतार सर , संदीप सर आणि जाधव सर तर जणू काही तेही संघाचा भाग आहेत अशा उत्साहात मदत करत होते. सळ्यांचा सांगाडा तयार झाला. डिझाईन मध्ये योग्य ते बदल करून पक्का सांगाडाही तयार झाला. त्यावर एक एक पार्ट विराजमान व्हायला लागला.
सगळं काम कॉलेजमध्येच करायचं यावर कटाक्ष होता. एखादी गोष्ट कॉलेजमध्ये होण्यासारखी नसेल तर बाहेर करायची पण मुलांनीच. कारण हे सगळं अनुभवणं, स्वतःच्या हातांनी करणं, चुकलं तर परत करणं, चुकांमधून शिकणं आणि नवीन चुका करणं यासाठी तर सगळा खटाटोप होता ना! नाहीतर काय गाडी बाजारात मिळतेच की!
एकेक पार्टचं डिझाईन अंतिम करायचं, तो पार्ट बनवायचा, गाडीवर बसवायचा. असा प्रवास सुरू होता. पुस्तकात शिकलेले डिझाईन आणि प्रत्यक्षातलं डिझाईन यातला फरक कळायला लागला. आपण डिझाईन केलेला पार्ट तयार होऊ शकतोच असं नाही. कधी रॉ मटेरियल उपलब्ध नसतं तर कधी प्रोसेसच्या मर्यादा असतात. मीही एक शिक्षक म्हणून समृद्ध होत होतो. पुढच्या वर्षी वर्गात शिकवताना काय भर घातली पाहिजे याची नोंद घेत होतो. त्यावर्षीच्या खंडेनवमीच्या पूजेला मुख्य आकर्षण ही अर्धवट बनलेली आणि नुकतीच चाकांवर उभी राहिलेली गाडी होती. नवनिर्मितीचा आनंद एकेका समस्येवर उत्तर शोधायची शक्ती देत होता. एकीकडे कॉलेजचे नियमित कामकाज सुरू होतं. गाडी बनवण्याचा या प्रक्रियेतून जो अनुभव मिळत होता त्याचा उपयोग प्लेसमेंट ,इंटरव्यू मध्ये प्रत्येकालाच झाला.
गिअर बॉक्स, स्टेरिंग वगैरे आणायचे वेळी जाणीव झाली की खर्चाची हातमिळवणी दिवसेंदिवस अवघड होते आहे. पण स्पॉन्सरशिप कोणाला मागायची आणि कोण मदत करणार. टीम मधल्या एकाच्या ओळखीने मग त्यावेळचे सांगलीचे खासदार आणि राज्यमंत्री श्री. प्रतीक पाटील यांची भेट मुलांनी घेतली. त्यांचे महिंद्राचे शोरूम असल्याने तिथून लागतील ते पार्ट  घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. मग काय डिझाईन मध्ये काही बदल करून उर्वरित ठिकाणी महिंद्राचे पार्ट वापरता येतील हे बघत गेलो.
मधला परीक्षेचा काळ सोडला तर सतत काम चालू होतं. डिसेंबर मधली सुट्टी तर सगळ्यांसाठी मुक्काम पोस्ट वालचंद कॉलेज अशी होती. त्यादरम्यान SAE च्या टीमकडून कॉलेजमधे इन्स्पेक्शन पार पडलं. काही चुका कळल्या, काही मार्गदर्शन मिळाले. त्यावरून काही बदल केले, काही सुधारणा. आता शेवटची हातघाई सुरू झालेली होती. आणि प्रत्यक्ष काम करणारी टीम 15 लोकांपर्यंत मर्यादित झालेली होती.
कॉलेजच्या गॅदरिंग सुरू होतं. टीमसाठी मात्र ट्रॅडिशनल डेला बॉयलर सूट आणि चॉकलेट डे ला हाताला ग्रीस. गॅदरिंगचा शेवटचा दिवस होता. गॅदरिंग सुरू असल्याने वर्कशॉप बंद होतं. टीमचं काम माझ्या बसायच्या जागेबाहेरच्या व्हरांड्यामध्ये सुरू होतं. दुपारी चारपासून काम सुरू होतं. शेवटची असेंबली झाली की गाडी सुरू करायची आणि ओपन थेटर मध्ये घेऊन जायची असा बेत होता मुलांचा. पण clutch- garbox- drive shaft ची जुळणी काही केल्या जमेना. तिकडे गॅदरिंग चा शेवटचा कार्यक्रम झाला, बक्षीस समारंभ चालू झाला. मीही मुलांबरोबर ठाण मांडून होतो.  facalty advisor ने स्वतः प्रत्यक्ष काम करायचे नाही फक्त मार्गदर्शन करायचे असते.  पण न धरी शस्त्र करीअसं म्हणणाऱ्या श्रीकृष्णाला पण प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर सांगेन गोष्टी युक्तीच्या चारकरत गप्प बसवलं नाही, तिथे माझी काय तऱ्हा. नकळतपणे माझे हात ग्रीसने कधी भरले कळलं नाही. पण त्यादिवशी ती ड्राईव्ह शाफ्ट असेंबली पण हट्टाला पेटली होती. गंमत म्हणजे त्यापूर्वी ती असेंबली केलेली होती. त्यामूळे तर अजुनच बुचकळ्यात पडायला झालं होतं. काहीही झालं तरी काम पूर्ण करायचंच होतं. गॅदरिंग साठी जमलेली मुलं घरी कधी गेली ते कळलं पण नाही. पण आम्ही घेतलेलं हे काम वेगळं होतं. अशी कामं हाताला घड्याळ बांधून होत नसतात. नेमकी समस्या कळून सगळी जोडाजोड पूर्ण झाली तेंव्हा फटफटायला लागलं होतं!
असे अनेक प्रसंग आठवत आहेत. सगळे लिहिणं शक्य असलं तरी वाचण्यात मजा नाही. ते अनुभवावेच लागतात. गाडी तयार झाली, रंगवली, सजवली, पूजा केली. कॉलेजचे त्यावेळचे संचालक डॉ. जोशी सर यांनी स्वतः चालवून पाहिली. इतकंच काय पण स्वतः खासदार साहेब जातीने येऊन गाडी पाहून गेले. आता एकच लक्ष मिशन-ए- इंदोर!!!
प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षण, गाडी नेण्यासाठी टेम्पो मिळवणं एकीकडे सुरू होतं. मी आणि इनामदार सर मुलांबरोबर जाणार होतो. तशी पूर्वपरवानगी वगैरे सगळे सोपस्कार पार पडले होते. निघायच्या दोनच दिवस आधी सरांच्या घरी काही दुःखद घटना घडली आणि मी नव्या सहकार्याच्या शोधाला लागलो. अजित पाटील सर तयार झाले. खरं तर आमच्या मैत्रीची सुरुवात या इंदूर प्रवासासून झाली. नंतरचे अनेक प्रसंग यापूर्वीच्या लेखांमध्ये आलेले आहेत. इंदूर मध्ये मुक्काम कुठे करायचा हा मोठा प्रश्न होता. कारण संयोजकांनी दिलेले पर्याय खूप महागडे होते.  दररोज माणशी तीनशे रुपये हा दर कमी वाटला तरी वीस जणांचे आठ दिवसांचे किती असा  हिशोब केला की रक्कम मोठी होती. कोणा पालकांच्या संपर्कातून इंदूर मधल्या एका आश्रमाची माहिती कळली आणि फोनवरून त्यांनी आश्रमाचे नियम पाळून मुक्कामाची परवानगी पण दिली. इतकंच नाही तर प्रत्यक्ष मुलांची चांगली वर्तणूक पाहून रोज रात्री अश्रामातला भोजन प्रसाद पण आम्हाला मिळायला लागला.
प्रत्यक्ष स्पर्धेविषयी मी जास्ती लिहीणार नाहीये. कारण तो अनुभव शब्दबद्ध करणं खरोखरीच माझ्या क्षमते पलीकडचं आहे. एक तरी ओवी अनुभवावीच्या धर्तीवर इतकंच म्हणेन की एकदा तरी अशी स्पर्धा अनुभवावी”.कारण तिथलं वातावरण, एकमेकांना मदत करत पण एकमेकांचे स्पर्धक असलेले प्रत्येकी वीस पंचवीस जणांचे 80 संघ, संयोजक-परीक्षकाच्या भूमिकेत असलेली मोठ्या मोठ्या पदांवर काम करणारी दिग्गज मंडळी हे सगळं विलक्षण आहे. आणि  त्याहूनही पुढे जाऊन स्पर्धेचा एकेक टप्पा ओलांडताना करावी लागलेली धावपळ-टेन्शन-आनंद!
पहिल्या टप्प्यामध्ये गाडीचं टेक्निकल इन्स्पेक्शन किंवा TI यशस्वी पूर्ण होऊन TI ok स्टिकर लागण्यासाठी काय काय धावपळ होते, आयत्यावेळी काय करावं लागतं हे सगळे ज्यांनी अनुभवले त्यांनाच कळेल. ब्रेक टेस्टला एकावेळी चारी चाकांना ब्रेक लागून गाडी थांबताना जो धुरळा उडतो त्यात ड्रायव्हर बरोबर सगळी टीम अक्षरशः न्हाऊन निघते. काही टेस्ट मात्र खरोखर अवघड असतात. चालकाचे कौशल्य आणि हिंमत दोन्हीची परीक्षा बघतात. आमचा विद्यार्थी-चालक पुरेसा अनुभवी आणि धाडसी होता. सस्पेन्शन टेस्ट ट्रॅकवर लाकडी ओंडक्यांवरून त्याने जास्त सफाईने गाडी चालवली होती त्यावरून सगळे त्याला आणि टीमला ओळखायला लागले होते. पण gradeability test चा मातीने भरलेला चढ बघून त्याची पण छाती दडपून गेली. नेमकं त्यावेळी सगळ्या शिक्षक लोकांना दुसरीकडे बोलावलं होतं. त्याचा फोन आला, “ सर, काय करू?” मीही अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. काय उत्तर देणार? टाटा मोटर्समध्ये दोन-चारदा टेस्ट ट्रँकवर गाडी चालवण्याचा अनुभव होता. त्या आधारावर एक दोन गोष्टी सांगितल्या. प्रत्यक्ष टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहिला  नाही मिळाली. पण नंतर तो ट्रँक बघून त्याची अनुभूती मात्र घेतली. नंतर बोलताना तो चालक-विद्यार्थी म्हणाला की तुम्ही सांगितलेल्या टेक्निकल गोष्टी मला पण माहिती होत्या, तुमच्याशी फोनवर बोलून हरवलेली हिंमत परत  मिळाली आणि टेस्ट पूर्ण करू शकलो. कणाकवितेतल्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणाया ओळीचा अर्थ त्यादिवशी मला समजला!
स्पर्धेचा एक-एक दिवस चांगला पार पडत गेला. शेवटच्या दिवशी Endurance test मधे ऐन चिखलाच्या डबक्यात गाडी असताना gear केबल तुटणे, गाडी ओढून बाहेर काढणे, दुरुस्त करणे हे सगळं चित्तथरारक होतं. वर्षभर केलेल्या कामाची पावती बक्षीस रुपाने नाही मिळाली. पण त्यापेक्षा आयुष्यभर उपयोगी पडतील असे हजारो अनुभव घेऊन आम्ही परत कॉलेजमध्ये आलो. स्पर्धेमध्ये बक्षीस न मिळवता परत आलो तरी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कॉलेजमध्ये पण सगळ्यांचं पुरेसं कौतुक झालं. या सगळ्यासाठी झालेल्या खर्चामधला कुठला भाग कॉलेज उचलू शकेल हे स्वतः संचालकांनी पाहिले. आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मोठी रक्कम कॉलेज कडून विद्यार्थ्यांना परत मिळाली.
अशा स्पर्धांमधल्या सहभागातून होणारे शिक्षण हे पाठ्यपुस्तकातून होणाऱ्या शिक्षणाला पूरक किंवा कॉम्प्लिमेंटरी आहे आणि इथून पुढच्या काळासाठी खूप आवश्यक सुद्धा. मग अनेकांनी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे यासाठी पुढची सगळी वर्षं मी धडपडत राहिलो. २०२० उजाडताना BAJA हे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंजिनिअरिंग शिक्षणात प्रसिद्ध झाले आहे. वालचंद मध्येही त्याची एक परंपरा निर्माण झाली आहे. पण २०११ मध्ये पहिली स्पर्धा संपल्यानंतर २०१९ पर्यंतचा प्रवासही तितकाच रंजक आहे. तो सगळा प्रवास वाचायला आणि अनुभवायला दोन दिवस थांबाल ना?
(लिहिण्याच्या ओघात अनेक आठवणी आणि किस्से लिहिलेले नाहीयेत हे लक्षात येतंय. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सहप्रवाश्यानी comment मधे त्यांचे अनुभव, आठवणी जरूर लिहाव्यात. तसेच ह्या सहभागाचा त्यांना नंतर कसा कसा उपयोग झाला हे ही जरूर लिहावे.)

                                                अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem