वालचंद डायरीज् – भाग १६


वालचंद डायरीज् भाग १६
वर्गापलीकडे शिक(व)ताना –३
      First Year च्या विद्यार्थ्यांना शिकवायची संधी खूप कमी वेळा मिळाली. २०११ मधे एकदा electronics च्या वर्गाला शिकवलं होतं. परत तशी संधी जानेवारी २०१७ मधे मिळाली. ह्यावेळी mechanical चा वर्ग होता. विषय Engineering Graphics. first year च्या वर्गात हा विषय शिकवणं हे एक वेगळं आव्हान असतं. एक म्हणजे १२वी पर्यंत शिकण्याची आणि अभ्यासाची पद्धत खूप वेगळी असते, विद्यार्थी अजून त्यातून बाहेर आलेले नसतात. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष फळ्यावर कमीतकमी साधनांचा वापर करून काढावी लागणारी असंख्य drawing. पण एक गोष्ट चांगली असते की वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकाबद्दल फारसं काही कळलेलं नसतं. तुम्ही वर्गात जाता ती एक blank image घेऊन.
      अशीच काहीशी blank image घेऊन एका दुपारच्या एका तासाला मी ह्या वर्गात गेलो. नेहमी प्रमाणेच स्वतःची ओळख करून देण्यापेक्षा तुम्ही मला प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तरांमधून माझी ओळख करून घ्या असा वेगळा प्रकार केला. अपेक्षेपेक्षा खूप वेगळे प्रश्न विचारले गेले. मग विषयाची तोंड ओळख आणि महत्त्व वगैरे वगैरे विषय पुढच्या तासासाठी ठेवले. तास संपवून बाहेर आलो तेंव्हा एक जाणीव झाली की ही एक वेगळी संधी आहे. ठरवलं आणि नशिबात असेल तर पुढच्या ६ semester मधे प्रत्येक वेळी आपण ह्या वर्गाला शिकवू शकतो. या विचाराबरोबरच आपणही नव्याने ही ३ वर्ष शिकूया हा विचार बळावला.
      या वर्गातली मुलं-मुली पण छान उत्साही होती आणि पहिल्या वर्षाला असल्यामुळे असेल पण निरागस  होती. उदाहरण द्यायचं झालं तर एका class test नंतर सर, त्या अमुक अमुक नंबर ला किती मार्क आहेत?” अशी विचारणा एका विद्यार्थ्याने केली. मार्कांच्या स्पर्धेत आपण मागे पडत नाही ना हे त्याला तपासायचे होते. पण त्यासाठी असं direct शिक्षकांना जाऊन विचारायचं धाडस कॉलेजमध्ये कोणी केलेलं पाहिलं नव्हतं.
      सुरुवातीचे २-३ तास पहिल्या बाकावर कोणी बसत नव्हतं. पाहिलं तर तो बाक थोडा नादुरुस्त होता. दुपारचा २ ते ३ चा तास संपता संपता विचारलं की तुमच्या पैकी challenge स्वीकारायला कोणा कोणाला आवडतं? ४ जणांनी हात वर केले. मग त्या चौघांना सांगितलं की साडेपाचला कॉलेज सुटायच्या आधी हा बाक दुरुस्त झाला पाहिजे आणि त्यासाठी खिशातून एकाही पैसा खर्च करायचा नाही. सव्वापाच वाजता whatsappवर message आला की बाक दुरुस्त झालेला आहे, बरोबर दुरुस्त झालेल्या बाकाचा फोटो. दुसऱ्या दिवशीच्या तासाला त्या चौघांच्या अनुभवकथनातून सगळ्यांनाच असं वाटून गेलं की हे छोटं काम करताना पण खूप काही शिकायला मिळालंय. पुढे संधी मिळेल तेंव्हा अनेक जण अशी आव्हानं स्वीकारत गेले हे आनंदाची गोष्ट.
      त्याच semstserदरम्यान नुकते पास out झालेले दोघं जण एकदा भेटायला आलेले. त्यांना सहज विचारलं की first year च्या वर्गात थोडा वेळ गप्पा मारणार का? ते ही तयार झाले ( त्यांना पण अशी नवीन आव्हानं स्वीकारायला आवडत असावीत बहुदा!!). त्या दोघांनी मग एक तास छान अनुभवकथन केलं. कॉलेजच्या ४ वर्षात काय काय केलं पाहिजे हे स्वानुभवातून त्यांनी चांगलं उलगडून सांगितलं. त्या session नंतरही काही विद्यार्थी त्या दोघांच्या आजतागायत संपर्कात आहेत. गेल्या ५-६ वर्षात  ,कॉलेजमधलं शिक्षण संपवून वेगवेगळ्या ठिकाणी शिकणाऱ्या, काम करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या सांगली भेटी दरम्यान वर्गात बोलायला बोलवत राहिलो. कुणी IIT किंवा IIScसारख्या ठिकाणी संशोधन करतानाचे अनुभव सांगितले तर कोणी कंपनी मधे काम करताना कॉलेज मधे घेतलेले वेगळे अनुभव कसे उपयोगी पडले हे सांगितलं. एकंदर अशी sessions यशस्वी होत होती. अश्याच एका तासाला ,तेंव्हा शेवटच्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी BAJA मधले (ही एक राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी स्पर्धा आहे. ह्या बद्दल सविस्तर नंतर लिहिणार आहेच) अनुभव सांगितले. ह्याचा पण चांगला उपयोग झाला. ही एक नवीन परंपरा सुरु झाली होती आणि पुढेही चालू राहील.
      graphicsचे तास व्यवस्थित सुरु होते. शंका विचारण्यासाठी whatsappचा वापर ही ह्या वर्गाने मला दिलेली अजून एक देन. तोपर्यंत मी शक्यतो whatsappचा वापर विद्यार्थ्यांबरोबर खूप मर्यादित करत होतो. पण नवीन पिढीची ही नवीन पद्धत शिकण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू तेही जमायला लागलं.
      अनेकदा वर्गांवर ज्या विषयावर कायम बोलत होतो तो विषय म्हणजे व्यायाम, आहार, झोप इत्यादी. आहारामध्ये सकाळच्या नाश्त्याचं महत्त्व खूप आहे. तेंव्हा रोज प्रत्येकाने ठरलेल्या वेळेत नाश्ता केलाच पाहिजे असा आग्रह या वर्गात मी धरत होतो. एक ,दोन वेळा तर सकाळी ८ च्या तासाला नाश्ता न करून आलेल्या मुलांना बाहेर जाऊन नाश्ता करून यायला पण सांगितलं. पण विद्यार्थीही शेरास सव्वाशेर होतेच. वर्गात यायला उशीर झाला की नाश्ता करायला गेलो होतो सर. तिथे गर्दी असल्यामुळे उशीर झाला.असं सांगून मला गप्प करायचे..ते आठवून आजही खूप हसायला येतंय.
      मार्च महिन्यामध्ये या वर्गाची पालक बैठक योजली होती (कॉलेजमध्ये असं काही पहिल्यांदाच झालं होतं. नंतर ही कधी झालेलं नाही). तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधल्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी presentation करायचं असं योजलं होतं. वेळेअभावी त्यातलं सगळं जुळून आलं नाही. पण आपला पाल्य पुढच्या तीन वर्षात काय काय करू शकेल याचा एक ठोबळ अंदाज तर सगळ्यांना नक्की आला असेल. त्यानिमित्ताने अनेक पालकांची ओळख झाली. त्यापैकी काहींशी आजही संपर्क टिकून आहे. मिरजेमधेच पण थोडं दूर राहणाऱ्या एक मुलीच्या आईने लांब राहत असल्यामुळे कॉलेजमधल्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायचा म्हणजे संध्याकाळी घरी यायला उशीर होणार आणि मग मुलीला कसं जमणार?” असा प्रश्न विचारला. मलाही नेमकं काय उत्तर द्यावं कळलं नाही. मी इतकाच म्हणालो की, “तुमची मुलगीच पुढच्या वर्षभरामध्ये यावर योग्य उत्तर शोधेल.पुढे तिसऱ्या वर्षात असताना हीच मुलगी अनेक activity मधे उत्साहानं भाग घेत होती. एकदा तिला विचारलं की उशिरा घरी जाताना काय करतेस?” तिनं त्यात काय एवढं ?हा काय प्रश्न आहे का?” अश्या नजरेनं माझ्याकडे पाहीलन. एकंदर समस्या सुटलेली होती एवढं मला कळलं. या वर्गात अरुणाचलप्रदेश मधून आलेली एक विद्यार्थिनी आहे. first year मधे मागे मागे राहणारी ही मुलगी शेवटच्या वर्षाला पोचताना चांगली active झालेली होती.
      दुसऱ्या वर्षीच्या पहिल्या semester मधे या वर्गाला शिकवायला मिळालं नाही. पण एक दोन मोकळ्या तासाला वर्गात जायची संधी मी घेतली. डिप्लोमा करून एकदम दुसऱ्या वर्षाला आलेल्या म्हणजेच DA विद्यार्थ्यांची ओळख या निमित्ताने झाली. नंतर मात्र प्रत्येक semester ला या वर्गाला एकेक विषय शिकवत राहिलो. आधी केलेले काही प्रयोग या वर्गावर परत करत होतो. आधीच्या अनुभवातून त्यात काही बदल करत होतो. open book सारखीच open इंटरनेट परीक्षा एकदा घेतली होती. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात, योग्य ती माहिती शोधून त्यावर सुयोग्य संस्कार करून त्याचा वापर करता येणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे हे या निमित्ताने सगळ्यांना कळावं हा हेतू होता. गटामध्ये किंवा जोडीमध्ये काम करता येणं पण खूप आवश्यक आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे २-३-४-५ चे गट करून काही assignments किंवा test पण घेतल्या. अश्या test देताना मग मार्क किती पडले यापेक्षा test देताना किंवा गटात काम करताना काय काय नवीन शिकलो यावर जास्ती चर्चा होत होती, जे अपेक्षित होतं.
      हा वर्ग third year ला असताना आपण वालचंद मधे शिकवत असलेला हा शेवटचा वर्ग ही जाणीव मला व्हायला लागली होती. त्यामुळेच किंवा ही मंडळी तोपर्यंत जास्ती ओळखीची झाल्यामुळे असेल, जवळ जवळ प्रत्येक तासाला शेवटची पाच मिनिटे काही वेगळ्या विषयावर बोलत होतो. tata motors मधले अनुभव (१० वर्ष जुने असून पण) गोष्ट रुपात सांगताना खूप मजा येत होती. वर्गामध्ये अनेक technical विषयांवर वादविवाद व्हायचे. अनेक basic concept या निमित्ताने समजत होत्या. .
तोंडी / practical परीक्षा पण वेगळ्या प्रकारे घ्यायचा प्रयत्न करून पहिला. Theory of Machines या विषयाच्या तोंडी परीक्षेला प्रत्येक गटाला एक वेगळा problem दिला होता. सायकलपासून ते लेथ machine पर्यंत विविध गोष्टींवर आधारित problem सोडवताना सगळ्यांचा कस लागला होता.  
ऑगस्ट २०१९ मधे सांगलीमध्ये कृष्णा नदीचं पाणी वाढायला लागलेलं होतं , एके सकाळी जनकल्याण समितीचं काम करणाऱ्या श्री. विजय कुलकर्णी सरांचा फोन आला की ७-८ युवक मदतीला हवे आहेत. मी फारसा विचार ना करता या वर्गातल्या एक दोघांना फोन केला. पुढच्या १५-२० मिनिटात मदतीच्या ठिकाणी आम्ही १०-१२ जण कामाला लागलेलो होतो. दोन दिवस असं काम सुरू होतं. तिसऱ्या दिवशी पहाटे माझ्या घराच्या आवारात पाणी पोचलं आणि थोड्याच वेळात घरातही पाणी येणार हे लक्षात आलं. त्या दिवशीचं मदतकार्य सकाळी सव्वा सहा वाजता आमच्या घरी सुरु झालं. सगळ्यांचा मिळून कामाचा वेग इतका जास्ती होता कि क्षणभर पाणी पण वाढायचं थांबलं असावं.  आमच्या इथे पार्क केलेल्या एका चारचाकीची  किल्ली नसताना पण दार कसं उघडता येईल,ती योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी केलेली धडपड यांसारख्या करामती करताना ही मंडळी इंजिनिअर होतायत हे जाणवत राहिलं.चारचाकीत पाणी कोणत्या भागात गेलं तर अधिक नुकसान होईल किंवा ती बंद असताना ढकलण्याची पद्धत सारं विचार करून आणि पटापट निर्णय घेऊन चाललेलं होतं.कारण सगळं आवरून झाल्यावर इतका वेळ शिल्लक होता की प्राचीने केलेला इडल्यांचा नाश्ता सगळ्यांनी आरामात बसून टिव्हीवर पूराच्या बातम्या बघत खाल्ला. आता पाण्याने आमच्या घराचा उंबरा ओलांडला म्हणल्यावर आम्ही घरातले पण बाहेर पडलो आणि मुलांनी मोर्चा वर्गातल्याच आणिक एक-दोघांच्या घरी समान हलवायला वळवला. घरातलं पाणी ओसरल्यानंतर काम सुरू केलं आणि पुढच्या अडीच दिवसात घर परत आधीइतकंच स्वच्छ झालेलं होतं.ह्यावेळी मुलांबरोबर मुली पण मदतीला आल्या होत्या. नंतरचे काही दिवस अनेक घरांमध्ये जाऊन सगळ्यांनीमिळून खूप मदत केली. सांगली जिल्हा नगर वाचानालायामध्ये भिजलेली पुस्तकं आवरण्याच्या कामात पण पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतून  आलेल्या गटाबरोबर कॉलेजमधल्या काही जणांनी काम केलं. पूर प्रकरण ओसरल्यावर सगळ्यांना एकदा जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी मदतकार्य करतानाचे अनुभव सगळ्यांबरोबर share केले गेले. काहीतरी वेगळं केल्याचं समाधान सगळ्यांना नक्कीच मिळालेलं होतं. आपले काँलेज, अभ्यास, करिअर बाजूला ठेऊन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जायचं असतं याचा अनुभव यावर्षीच्या महापूरात माझ्या विद्यार्थ्यांना देता आला हा आनंद आहे.
सातव्या semester मधे याच वर्गाला FEM हा विषय शिकवत होतो. एका शनिवारी सकाळी काही किचकट गणिती भाग समजावून घेण्यासाठी सगळे जमलो होतो. सगळेच जण इतके गढून गेलो होतो की वर्गामध्ये एक कुत्रा कधी वर्गात आला हे कोणाच्याही लक्षात आले नाही. लक्षात आल्यावर मग कोणीतरी कुत्रापण मन लाऊन शिकतोय असा एक फोटो काढला.
स्वतः software किंबा program तयार करण्याची पुढची पायरी म्हणून गटामध्ये एक assignment दिली होती. विषय होता बसायचा बाक. पहिल्या वर्षी बाक दुरुस्त करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास...प्रत्येक semester मधे ह्याच बाकाचा reference घेऊन material selection, strength, stiffness, welding, bolting, aesthetics, ergonomics असे थांबे घेत घेत चाललेला. शेवटच्या थांब्याला बाकाचं  design, त्याचं analysis, material मधे बदल न करता weight reduction, design optimisationपाशी येऊन थांबला. mechanicalच्या एका stream चं एक चक्र पूर्ण झालं होतं.
चक्र पूर्ण झालं तरी प्रवास थांबलेला नाही, थांबूच नये. आतापर्यंतचेहेच सगळे विद्यार्थी,  माजी विद्यार्थी म्हणून काँलेजमधे येतील आणि आपापल्या जुनिअरच्या वर्गात अनुभवकथन करतील, मार्गदर्शन करतील..ही एक process आहे. त्यात माझ्यासारखा शिक्षक केवळ catalist ची भूमिका बजावतो..करावंस वाटलं,वाटतं ते विद्यार्थ्यांना...
     
                                                    अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem