वालचंद डायरीज् – भाग २१
वालचंद डायरीज् – भाग २१
वालचंद सोडताना
खरंतर स्वतःसाठी म्हणून लिहायला सुरुवात केली
होती. माझे वालचंदमधले अनुभव मी
सगळ्यांसाठी शब्दबद्ध करावेत म्हणून पाठपुरावा करणारी विद्यार्थिनी मैत्रीण
वैष्णवी आणि हे लेखन ब्लॉग रूपात पब्लिश
करायचं ठरवल्यावर blog चे होमपेज वगैरे तयार करायला मदत करणारी ऋतुजा आणि सुरुवातीचे काही भाग बारकाईने वाचून त्यात सुधारणा सुचवणारा एक विद्यार्थी मित्र आदित्य
सर्वांनाच मनापासून धन्यवाद...मी सुचेल तसं लिहित जायचो ,त्यामुळे
लेखाचा आशय मला किंवा काँलेज संबंधित कुणी वाचला तर समजेल असा असायचा .पण
बाहेरच्या कुणी हे लेख वाचले तर संदर्भ लागतील असे नव्हते. शिवाय अनेकदा माझं लेखन
complecatedव्हायचं. संयुक्त वाक्यं व्हायची. मग प्रत्येक भाग बारकाईने वाचून त्यात
सुटसुटीतपणा, सोपेपणा आणण्याचं आणि वाक्यरचना , शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याचं काम न कंटाळता प्राची करते आहे
.त्यामुळे हे सगळे लेख वालचंद कॉलेजचा संदर्भ नसणाऱ्यांना सुद्धा वाचनीय वाटत
राहिले. अनेकांनी लेखन आवडत असल्याचा प्रतिसाद दिला तर काहींनी त्यांच्या आठवणी,
अनुभव यांची जोड कॉमेंट मधून दिली. त्यामुळेच खरंतर सलगपणे इतके
दिवस लिहीत राहायचा उत्साह टिकला. हे सगळे लेखन हे त्या त्या अनुभवांच्या, मनातल्या आणि स्मरणातल्या नोंदींवरून करत होतो. रोज दैनंदिनी वगैरे
लिहिण्याएवढा मी consistent नाही(दैनंदिनी लिहायची
सवय अलिकडे
लावून घेतो आहे) इतर अनेकांप्रमाणे
अनुभव किंवा प्रयोगांचे डॉक्युमेंटेशन करण्याबाबत मी पुरेसा आळशी आहे. त्यामुळे
कुठल्याच अनुभवांच्या लिखित नोंदी नाहीयेत. त्यामुळे कदाचित काही तपशील चुकले
असतील. तसेच लेखन त्यादिवशी सुचेल त्या विषयावर झालेले आहे. म्हणावी तशी सलगता
नाही. पण त्यामुळेच प्रत्येक भाग स्वतंत्रपणे वाचनीय झाला असावा.
वालचंद मध्ये अनेक सहकारी लाभले. काही दीर्घकाळ
तर काही कमी कालावधी करता. काही खूप चांगले मित्र झाले, तर काहींबरोबर टोकाचे वादही
झाले. पण या सगळ्यांकडूनच मी खूप काही शिकलो. त्यांनी वालचंद सोडल्यावर किंवा आता
मीही वालचंद सोडल्यावर.. त्यापैंकी बऱ्याच जणांशी संपर्क टिकून आहे. खरंतर या
सगळ्या सहकाऱ्यांबद्दल लिहायचं राहून गेलंय याची जाणीव आहे. मी वालचंदला काय दिलं
हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण वालचंदने मला काय काय दिलं असा थोडा स्वार्थी
वाटणारा विचार आज करतो. त्यापैकी सगळ्यात मोठी भेट म्हणजे खूप चांगले काही 'शे' विद्यार्थी. २०१० ते २०२१ या कालावधीत बाहेर पडणाऱ्या बारा तुकड्यांना मी
प्रत्यक्ष शिकवलं. हिशोब काढला तर ती संख्या ९०० च्या पुढे जाईल. मला खरं घडवलं ते
या सगळ्यांनी. दहाहून अधिक वर्षांचा कालावधी या सगळ्यांमुळे खूप आनंदात गेला. अशा
सगळ्या विद्यार्थ्यांबरोबरच्या खूप आठवणी आजही ताज्या आहेत. जश्या माझ्या मनात
आहेत तशाच अनेकांच्या मनात असणार आहेत. मग त्या सगळ्या कागदावर उतरवायचा अट्टाहास नको म्हणून प्रातिनिधिक आठवणी
लिहिल्या.
गेले वीस दिवस हे सगळं वाचत असताना एक प्रश्न
अनेकांना पडला असेल. काही जणांनी तो प्रत्यक्ष विचारला तर काहींना त्याचे उत्तर
कळल्याचा भास झाला. ‘टाटा मोटर्स सोडून वालचंद मध्ये का आलो’ या
प्रश्नाचे उत्तर देणं अवघड आहे त्यापेक्षा ‘वालचंद का सोडलं’
या प्रश्नाचे उत्तर देणे कितीतरी जास्ती अवघड आहे. दोन्ही
प्रश्नांना ‘शिकवायची हौस होती म्हणून वालचंद मध्ये आलो’
आणि ‘वेगळे काहीतरी करून बघायचं होतं म्हणून
वालचंद सोडलं’ असं एका वाक्यात उत्तर देऊ शकतो. पण तसं करणं
उचित नाही. त्यातून अनेक प्रश्न सुरु होतात. पहिला, ‘वेगळं
काहीतरी करून बघायला वालचंद सोडायलाच हवं होतं का (म्हणजे सरकारी अनुदानित
महाविद्यालयातली सातव्या वेतन आयोगाचा पगार देणारी कायमस्वरूपी नोकरी सोडायची काही
गरज होती का)?’ आणि दुसरा, ‘वालचंद
मधल्या राजकारणाला, त्रासाला, चांगल्या
उपक्रमांना झालेल्या विरोधामुळे कॉलेज सोडलं का?’ या दोन्ही
प्रश्नांची उत्तरे देणे त्या मानाने सोपे आहे. वालचंद मध्ये येताना कधी मिळणाऱ्या
पगाराचा जास्ती विचार केला नव्हता. इथे शिकवत असताना आणि वर्गाबाहेर अनेक उपक्रम
करत असतानाही त्यातून किती पैसे मिळतील असा विचार केला नव्हता. मग सोडताना तरी तो
विचार कशाला? सरकार कृपेने पेन्शनची बेडी ही आमच्या पिढीच्या
पायात नाही. तसेच राजकारण, विरोध, त्रास
हे सगळे समाजव्यवस्थेचे एक भाग आहेत. वालचंद मध्ये कधीकधी त्याचा कहर झाला ही
गोष्ट खरी आहे. पण या विरोध, राजकारण या गोष्टींना कंटाळून
वगैरे मी वालचंद सोडलं नाही. त्या सगळ्यावर मात करायची किंवा ते सगळं बाजूला ठेवून
आपण ठरवलेलं चांगलं काम करत राहण्याची शक्ती ही याच वालचंदमध्ये मला मिळाली हे ही
नाकारता येणार नाही.
२०१७
पासूनच वालचंद मधून बाहेर पडायचा विचार डोक्यात सुरू झाला. आपली कुठलीही नकारात्मक
भावना या विचारामागे नाही ना? हे तपासण्यात पहिले काही महिने गेले. त्यानंतर मात्र
कॉलेजमध्ये दहा वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये कॉलेजमधून बाहेर पडायचं असं पक्क ठरवलं होतं. तोपर्यंत मी वालचंद मध्ये establish
झालो होतो की नाही माहिती नाही पण वालचंद हा comfort zone झाला होता. comfort zone मधून बाहेर पडल्याशिवाय
प्रगती करता येत नाही हे theoretically खरं असलं तरी comfort
zone च्या बाहेर पडणं practically तितकंच अवघड
असतं. आणि म्हणूनच त्यासाठी लागणारी शक्ती गोळा करणं पुढची दोन वर्ष चालू होतं.
याच कालावधीत, मी योग्य दिशेने आणि सर्व दिशांनी विचार करतोय
ना, स्वतःबरोबरच इतरांचा पण विचार करतोय ना, हे बघण्याचं काम ; कधी विरोध करून, कधी support करून, कधी प्रश्न
विचारून, कधी बोलून तर कधी न बोलून प्राची करत होती, हे माझं सुदैव. वालचंद सोडताना सगळ्यात मोठी अडचण काय होती तर उत्तम
विद्यार्थ्यांना सोडून जावं लागणार ही.
अनेकांना आश्चर्य वाटेल पण दरवर्षी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर एक घनिष्ठ नातं निर्माण झालेलं होतं. म्हणूनच
शेवटच्या दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने त्यातून बाहेर पडू असं ठरवलेलं होतं.
ते फारसं जमलं नाही म्हणा. म्हणूनच मग वालचंद मधलं वास्तव्य आणखी ६ महिने
लांबवावंसं वाटलं.
मी राजीनामा देणार आहे हे जवळच्या सहकाऱ्यांना
आधीचे काही महिने सांगत होतो. पण त्या कुणाला ते पटत नव्हतं किंवा ते पटवून घेत
नव्हते. अगदी १३ नोव्हेंबर २०१९ ला “मी आज राजीनामा देतोय” असं
सांगितल्यावरही त्यांना ती चेष्टाच वाटली. सहकाऱ्यांना हे सांगणं त्यामानानी सोपं
होतं पण विद्यार्थ्यांना सांगणं आणि पटवणं जास्त अवघड गेलं.
त्या सेमिस्टर मधल्या फायनल इयर वरच्या शेवटच्या
तासाला “हा माझाही
वालचंद मधला शेवटून दुसरा तास आहे” (शेवटचा तास दुसऱ्या
दिवशी दुसऱ्या वर्गावर होता) असं जाहीर केल्यावर सुद्धा कोणी ते seriously घेतलं नाही. कारण ही बातमी संध्याकाळपर्यंत त्या तासाला अनुपस्थित असलेल्या
विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नव्हती. एरवी अशी काही बातमी काही सेकंदातच सगळीकडे
पसरते. त्याच रात्री मग ही बातमी आश्चर्यकारकरीत्या अन्य विभागात काम करणाऱ्या एका
शिक्षक सहकाऱ्यांनी काहीसा विचित्र मेसेज पाठवून (हे असलं सगळं वालचंद मधे चालायचंच असं मी गृहीत धरलं होतं.)
सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. माझं काम सोपं झालं. अनेक विद्यार्थ्यांनी
या निर्णयाविरुद्ध निषेधही नोंदवला.
शेवटचा महिना..डिसेंबर.. नेहमीप्रमाणे परीक्षा.
त्यासाठी पेपर काढणे, पेपर तपासणे, प्रॅक्टिकल-ओरल परीक्षा
यातच गेला. कॉलेज प्रशासनाने पण अपेक्षेप्रमाणे राजीनामा लगेच स्वीकारला आणि कधी
नव्हे ते बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी तत्परतेने केल्या. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे.
शेवटचा दिवसही नेहमीप्रमाणे सुरू झाला. आदल्या
दिवशीच परीक्षेसंबंधीची सगळी कामं पूर्ण केली होती. बरेच सहकारी आणि अनेक
विद्यार्थी सुट्टीवर होते. काही विद्यार्थी भेटून गेले. काही सहकारी गप्पा मारून
गेले. मला मात्र काय करावं कळत नव्हतं. एक निर्विकार स्थिती होती. कारण आनंद तर
नक्कीच नव्हता ,ना कुणाबद्दल राग होता. दोन्ही बाजूंनी काही कटू न होता मी
वालचंद मधली नोकरी सोडत होतो, माजी शिक्षक आणि माजी
विद्यार्थी म्हणून इथे येत राहीनच असा विश्वास होता, त्यामुळे
मग दुःखही मर्यादित होतं.
विभागात झालेला अनौपचारिक निरोप समारंभ हे त्या
दिवशीचे पहिले आश्चर्य. कारण प्रथेप्रमाणे फक्त सेवानिवृत्त होणाऱ्यांचाच निरोप
समारंभ व्हायचा. राजीनामा देणाऱ्यांचा निरोप समारंभ झालेला आठवत नव्हता. पण तो
छोटेखानी गप्पांचा कार्यक्रम खूप छान झाला. त्याचे फोटो श्री. भंडारी सर यांनी facebookवर टाकल्यामुळे मग बातमी
जगजाहीर झाली.
पण दुसरा आश्चर्याचा धक्का बसला जेंव्हा एका
विद्यार्थ्याचा मेसेज आला “सर, आमची ओरल चालू आहे तेंव्हा सहा
वाजेपर्यंत थांबा. आणि घरी यायला उशीर होईल असे कळवून ठेवा.” संध्याकाळी फायनल ईयरचा जवळजवळ सगळा वर्ग एकत्र जमला होता. दरवर्षी फायनल
इयरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होत असतो. पण आता ते सगळे मला निरोप द्यायला
जमले होते. दुर्मीळ प्रसंग ना! सुरुवातच झाली प्रश्नोत्तरांनी. फक्त आज ते सगळे
प्रश्न विचारत होते आणि मला उत्तरं द्यायची होती. आधीची तीन वर्षं वर्गात आणि
परीक्षेत अवघड अवघड प्रश्न विचारून मी
त्यांना त्रास दिला होता ना. त्याचा जणू बदला घेतला जात होता. नंतर अनेकांनी
माझ्याबद्दल लिहिलेल्या आठवणींचे एक आणि वर्गातल्या प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा
असलेले एक अशी दोन सुंदर भेट कार्ड मला दिली. शेवटी सगळ्यांनी मिळून खाल्लेला केक
आणि काढलेले अनेकानेक फोटो. राजीनामा देऊन नोकरी सोडणाऱ्या शिक्षकाला
विद्यार्थ्यांनी दिलेला इतका हृद्य निरोप समारंभ क्वचितच घडत असेल नाही. मी
नशीबवान आहे इतकंच म्हणेन!
काँलेज, त्यातले विद्यार्थी, सिलँबस,शिक्षणपद्धती, इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दलची माझी मतं
असं खूप काही लिहिता येईल..पण , पण मी लेखाच्या सुरुवातीला
म्हंटलं तसं मी लेखक नाही.. म्हणून केवळ स्वतः घेतलेल्या अनुभवांवर आधारित ही
"वालचंद डायरी" आज संपवत आहे.
अमर परांजपे
Comments
Post a Comment