वालचंद डायरीज – भाग ९
वालचंद डायरीज – भाग ९
Industrial Visits
वालचंद कॉलेजमधे येण्यापूर्वी साडेतीन वर्ष टाटा मोटर्स मधे काम केलेलं होतं.
शिकवायला लागल्यावर त्या साडेतीन वर्षातल्या अनुभवांचा खूप उपयोग होत होता.
वेगवेगळे कारखाने विद्यार्थ्यांनी शिक्षण चालू असताना पहिले तर त्याचा खूप उपयोग
होईल असं माझं स्पष्ट मत होतं आणि आहेही. तेंव्हा शिक्षक म्हणून वालचंद मधे दाखल
झाल्यावर विद्यार्थ्यांना विविध कारखाने दाखवायला घेऊन जायला हवं हे मनात पक्कं
होतं.
पहिली संधी पहिल्या महिन्यातच मिळाली. एका प्राध्यापकांनी SY च्या विद्यार्थ्यांची visit ठरवलेली
होती. त्यांनी नियोजन केलेलं होतं. ५० पेक्षा जास्ती विद्यार्थी, त्यात परत १५-१६ विद्यार्थिनी असल्याने त्यांच्याबरोबर आणखी कोणी शिक्षक
जाणं गरजेचं झालं. बाकी कोणी प्राध्यापक कामांमुळे असेल पण तयार झाले नाहीत. मी
तयार झालो. कॉलेजमधे असताना ज्ञान प्रबोधिनीचे अनेक उपक्रम करत होतो आणि त्यात
बऱ्याचदा सहली नेलेल्या होत्या (पैकी पन्हाळा सायकल सहल, शिवथरघळ
ते रायगड ट्रेक, पांडवगडचा मी आणि विजय दोघांनीच केलेला
ट्रेक आणि रायरेश्वरची मुक्कामी सहल या तर विशेष लक्षात राहिल्या आहेत) त्यामुळे
मुलांना बरोबर घेऊन जाणे सवयीचे होते. पण एकतर मी कॉलेजमध्ये नवीन होतो, ही सगळीच मुलं अनोळखी होती त्यामुळे जरा टेन्शन होतं. ४ दिवस, ५ रात्री असा बेंगलोर – म्हैसूर दौरा होता. बेंगलोर
मधे HAL म्युझियम, विश्वेश्वरय्या
म्युझियम, ISCON मंदिर वगैरे भेटी छान झाल्या. तिसऱ्या दिवशी
सकाळी निघून वाटेत एक powder metallurgy संबंधी कंपनी बघून
म्हैसूरकडे निघालो. दिवसभर विशेष दगदग झालेली नव्हती पण सकाळी जेवण झालं नव्हतं.
वृंदावन गार्डनच्या वाहनतळावर बस उभी केली. मी दुसऱ्या गाडीत होतो. बसपाशी पोचलो
तर वेगळंच वातावरण. बरीच मुलं, विशेषतः मुली, दमल्यामुळे बसमधून उतरायला पण तयार नव्हत्या. बरं वाटत नसल्याचं अनेकजण
सांगत होते. बस कुठल्यातरी दवाखान्यातच न्यावी वगैरे चर्चा चालू होती. माझे सहकारी
प्राध्यापक पण दबावाखाली दिसले. दिवसभर लागलेलं ऊन, थोडी
दमणूक, बुडलेलं एक जेवण यामुळे विशीमधल्या मुलांनी एवढं
ढेपाळून जाणं मला पटतं नव्हतं. थंड पाण्याची बाटली, ग्लुकॉन-डीचा
एक पुडा घेऊन मी बसमधे चढलो. एकेकाला पाणी आणि ग्लुकॉनडी देत बस मधून बाहेर काढलं.
हळूहळू करत, “परत वृंदावन गार्डन बघायला मिळणार नाही”
वगैरे सांगत मुलींना पण बाहेर उतरवलं. गार पाणी आणि कलिंगड यांनी
उरलेलं काम केलं. वृन्दावन गार्डनच्या प्रसन्न वातावरणामध्ये मग सगळेच रमले.
उर्वरित दौरा सुरळीत पार पडला. एकंदर शारीरिक क्षमता आणि वेळ पडेल तेंव्हा शारीरिक
क्षमता संपली तरी मानसिक क्षमतेच्या जोरावर रेटून न्यायची प्रेरणा याची चांगलीच
उणीव जाणवली. नुसतं बुद्धिमान असून चालत नाही तर ती बुद्धी वापरायला शरीराने पण
साथ द्यायला हवी ना...काँलेज असो किंवा युवक-युवती कार्यकर्ते असोत,
physical fitness हा फारच गौण मुद्दा वाटतो अनेकांना. वर्गात
बोलताना मी शारीरिक आणि मानसिक क्षमतांबद्दल पुढे अनेकदा बोलत राहिलो.
दुसऱ्या सत्रामध्ये Automobile Engineering विषय
शिकवायला मिळाला. त्याचवेळी ठरवलं कि आता आपण visit घेऊन
जाऊया. Tata Motors सहसा कोणाला visit साठी
परवानगी देत नाही असं कळल्यामुळे मग तिथेच प्रयत्न सुरु केला. HR कडून परवानगी मिळाली नाहीच. मग माझे Tata Motors मधले
वरिष्ठ श्री. अशोक जोशी यांच्या मार्फत प्रयत्न केला. त्यांनी एकदम plant
head कडूनच परवानगी मिळवून दिली. पण इकडे वेगळाच प्रश्न. ८०
मुलांच्या वर्गात फक्त १६ मुलं यायला तयार झाली. नेमकं कारण कळलं नाही आणि त्याचा
जास्ती विचारही केला नाही. (एक तर मी नुकताच join झालेलो आणि
हाताशी फार वेळ पण नव्हता) जी मुलं येतील त्यांना घेऊन जाऊ इतकाच विचार केला. १६
मुलं आणि ४ प्राध्यापक असे एकूण २० चं लोक गेलो. Plant head चे
पाहुणे असल्या कारणाने आम्हाला एकदम royal treatment मिळाली.
खास कारखाना दाखवण्यासाठी केलेल्या उघड्या टपाच्या गाड्यांमधून सगळा कारखाना अगदी
सविस्तर पाहायला मिळाला. प्रत्यक्ष Tata Motors मधे काम करत
असताना पण कधी या गाड्यांमध्ये बसायची संधी मला मिळाली नव्हती. नंतर तिथल्या training
division मधे अनेक working models आणि cut
section models बघून मुलं खुश झाली. परतीच्या प्रवासात नारायणपूरचे
प्रति बालाजी मंदिर पण बघून झाले. एकंदर मी नियोजित केलेली पहिलीच अशी अभ्यास सहल
सुरळीत पार पडली. न आलेल्या अनेक मुलांनी नंतर हळहळ व्यक्त केली. त्यानंतर एक ठरवलं कि चांगलं सुचवून बघायचं पण
सगळं आपणच करायचं नाही. इथून पुढे मुलांचा पुरेसा सहभाग आणि मुलांनी पुढाकार
म्हणजे विशेषतः नियोजनात पुढाकार
घेतल्याशिवाय अशी industrial visit ठरवायची नाही.
२०१० मधेच कॉलेजमधे SAE (Society of Automotive Engineers) INDIA चा collegiate club स्थापन केला. त्यात मग अपोआपच automobile
मधे रस असणारी वेगवेगळ्या वर्गातली मुले–मुली
एकत्र आली. त्यांच्या उत्साहामुळे Piagioबारामती आणि tata
motors पुणे अशा २ visits झाल्या. आधीचा थोडा
याच क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे visit च्या दरम्यान काही
वेगळ्या गोष्टी मला दाखवता येत होत्या. अनेक गोष्टी ज्या मी प्रत्यक्ष नोकरीला
सुरुवात केल्यावर शिकलो होतो त्या विद्यार्थीदशेतच या मुलांना बघायला मिळत होत्या
त्याचा फायदा भविष्यात त्यांना नक्की होणार होता.
२०११ मधे machine design विषय शिकवत होतो. त्याच्या
आधीपासूनच साखर कारखान्यांमध्ये consultancy करायला जात
होतो. Machine design विषयामधल्या खूप गोष्टी
कारखान्यांमध्ये दाखवता येतील असा विचार करून शिरोळच्या दत्त साखर कारखान्यामध्ये
पण एकदा मुलांना नेऊन आणलं. अशा अभ्यास सहलींमध्ये प्रवासात मुलांबरोबर होणाऱ्या
गप्पा हा तर आनंदाचा ठेवा. नवीन पिढीमधली मुलं कसा विचार करतात, एखाद्या घटनेकडे कसे बघतात हे सगळं अश्या गप्पांमधून कळायचं आणि त्याचा
उपयोग मग त्यांच्याशी जास्ती connect व्हायला व्हायचा.(हे
सगळं connect होणं हे ज्ञान प्रबोधिनीत शिकताना वर्ग मार्गदर्शक,दलांवरील दादा करत असलेलं अनुभवलं होतं. फक्त ज्ञानप्रबोधिनीच्या बाहेरील
गटात असे उपक्रम घेताना विशेष कस लागतो.)
२०१२-१३ मधे परत एकदा automobile engineering विषय
शिकवायला मिळाला. मग २ किंवा ३ दिवसांची visit घेऊन जाऊया
असं वाटलं. कमी प्रवास, जवळ जवळ २-३ चांगले कारखाने आणि
एखादं पर्यटन स्थळ असं सगळं कुठे मिळेल? पुणे, मुंबई औरंगाबाद ,नाशिक ही सगळी गर्दीची ठिकाणं नकोत.
मग... शोध घेणं चालू होतं. गोव्यामध्ये बस तयार करायचा ACGL कंपनीचा
कारखाना आहे हे माहित होतं. त्यांना संपर्क केला. मग त्याच मार्गावर धारवाड. तिथे tataचे काही कारखाने आहेत हे समजलं. संपर्क मिळवणे, त्यांना
एकदा दोनदा मेल पाठवणे, फोने करणे ह्या सगळ्यात मार्च महिना
उजाडला. मार्च अखेर कामाचा ताण असल्यामुळे तिकडून एप्रिल मधली परवानगी मिळाली. ५७
विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आंतरराज्य प्रवास असल्याने मोठ्या बसला रोड tax
खूप जास्ती पडतो. त्यामुळे ४ टेम्पो traveller मधून प्रवास करायचं ठरवला. एक मुक्काम धारवाडला आणि एक गोव्यामध्ये,
पहिल्या दिवशी एक कारखाना, संध्याकाळी एक museum
, दुसऱ्या दिवशी एक कारखाना, तिसऱ्या दिवशी
गोवा - समुद्र चर्च वगैरे असा बेत आखला. माझ्या बरोबर अर्थातच अजित पाटील सर होतेच
त्यामुळे बाकी काळजी काही नव्हती. खूप मस्त गेले ३ दिवस, काही
“विशेष” कारणामुळे तो सगळा वर्गच
त्याआधीचे ४ महिने थोडा तणावाखाली होता (यावर स्वतंत्र लिहावं असाच तो विषय किंवा
घटनाक्रम असल्याने पुढे कधीतरी सविस्तर लिहीनच). या visit मुळे
तो ताण कमी व्हायला पण मदत झाली. Tata Motors चा Tata
Ace तयार करायचा कारखाना, Tata Marcopoloकंपनीचा
बस तयार करायचा कारखाना आणि एक science museum असे
ज्ञानवर्धन आणि समुद्रावरची भरपूर मजा !
दरवर्षीच सांगलीतल्या सांगलीत मुलांना चंदनवाडी येथील ST चं Divisional Workshop दाखवायला घेऊन
जायचो. ही परंपरा वरिष्ठ प्राध्यापक श्री. भिडे सर ह्यांनी सुरु केलेली होती. मी
तेच पुढे चालू ठेवले. भिडे सर प्रत्येक visit ला
जाण्यापूर्वी तिथे काय बघावं हे मुलांना सांगत असत आणि काही प्रश्न पण देत असत. ती
कल्पना खूपच छान होती. काही वेळा ती अमलात आणायचा मी पण प्रयत्न करत होतो. ST
Divisional Workshop मधले एक जण खूप छान माहिती द्यायचे. एखादा ST
चा चालक त्याला आलेली समस्या कशी सांगतो, तेच technical
भाषेमध्ये रुपांतरीत करून नेमकी समस्या काय हे कसं ठरवलं जातं आणि
मग प्रत्यक्ष काम झाल्यावर रिपोर्ट कसा लिहिला जातो. हे ऐकणं ही होऊ घातलेल्या
एखाद्या Engineer साठी खूप महत्त्वाची प्रक्रिया होती. इतर
ठिकाणी बघता येणार नाहीत अशा अनेक गोष्टी इथे बघायला मिळायच्या. २०१७ पर्यंत हे
चालू होतं. पण खरी संस्मरणीय ठरली ती २०१५ मधली धारवाड गोवा visit!
२०१५ मधे परत एकदा धारवाड-गोवा अशी visit ठरवली.
यावेळी मी आणि सुहास जगताप सर मिळून विषय शिकवत होतो. Visit ठरवण्यात
मुलांचा उत्साह थोडा कमी होता त्यामुळे ३०च मुलं येणार होती. पण त्यामुळे बाकी
व्यवस्थापनाचा ताण कमी होता. नियोजनाच्या हालचाली पटपट होत होत्या. त्यामुळे कमी
वेळात जास्ती गोष्टी बघता येणार होत्या. कॉलेजमधली परवानगी आणि कंपनीकडून परवानगी
वगैरे असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. २ वर्षांंपूर्वीचा अनुभव आणि संपर्क
असल्याने मुक्कामाची व्यवस्था पण सहज झाली. पण असं सहज काही झालं तर काय मज्जा
ना.. काही अडचणी येतात तर काही उभ्या केल्या जातात. अशी visit ठरलेली आणि सगळं पद्धतशीरपणे चाललेलं एका प्राध्यापक महाशयांना बघवलं
नाही. मग त्यांनी त्यांच्या project group चा project
review आमच्या visit च्याच दिवशी ठेवला. त्या project
group गटामधल्या ३ मुली visit ला येणार
होत्या. मुलींनी खूप विनंती करूनही त्या प्राध्यापकांनी project review ची तारीख बदलली नाही. ८व्या semester मधे project
ला जास्ती credit असल्याने project
review बुडवून visit ला येणे तर शक्यच नव्हते.
हे मुद्दामच केलेलं आहे हे आम्हाला लगेचच कळल्यामुळे आम्ही बोलूनही काही उपयोग
होणार नव्हता. पण असं गप्प बसणं किंवा एकदम संचालकांकडे जाणं योग्य वाटलं नाही.
काहीतरी उपाय काढायचाच असं मनाशी ठरवलं. संध्याकाळचे ५ वाजले होते आणि दुसऱ्या
दिवशी सकाळीच जायचं होतं.
एवढ्यात Tata Marcopoloकंपनीमधून फोन आला कि
त्यांच्या कंपनीमध्ये अचानक कामगारांचा संप सुरु झालाय त्यामुळे उद्याची आम्हाला
दिलेली परवानगी रद्द केली आहे. आता काय करायचं ? Tata Motors मधले श्री नंदकुमार घुले ह्यांना फोन करून विनंती केली कि अजून दुसऱ्या
कुठल्या कंपनी मधे परवानगी मिळेल का?एकीकडे जगताप सर पण
त्यांच्या संपर्कातून प्रयत्न करत होते. २ तासांच्या प्रयत्नानंतर एकदम दुहेरी यश
मिळालं. एकीकडे धारवाड मधल्याच Tata Hitachi कडून परवानगी
मिळाली तर दुसरीकडे बेळगाव मधल्या AshokaIronsकडून परवानगी मिळाली. त्या तीन मुलींची समस्या अजून सुटली नव्हती. त्याचाच
विचार करत घरी गेलो. रात्री उशिरा अचानक जगताप सरांचा फोन आला. त्यांच्या घरी
कोणाला तरी अचानक दवाखान्यात दाखल केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर
शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यामुळे जगताप सरांना visit ला येणं शक्य नव्हतं. एक एक करत अडचणी समोर येत होत्या. पाटील सर आणि
आडमुठे सर दोघंही सांगली मधे नव्हते. अन्य कोणी यायला तयार होत नव्हतं. एकट्याने
३० मुलांना घेऊन जाण शक्य होतं पण इतक्या अडचणी आधीच आलेल्या असताना आणखी काही
अडचण आली तर एकाला दोघं असणं गरजेचं होतं. शेवटी राहुल चनमनवार सर तयार झाले पण
त्यांना एकच दिवस जमणार होतं. उरलेल्या २ दिवसांचा काय? परत
एकदा विचार विनिमय करण्यासाठी पाटील सरांना फोन केला. ते दुसऱ्या दिवशी दुपारी
मोकळे होणार होते. आणि रात्रीपर्यंत धारवाडला पोचू शकले असते. चला, म्हणजे तो ही प्रश्न सुटला. त्यांच्याबरोबर बोलूनच मग आणखीन एक योजना केली
आणि तूर्तास ती गुप्तच ठेवली!
ठरल्याप्रमाणे सकाळी निघालो. बेळगावमधे AshokaIronकंपनी ची बरीच युनिट आहेत. आम्हाला परवानगी मिळालेल्या ठिकाणी वेळेत
पोचलो. महाराष्ट्रामधून आमचा कारखाना बघायला येणारे तुम्ही पहिलेच आहात असं
त्यांनी स्वागत करताना सांगितलं आणि त्यामुळे खूप कौतुकानं त्यांनी सगळा कारखाना
दाखवला. तिथूनच चनमनवार सर परत फिरले आणि आम्ही धारवाडकडे सरकलो. दुपारी ३ वाजता
पुढील ठिकाणी पोचायचं असल्याने जेवायला वेळ मिळाला नाही पण कुणीही ढेपाळू नये याची
आधीच्या अनुभवामुळे योग्य ती काळजी घेऊन ३ वाजता TataHitachiकंपनीमध्ये पोचलो. खूप आयत्यावेळी ह्यांच्याकडून परवानगी मिळवलेली
असल्याने थोडी धाकधूक होती. Earth moving Equipmentsबद्दल
मलाही फारशी माहिती नव्हती त्यामुळे खूप नवीन बघायला मिळालं आणि सगळ्यांनी
विचारलेल्या प्रश्नांवर तिथली मंडळी फारच खुश झाली. त्या दिवशी दुपारपर्यंत पाटील
सर सांगलीतून निघू शकतील ना अशी चिंता होती. पण एकदा ते निघाले आहेत हे कळल्यावर
जीवात जीव आला !! संध्याकाळ धारवाड मधल्या एका बागेत घालवून मुक्कामी पोचलो. पाटील
सर येणार आहेत हे मी सोडून कोणाला माहिती नव्हते. त्या वर्गाचे ते आवडते शिक्षक
असल्याने जरा surprise देऊ असा बेत होता. रात्री साडे दहा
वाजता सर पोचले. नुसते सर पोचले असं नाही तर ते आणखीन एक surprise घेऊन पोचले. ज्या तीन मुलींना त्यांच्या guide च्या
हट्टामुळे सकाळी येता आलं नव्हतं त्या तिघी पण सरांबरोबर आल्या होत्या. सकाळी project
चा “so called” review झाल्यावर त्या
दुपारच्या रेल्वेने सरांबरोबर आल्या होत्या. आधीच तसं ठरवलेलं होतं आणि तो बेत
गुप्त ठेवला होता. अर्थात यात मुलींचं कौतुक आहेच आणि त्यांच्या पालकांनी परवानगी
दिली हे पण खूप विशेष वाटलं!
पाटील सरांनी ठरलेल्या वेळेत रेल्वे पकडणं, मुलींनी
देखील आपापलंच जायचंय असं ठरवून घरून एकटं जाण्यासाठी परवानगी मिळवणं आणि मग
चौघांनी मिळून धारवाड मुक्कामी आम्हाला येऊन मिळणं. हे आत्ता वाचताना वाटतंय तितकं
सहज, सोपं नव्हतं. सहलीचे पुढचे २ दिवस ठरल्याप्रमाणे सगळं
व्यवस्थित झालं. यातून २-३ खूप महत्त्वाच्या गोष्टी मात्र शिकलो. कुठल्याही
अडचणींवर मात करता येते. हक्काने मदत मागता येईल असे मित्र असले कि प्रत्येक
अडचणीकडे संधी म्हणून बघता येते. लोक तुमच्या कामात मुद्दाम अडथळे आणायला लागले कि
समजावं आपण योग्य मार्गावर आहोत. अडथळे आणणाऱ्या लोकांना जास्ती भाव ना देता
बाजूला सारता आलं की झालं (हे मी नंतर सुद्धा अनेकदा अनुभवले). या प्रसंगात पण
त्या तिघींची (पुढे गमतीने मी त्यांना त्रिदेवी म्हणायला लागलो!) किमान २ दिवसांची
visit तरी सुखरूप पार पडली, project review पण पार पडला, आपलं आपलं नियोजन करून प्रवास करायचा
अनुभव पण मिळाला (कारण रेल्वेमध्ये बसेपर्यंत पाटील सर त्यांच्या बरोबर असणार आहेत
हे त्यांना पण माहित नव्हतं) आणि यात अडवणूक करणाऱ्यांपर्यंत योग्य तो message
सुद्धा गेला असेल यात शंकाच नाही. अश्या प्रत्येक वेगवेगळ्या
घटनांमुळे ते ते विद्यार्थी/ विद्यार्थिनी
चांगले मित्र होत गेले. “ह्या कोण धाडसी मुली आहेत?एकदा घरी तरी बोलाव.” या प्राचीच्या आग्रहामुळे
शेवटची परीक्षा(B.Tech final exam) झाल्यावर
त्यांचे घरी आगमन झाले आणि मग पुढे त्या घरातल्याच झाल्या. आज सुद्धा भारतात किंवा
भारताबाहेर असल्या तरी आणि आता त्यांची लग्नं झाल्यानंतर सुद्धा हे नाते तसेच दृढ
आहे! काहींचा अभ्यास हाँस्टेलवर नीट होत नाही म्हणून, तर कधी
कारखान्यातून यायला उशिर झाल्याने मेस बंद झाली म्हणून, कधी Baja,
Efficycle च्या निमित्ताने तर कधी कुणाचं चक्क डिटेक्टीव्ह लिखाण
आवडलं म्हणून, कारणं अनेक लहान मोठी पण अनेक प्रसंगात जे
विद्यार्थी घरी आले ते आमच्यासाठी तरी घरचेच झाले. चांगल्या वाईट प्रसंगात हक्काने
घरी येत राहिले.(अगदी गेल्यावर्षी च्या महापूरात पण मुलं घरी मदतीला आली. पण तो विषयही मोठा आहे परत कधीतरी सविस्तर
लिहीन त्यावर) बरेच विद्यार्थी आजही संपर्कात राहिलेत.माझ्या मुली गमतीने
म्हणायच्या,"खास बेत आहे म्हणजे बाबांची मुलं येणार
आहेत का?" काँलेजमधल्या शेवटच्या २-३ वर्षांमध्ये तर
शेवटची परीक्षा संपली की गप्पा आणि खाणे असा कार्यक्रम आमच्या घरी अनेकदा झाला.
काही विद्यार्थी तर कॉलेज मधून बाहेर पडल्यावर पण भेटायला म्हणून घरी येत राहिले.
Industrial visit म्हणजे मेकॅनिकल industry, मशीन, हत्यारे, त्यातलं नवनवीन
तंत्रज्ञान समजून घेण्याला फार महत्त्व आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांना बघता यावं
हा हेतू त्यात असे पण केवळ तेवढाच सीमित हेतू नसे. अशा visits साठी नियोजन करतात कसं, official mails पाठवणे,
परवानग्या, राहण्याची सोय, संपूर्ण गट म्हणून प्रवासात कसा विचार करायचा हे सारं विद्यार्थ्यांना
समजावं, शिकायला मिळावं हा उद्देशही असे. मोठ्या कारखान्यात अनेकांनी अनुभव घेतला असेल
की, साहेबांना कळत नाही ते हेल्परलाही पटकन समजतं. कारण
त्याचा प्रत्यक्ष अनुभव. मेकॅनिकल इंजिनिअरर्सना
घेतलेल्या शिक्षणामुळे मशीन्स समजून घेणं 'मशीनचं
बोलणं' (बिघाड आणि तांत्रिक गोष्टी) जमेलही पण मशीनच्या मागं
उभं राहून काम करणाऱ्या 'माणसाला' समजून
घेणं, त्याचं बोलणं समजणं यासाठी देखील हा industrial
visit चा खटाटोप.
(२०१५-१६ नंतर मात्र industrial visit साठी
विद्यार्थ्यांना घेऊन परगावी जाणे झाले नाही. परंतु Baja, Efficycle,
Efficarअश्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांबरोबर अनेक प्रवास केले.
त्याबद्दल नंतर सविस्तर लिहीनच.)
Comments
Post a Comment