वालचंद डायरीज् – भाग २०


वालचंद डायरीज् भाग २०
Baja –पुनःश्च हरी ओम्
२०१५ मध्ये efficycle दोन वर्षाच्या खंडानंतर सुरू झालं. Baja मध्ये भाग घेऊन चार वर्षे उलटून गेली होती.Main Baja (MBaja) बरोबरच electric Baja (EBaja) चालू झालेलं होतं. आता नव्याने स्पर्धेत सहभागी होणे अवघड झालं होतं कारण या चार वर्षात स्पर्धा खूप कठीण झालेली होती. आपले विद्यार्थी त्यात सहभागी होत नाहीत याचं वाईट वाटायचं. २०१२ च्या स्पर्धेवेळी अगदी first year ला असणारे विद्यार्थी पण आता बाहेर पडलेले होते. म्हणजे निखारा पूर्णपणे विझला होता. नुसती फुंकर पुरणार नव्हती. कुणीतरी आतून पेटायला होतं. मार्च २०१६ मध्ये third year मधल्या चार मुली भेटायला आल्या. सर, आम्हाला Baja करायचंय.मला काय बोलावं कळेना,करायचं म्हणजे?ते काय गॅदरींगमध्ये डान्स करण्यासारखं आहे का?” असे शब्द मी फक्त ओठावर येऊ दिले नाहीत. या चौघी डिप्लोमा करून डिग्रीला आलेल्या होत्या आणि तोपर्यंत वर्गात त्यांची उपस्थिती कधी फारशी जाणवली नव्हती. मी मग जास्त उत्साह न दाखवता बघूएवढंच उत्तर दिलं. दुसर्‍या दिवशी त्याच वर्गातल्या अजून दोन मुली  आल्या. “Baja करायचंय.असे दोन गट भेटून गेले तरी मी थोडा साशंक होतो. त्यांनी मात्र पाठपुरावा सोडला नाही. २५ जणांची टीम होणं पण अवघड आहे असं वाटत होतं कारण त्यांच्या वर्गातले अनेक दिग्गज लोक GATE च्या क्लाससाठी हैदराबादला जायच्या तयारीत होते, काही जण internship ला जायच्या तयारीत होते तर खालच्या वर्गातले लोक efficycle आणि efficarटीममध्ये आधीच दाखल झालेले होते. पण त्यांची जिद्द मोठी होती. पुढच्या वेळी भेट झाली तेंव्हा तर, “आम्ही Ebajaला रजिस्टर करणार आहोत. कारण ती स्पर्धा नवीन आहे. टीम पण कमी असतात. शिवाय इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रॉनिक्स मधून पण लोक सहभागी होऊ शकतात. २५ ची टीम तयार झालेली आहे. ही यादी.यादी पहिली. २५ पैकी १७ मुली!! यापैकी तीन इलेक्ट्रॉनिक्स मधल्या, दोन इलेक्ट्रिकल मधल्या, बाकी थर्ड इयर आणि फायनल इयर मेकॅनिकल मधल्या. या टीमने Baja शक्य आहे का? असा विचार करत असतानाच, “इलेक्ट्रिकलचे मोरे सर एक faculty advisor व्हायला तयार आहेत. मेकॅनिकल मधून तुम्ही होणार का?” हे वाक्य आदळलं. एकंदर गाडीत प्रवासी बसलेले होते, शिट्टी वाजली होती, शेवटची जागा शिल्लक होती, त्या गाडीत चढायचं की नाही हे मला ठरवायचं होतं.
 काय केलं मी?चढलो का गाडीत? गाडी किती स्टेशन पुढे गेली?हे सगळं आता सांगतो.
परत एकदा अभी नही तो कभी नहीअशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे म्हणा किंवा  कोणी शिक्षक तयार न झाल्यामुळे ह्या मुलींच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून म्हणा  मी तयार झालो. खरंतर या टीमला एका महिला शिक्षक मार्गदर्शकाचा जास्त उपयोग झाला असता. (२०१२ पासून विभागामध्ये किमान एक तरी कायमस्वरूपी महिला शिक्षिका पाहिजे असा आग्रह मी मांडत होतो. पण.... असो)
EBajaहा एक चांगला initiative होता. इथून पुढच्या काळात electric vehicle मोठ्या प्रमाणात बाजारात येणार हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यातले एक Exposure आणि  Expertise मिळावं हा खूप चांगला हेतू आहे. स्पर्धा म्हणून विचार केला तर बाकी ATV तशीच फक्त इंजिन च्या ऐवजी बॅटरी आणि मोटार असा बदल. अर्थात त्याला लागणारे circuit, controller, charger या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे गाडीचे वजन आणि किंमत दोन्ही बरेच वाढते.
पहिला डिझाईन प्रेझेंटेशनचा टप्पा बेंगलोरला पार पडला. मुख्य फेरीसाठी निवड झाली. बॅटरी, मोटर, चार्जर, कंट्रोलर हे सगळं सगळ्या संघांसाठी समान असणार होतं आणि महिंद्रा इलेक्ट्रिक कडून विकत घ्यायचं होतं. ह्या E-kit ची किंमत जवळजवळ चार लाख रुपये होती. पण आधी बाकी गाडी बनू देत मग त्याचा विचार करु असं ठरलं.
टीम मध्ये मुली मोठ्या संख्येने असल्यामुळे रात्री उशिरा काम करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे थोडं सावकाश काम सुरू होतं. Bhabha Engineering च्या लिमये सरांनी खूप मदत केली. त्यांच्या कारखान्यातली एक जागा या प्रकल्पासाठी दिली. पाईप bending, वेल्डिंग या सुविधा त्यांच्याकडे असल्यामुळे Roll-cage किंवा गाडीचा सांगाडा तिथे तयार केला. Wheel End साठी एका विशिष्ट Aluminium Alloy चा वापर करून त्याचं कास्टिंग करायचं असे ठरले. त्यामुळे वजन खूप कमी होणार होतं. ते सगळं डिझाइन करणं खूप आव्हानात्मक होतं. शिवाजी  सुतार सरांच्या मदतीने त्याचा लाकडी pattern तयार झाला आणि मग प्रत्यक्ष casting वगैरे बाहेर केलं. हळूहळू कामाला गती येत होती. दिवाळीच्या सुट्टीत पण, ठरावीक काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही असे ठरवल्यामुळे,त्यावर्षी लक्ष्मीपूजन-पाडवा अशी मर्यादित दिवाळी झाली.
एवढ्या मोठ्या संख्येने मुली काम करत आहेत असं पहिल्यांदाच घडत होतं. सगळी कामं मुलांनाही लाजवेल अशा उत्साहात सुरू होती. MIDC मधून परत येताना एकदा दोघींना अपघात झाला. पण दोन दिवसात दोघीही कामाला लागल्या. मी सोडून अन्य कोणी शिक्षक आणि बहुधा त्यांच्या घरी पण हे माहिती नसावं. Ekitसाठीचे पहिले दीड लाख रुपये सगळ्यांनी मिळून भरले. पण पुढचे अडीच लाख भरायची वेळ आली तेंव्हा सगळेच जागे झालो. कॉलेज कडून मागायचे तर कुठल्या प्रकारे? मी आणि मोरे सर दोन-तीन पर्याय घेऊन संचालकांना भेटलो. TEQIP च्या Equipment Procurement च्या बजेटमधून त्याला मान्यता मिळाली. पण ही सरकारी प्रक्रिया. Approval, Quotation, Comparative statement, त्यावर ढीगभर लोकांच्या सह्या. त्यात परत सगळे करायचे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून. टीम मधली एक विद्यार्थिनी आणि मी जवळजवळ महिनाभर हा उद्योग करत होतो. पण कॉलेज advance payment करत नाही आणि advance पैसे मिळाल्याशिवाय महिंद्रा Ekitदेणार नाही अशा कात्रीत आम्ही सापडलो. अनेक पर्यायांचा विचार केला. अगदी कॉलेजच्या पतपेढी कडून तात्पुरते कर्ज काढायचा विचार पण झाला. पण सुदैवानं तशी वेळ आली नाही.
इकडे डिसेंबर मध्ये कॉलेजला सुट्टी होती. वर्कशॉपमध्ये काम करायला परवानगी मिळाली. पण वेल्डिंग मशीन वापरायचे नाही असे सांगून ते कुलपात ठेवण्यात आले. अडचणी तयार करण्यात काँलेजमधली काही  मंडळी एक्सपर्ट होती. एक दिवस बाहेरून वेल्डिंग मशीन भाड्याने आणले. पण असं किती दिवस करणार. शेवटी टीमने निर्णय घेतला आणि पोर्टेबल वेल्डिंग मशीन विकत आणले. पुढच्या अनेक टीमने ते मशीन वापरले, अजून वापरत आहेत. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी  त्यावर वेल्डिंग करायला शिकले. अनेक सर्धांच्या ठिकाणी आमच्या मुला-मुलींनी VJTI - COEP पासून SRM – KIT पर्यंतच्या नामवंत कॉलेजमधल्या टीमना वेल्डिंग करायला मदत केली. प्रत्येक अडचणी मधून काहीतरी चांगलं घडवता येतं याचे एक उत्तम उदाहरण. असे अनेक प्रसंग, घटना आहेत.( Problem solving संदर्भात किंवा अन्यही अनुभव जे share केल्याने वाचकांना उपयोग होईल असे अनुभव प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांनी घेतले ते कमेंट मधे जरूर शेअर करावेत. भारावून जाण्यापेक्षा facts सांगितल्यात तर अनेक जणांना उपयोगी ठरतील.)
जानेवारीमध्ये खूप उशिरा Ekitमिळालं. मग त्याची assembly. आता गाडी चालायला लागणार अशा टप्प्याला आणि प्रत्यक्ष स्पर्धेला आठ दिवस बाकी असताना त्यामधला एक पार्ट खराब झाला. दोघे पुण्याला जाऊन आले पण तिथेही तो दुरुस्त झाला नाही. मग दोघे जण बेंगलोरला जाऊन काम करून आले. महिंद्रा इलेक्ट्रिक कडून चांगलं सहकार्य लाभले. स्पर्धेला निघायच्या आदल्या दिवशी काँलेजच्या वर्कशॉपमधून एका मुलीची sack चोरीला गेली. प्रवासाची सर्व तिकिटे, थोडे पैसे, तिचे एटीएम कार्ड सगळे त्यात होतं. पूर्ण कॉलेज शोधलं. sackमैदानाच्या बाजूला एका झुडपात सापडली. सगळी तिकीटं पण तुकडे तुकडे करून तिथेच टाकलेली होती. सगळे तुकडे गोळा केले आणि jigsaw puzzle जोडावे तसे जोडले. तो दिवस आणि रात्र मात्र टेन्शनमध्ये गेली. कॉलेजमधल्याच कोणीतरी ते कृत्य केलं होतं हे नक्की. समाजात अशा विकृत शक्ती असतात आणि आपण कायम सजग राहून त्यांना तोंड दिले पाहिजे हे आम्ही शिकलो.
प्रत्यक्ष स्पर्धेतले अनुभव विलक्षण आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दलच्या अपुऱ्या ज्ञान आणि माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अपेक्षा पूर्ण करताना चांगलीच दमछाक झाली. पण  Problem Solving on the spot चा चांगला अनुभव मिळाला. Kill switch साठी relay वापरून एका रात्रीत बनवलेलं सर्किट असो किंवा साधा जुना फ्यूज वापरून बनवलेले HVDC (High Voltage Disconnect) असो, गटकार्याचा तो एक उत्तम नमुना होता. अगदी शेवटच्या टप्प्यात काहीही झालं तरी शेवटपर्यंत give up करायचं नाही असं दोन जणींनी ठरवलं आणि सगळी टीम काम करत राहिली. तो प्रसंग तर आजही तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा आहे. दुसरीकडे टीम मधल्या चार पाच जणींनी मिळून केलेल्या डिझाईनचे उत्तम प्रकारे प्रेझेंटेशन केलं आणि त्याआधारे टीमला “Best in CAE (Computer Aided Engineering)” चे बक्षीसही मिळाले.
बक्षीस मिळाल्याचा आनंद तर झालाच. तो साजरा पण केला. पण त्याचा फायदा असा झाला की सगळी टीम खूप आत्मविश्वास घेऊन परत आली. मुली काय गाडी बनवणारअसं म्हणणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली. पण त्याहून मोठा फायदा झाला की त्यावेळी पहिल्या दुसऱ्या वर्षाला असलेले विद्यार्थी प्रेरित झाले. bajaआणि तश्या अन्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची परंपरा परत सुरु झाली.
या टीम मधल्या चार मुलींनी पुढे त्यांच्या शेवटच्या वर्षाचा प्रकल्प पण wheel end design, त्यासाठी Aluminum Alloy चा वापर, testing, validation यावर केला. स्पर्धेपलीकडे जाऊन त्या मुलींनी खूप काम प्रोजेक्ट म्हणून केलेलं होतं. तरी स्पर्धेला विरोध म्हणा किंवा स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी म्हणा ...हा प्रकल्पच कसा वैध नाहीये असा मुद्दा विभागाच्या मीटिंगमध्ये एका वरिष्ठ प्राध्यापकांनी लावून धरला. हे ऐकून मग मात्र माझा पेशन्स संपला. त्या मीटिंगमध्ये मग जोरदार खडाजंगी झाली. गंमत म्हणजे याच प्रोजेक्टला TCS कडून मिळणारं ‘Best Project’ चं मानाचं बक्षीस नंतरच्या आठ-दहा दिवसात जाहीर झालं.
२०१८ च्या स्पर्धेसाठी टीम तयार झाली होती. आता स्पर्धेच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणून आम्ही जास्त विचार करायला लागलो. बॅटरीची क्षमता, charging- discharging चा rate असे इलेक्ट्रिकल मधले मुद्दे आणि इलेक्ट्रिक व्हेईकल ला multi speed gear box गरजेचा आहे का, असेल तर ratio कसे ठरवायचे असे मेकॅनिकल मधले मुद्दे यावर अगदी संशोधन नाही पण बराच विचार डिझाइन करताना करत होतो. स्पर्धेसाठी लागणारी  आर्थिक मदत परदेशातून माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कातून मिळत गेली. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी आम्ही वापरलेला gear box बघून अनेक जणांच्या माना वाकड्या झाल्या. पण स्पर्धेमधला  sledge-pull नावाचा प्रकार फक्त आम्हीच पूर्ण केल्यावर हीच मंडळी आमची गाडी बारकाईने बघायला आली. पुढच्या वर्षी अनेकांनी तसाच गिअर बॉक्स वापरलेला बघितला तेंव्हा आम्ही बरोबर विचार करत असल्याची पावती मिळाली.
या स्पर्धेमध्ये मार्केटिंग प्रेझेंटेशनचं पहिलं बक्षीसही टीमला मिळालं. वालचंद मधली मुलं soft skills मध्ये पुण्या-मुंबईच्या मुलांच्या तुलनेत मागे पडतात असे अनेक वर्षे ऐकत होतो. थोडे कष्ट घेतले, भाषेवर प्रभुत्व मिळवलं, उत्साहाने बोललं आणि त्यात अंगभूत तांत्रिक ज्ञान मिसळलं की soft skill च्या या बागुलबुवावर मात करता येते हे नेमकेपणाने कळले.(वालचंद मधे शिकलेल्या अनेकांना हा अनुभव असेल,बाहेरच्या जगात 'सांगलीच्या काँलेजमधे शिकलेला ' असं सुरवातीला ऐकायला लागलं तरी नंतर आपण techicalज्ञानात कमी नसतो फक्त वरवरची चमक मिळवली की झालं)
या टीममध्ये तेंव्हा second year ला असलेले चार जण होते. त्यातल्या एका मुलानं पुढच्या वर्षीची Ebajaटीम तयार करायचे ठरवले. पण विशेष म्हणजे त्यातल्या एका मुलीने MBajaसाठी टीम तयार करायचा निर्णय घेतला. हे विशेष अशासाठी की आत्तापर्यंत ही स्पर्धा खूपच अवघड झाली होती. स्पर्धेसाठी बनवलेले ट्रॅक बघून यावर गाडी चालू शकते यावर विश्वास बसत नाही (इच्छुक वाचकानी youtubeवर त्याचे व्हिडिओ जरूर पहावेत). अशी अवघड स्पर्धा बघितल्यावर त्या मुलीला ते आव्हान स्वीकारावंस वाटलं हे कौतुकास्पद. अनेक सीनियर विद्यार्थ्यांनी विरोध करूनही ती ठाम राहिली. बरोबर तिची जिवलग मैत्रीण होती पण त्या वर्गातल्या मुलांनी पण तिला साथ द्यायचं ठरवलं हे खूप आनंददायी होतं.
२०१९ साठी मग दोन टीम तयार झाल्या. ५० विद्यार्थी आता हा अनुभव घेऊ शकणार होते. त्याबरोबरच efficycle आणि go-kart नावाची अजून एक स्पर्धा असे मिळून जवळजवळ सगळे विद्यार्थी आता या परंपरेचे पाईक झाले.
दोन्ही संघांसाठी मिळून बराच खर्च येणार होता. पण पुरेसं आधीपासून नियोजन करून तो प्रश्न आधीच मार्गी लावला. त्यामुळे टेक्निकल गोष्टींवर काम करायला टीमला स्वातंत्र्य मिळाले. Ebajaसाठी, अतिशय हलका आणि छोटा, 2-speed gear box स्वतः डिझाईन करून बनवण्याचे आव्हान मुलांनी स्वीकारलं आणि खूप खूप कष्ट घेऊन त्यात यश मिळवलं. सगळ्या प्रक्रियेत पुस्तकात शिकलेल्या अनेक विषयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. दुसरीकडे MBajaमध्ये engine-CVT–gearbox-drive shaft यांची योग्य assembly आणि tuning यावर काम केलं गेलं. दरवर्षी टप्प्याटप्प्यानं गाडी अधिक उत्तम आणि हलकी, तरी मजबूत बनत होती. उदाहरणार्थ २०१७ मधली ३८० किलो वजनाची गाडी २०१८ मधे २८० किलो आणि २०१९ मध्ये २०८ किलोची झाली.
इंदूर आणि रोपर (पंजाब) येथे झालेल्या स्पर्धा नेहमीप्रमाणे रोमहर्षक झाल्या. नवनवीन समस्या आणि त्यांना आयत्या वेळी काढलेली उत्तरं हा तर या स्पर्धांचा आत्मा. रोपरच्या स्पर्धेवेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी steering rack तुटला. रोपरसारख्या छोट्या गावात तसाच rack मिळणं शक्य नव्हतं. पण पुढच्या चार-पाच तासांत most suitable rack मिळवून त्यासाठी गाडीमध्ये योग्य ते बदल करून परत गाडी चालती करणे किंवा एका हाताला टाके पडलेले असताना टीमची गरज म्हणून एका हाताने हाताने brake bleeding चं काम करणारा विद्यार्थी हे विशेष लक्षात राहिले. बक्षीस न मिळवता परत येऊनही पुढच्या टीम तयार झाल्या आहेत. यावरून आता बक्षिसापेक्षा हे अनुभव घेण्याची गरज आणि महत्त्व सर्व मुलांना पटले आहे हे जाणवतंय.
मार्च २०१९ पासून मी मात्र ह्या सगळ्या पासून जाणीवपूर्वक लांब राहिलो आहे. पण सहकारी शिक्षक मैदानात उतरले आहेत. थोड्याच दिवसात त्यांना पण हे व्यसन लागेल. विद्यार्थी तर आहेतच. अनुभव शिक्षणाची ही खाण खोल-खोल खणली जाईल हे नक्की!
यात चांगली गोष्ट अशी आहे की सोन्याच्या किंवा दगडांच्या खाणी संपतात..पण वाचलंदच्या विद्यार्थ्यांना सापडलेली ही अनुभवांची खाण मात्र खोल खोदत जातील तसे अधिक गवसेल अशी आहे.
खरंतर भावनिक होऊन बोलणे हा माझा स्वभाव नाही, पण ठरवून या स्पर्धांमधून बाजूला झालो तरी घेतलेले अनुभव मात्र आता कायमचे चिकटले आहेत. या सगळ्या प्रक्रीयेचा मी एक भाग होतो हे आठवूनही आज समाधान वाटतंय.कधी शिकवलेले,वाद घातलेले,माझा ओरडा खाल्लेले,कधी शाबासकी मिळवणारे तर कधी चक्क रडणारे अनेक विद्यार्थी आज आठवून जातायत. काही प्रसंग मनावर कोरले गेलेत, काही इथे लिहायचे निसटलेत.चालायचंच. मी काही लेखक नाही, शिक्षक आहे.आज राहिले,विसरले ते उद्याच्या तासाला आवर्जून सांगायचे हाच शिरस्ता होता. गेल्या दहा वर्षात जे अनेक इंजिनिअर झाले त्यातले काही चांगले इंजिनिअर घडवण्यात माझा पण सहभाग होता याचा आनंद आहे.

                                     अमर परांजपे                                 

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem