वालचंद डायरीज् – भाग १५


वालचंद डायरीज् भाग १५
वर्गापलीकडे शिक(व)ताना – २
      आज विचार करताना वालचंद मधल्या माझ्या कारकिर्दीचे तीन महत्त्वाचे टप्पे स्पष्टपणे जाणवत आहेत.
टप्पा १ - पहिली ४ वर्ष-- फेब्रुवारी २००९ ते  डिसेंबर २०१२ पर्यंत ह्यात नवीन विषय शिकवण्यासाठी तयारी करणे, वर्गाध्यापानाचे तंत्र शिकणे आणि नव्या उत्साहात काही उपक्रम सुरु करणे.
टप्पा २ जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत शिक्षणाविषयीचा जास्ती systematic विचार करून नवे प्रयोग केले.  सुरु केलेले अनेक उपक्रम नियमितपणाने चालू ठेवण्यासाठी धडपड केली.
टप्पा ३ जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ अशी शेवटची तीन वर्षे या कालावधीत मुख्यतः ३ नवीन गोष्टी केल्या. १) आधी केलेले काही प्रयोग परत परत करून पहिले २) २ नवीन विषय शिकवायला घेऊन वेगळ्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. ३) एकाच वर्गाला पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकवत जाण्याचा प्रवास
      इतके दिवस परिच्छेद स्वरुपात लिहिणारा मी आज अचानक असा मुद्देसूद कसा लिहायला लागलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण लिहिण्यासारखं खूप आहे आणि कमी शब्दात सगळा पट मांडायला असं वर्गीकरण करून मांडणी करणं जास्ती सोपं वाटलं. पहिल्या २ टप्प्यांमधल्या काही आठवणी / अनुभव आधीच्या काही भागांमध्ये लिहिले आहेत. आज आणि उद्या, शेवटच्या टप्प्यामधले काही अनुभव आणि आठवणी लिहिणार आहे.  
      machine design हा एकच विषय मी अनेक वर्ष (मधे १-२ वर्ष खंड होता) शिकवत होतो. या विषयात बाकीच्या अनेक विषयांना स्पर्श करावा लागतं असल्याने engineer म्हणून एक बैठक तयार व्हायला या विषयाची चांगली मदत होऊ शकते. वर्गात विषय शिकवण्याची आणि परीक्षा घेण्याची काही वेगळी तंत्रे या विषयामध्ये वापरून पहिली.

वर्गामधली उपस्थिती हा पण असाच एक वादग्रस्त विषय. मी विद्यार्थी असताना खूप कमी वेळा lecture ला उपस्थित असायचो. त्यामुळे शिक्षक झाल्यावर विद्यार्थ्यांना उपस्थितीविषयी सक्ती करण्याचा मला नैतिक अधिकारच नव्हता. कॉलेजच्या नियमाप्रमाणे ७५% उपस्थिती आवश्यक असायची. पण माझ्या तासाला बसूनच विषय शिकता येतो आणि आपला आपला अभ्यास करून शिकता येत नाही ह्यावर माझा मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे मुलांकडून फार नियम मोडला जाणार नाही इतपत काळजी फक्त घ्यायचो. online attendance system आल्यावर पण प्रत्येकानी आपापली उपस्थिती मांडायची सुविधा त्यात होती आणि तेवढं स्वातंत्र्य मी सगळ्यांना दिलेलं होतं. इतकं सगळं करूनही वर्गात जवळ जवळ सगळेच उपस्थित असायचे. एक दोन वेळा तर  मी म्हंटलं पण की तुम्हाला आपापला अभ्यास करता येत नाही म्हणून तुम्ही तासाला बसता.
यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा एक मोठा सार्वजनिक प्रश्न होता,अनेक ठिकाणी असेल. Autonomous कॉलेज मधे जो शिक्षक शिकवणार तोच पेपर काढणार आणि तोच तपासणार. कुठलाही शिक्षक वर्गात शिकवलेल्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर मग फक्त तासाला बसायचं, वेगळा अभ्यास करायला नको. पण यामध्ये स्वयंअध्ययन किंवा “Learning to learn” या महत्त्वाच्या गोष्टी राहूनच जातात. यावर उपाय म्हणून मग एक पूर्ण module मी वर्गात शिकवणार नाही असं जाहीर करून टाकलं.
या topic चा अभ्यास स्वतः करता येतो याचा अनुभव मी आधी (विद्यार्थी असताना ) घेतलेला होता. थोडं विषयांतर करून सांगतोच. आमच्या वेळी सेमिस्टरच्या शेवटी एक अंतिम परीक्षा असे...आम्ही सगळा अभ्यास परीक्षेच्या आधीच्या सुट्टीमध्ये म्हणजे PL मधे करायचो. तेंव्हा त्यामुळे वेळ अर्थातच कमी पडायचा आणि  काही topic हमखास option ला टाकावे लागायचे. हा topic पण मी असाच option ला टाकलेला होता. पेपर च्या काही दिवस आधी मित्राकडे जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आणि पेपरच्या दिवशी अंतिम तयारी करायची अशी पद्धत होती. जुन्या प्रश्नपत्रिका बघताना लक्षात आलं की या topic वर compulsory प्रश्न पडतो आहे. मग काय पेपर च्या दिवशी पहाटे ४ वाजता उठून अभ्यास केला  आणि पेपर मधे जाऊन तो कंपल्सरी पडणारा १७ मार्क चा प्रश्न सोडवून आलो. अभ्यासाची ही पद्धत १००% चूकच होती. पण असा आयत्यावेळी आपापला अभ्यास करता येतो याचा आत्मविश्वास निर्माण झालेला होता कारण मी खूप आधीपासूनच स्वयंअध्यन कौशल्य शिकलो होतो,वेळोवेळी वापर करत होतो आणि त्याचा पुढे खूप उपयोग पण झाला, अजूनही होतोय.
माझ्या विद्यार्थ्यांनी जास्ती नेटकेपणाने स्वयं अध्ययन करावं असं वाटत असल्यामुळे  वेगळा बेत आखला. एका शनिवारी सगळ्या वर्गाने एकत्र बसून त्याचा अभ्यास करायचा. आदल्या दिवशी पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं पण अभ्यासाला उपयुक्त साहित्य सगळ्यांना दिलेलं होतं. २-३ तास सगळ्यांनी वाचन, समजावून घेणे, notes काढणे असं करत त्या module चा अभ्यास करायचा आणि शेवटी १५ मिनिटांची एक छोटी परीक्षा (परीक्षेचा उपयोग आपल्याला किती कळलंय हे समजण्यासाठी, तेंव्हा मार्क किती पडले ह्याला महत्त्व दिलेलं नव्हते-) अशी Guided -Self Study पद्धत वापरली. नंतरच्या काळात GATE चा अभ्यास करताना या अभ्यास पद्धतीचा उपयोग झाल्याचं काहींनी सांगितलं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी ही पद्धत वापरत गेलो. आपलेच यशस्वी प्रयोग परत परत करण्यात एक वेगळीच मजा असते.
विभागामध्ये विषय वाटपावरून होणारे वाद आणि राजकारण याबद्दल मागे लिहिलं आहेच. पण आता हळूहळू आम्ही काही सहकारी त्या सगळ्याच्या पलीकडचा विचार करायला लागलो होतो. आपापल्या विषयांमध्ये प्रभुत्व मिळवल्यावर नवीन विषय ठरवून शिकवायला घ्यायला लागलो होतो. आडमुठे सरांनी Industrial Engineering विषय शिकवायला सुरुवात केली. पाटील सरांनी mechatronics विषय शिकवायला सुरु केला त्याची कथा सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. एकदा आम्ही कारखान्यामध्ये गेलेलो होतो. batch type centrifugal machine नावाच्या machine मधे खूप किचकट elctronic circuit वापरलेलं असतं. त्या दिवशी काही केल्या त्या circuit मधला problem सुटला नाही आणि ते machine सुरु झाले नाही. आम्हाला पण त्यातले काही कळत नव्हते. परत येताना त्यावर चर्चा झाली. हे तंत्र आपण शिकले पाहिजे आणि त्यासाठी त्या संदर्भातला mechantronicsविषय शिकवायला घेतला पाहिजे असं पाटील सरांनी ठरवलं. पुढची तीन वर्ष स्वतः खूप अभ्यास करून तो विषय त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
मी पण मग अशीच प्रेरणा घेऊन शिकवायला थोडा अवघड असलेला Finite Element Method (FEM) हा शेवटच्या वर्षाचा आणि Advanced Strength of Materials हा दुसऱ्या वर्षाचा विषय शिकवायला घेतला. FEM हा प्रत्यक्ष industry मधे खूप वापरला जाणारा विषय.त्यासाठीची अनेक software पण उपलब्ध आहेत आणि software वापरता आले म्हणजे विषय आला असा गैरसमज खूप लोकांचा आहे. पण software हे एक tool आहे आणि त्या tool मधे वापरलं जाणारं गणित आणि विज्ञान कळलं तरच ते tool योग्य प्रकारे वापरता येतं.. इतकंच नव्हे तर त्यातलं गणित आणि शास्त्र कळलं तर software आपापलं पण बनवता येऊ शकतं.  हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन शिकवायला सुरुवात केली. बरेचदा गणित स्वतंत्रपणे शिकवलं जातं आणि प्रत्यक्ष इंजिनिअनरिंग मधले विषय स्वतंत्र. ह्यांची योग्य ती सांगड घालता आली की खरा engineer तयार होतो. हे सगळं बोलायला सोपं वाटतंय. पण अभ्यासक्रमाची चौकट आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन हे सगळं effectively पोहोचवणं हे चांगलंच जिकिरीच होतं. काही विद्यार्थ्यांनी हे enjoy केलं आणि काही जणांना अवघड गेलं. मात्र विषयातल्या एका छोट्या सोप्या भागावर गटामध्ये software तयार करायची assignment सगळ्यांनी खूप मनापासून केली. त्या नंतरची २ वर्षे हाच विषय परत विद्यार्थ्यांना शिकवला आणि त्यामुळे माझा मलाच शिकायला मिळाला. तिसऱ्यांदा शिकवत असताना ही सगळी प्रक्रिया बरोबर दिशेने चालली आहे ह्याचा आत्मविश्वास आला. त्याच दरम्यान AICTE ने प्रसारित केलेल्या model syllabus मधे या विषयाची मांडणी मी ज्या प्रकारे शिकवत होतो साधारण तशीच केलेली पहिली आणि खूप आनंद झाला. वाटलं वा! आपण नेमकेपणाने ,मॉडेल सिलँबसचा विचार आधीच करू शकलो तर..        
दुसरा विषय Advanced Strength of Materials हा विषय एकदम विरुद्ध, पूर्णपणे mathematical. सुदैवाने elective विषय असल्याने कमी विद्यार्थी या वर्गात असायचे. किचकट गणित शिकत असतानाच त्याचं प्रत्यक्षामधलं application शोधून वर्गात ते समजावून सांगणे हे बरंच जड गेलं. अवघड विषयाचा अभ्यास करायचा तर सगळ्यात चांगला मार्ग तो विषय दुसऱ्याला शिकवायचा. असाच प्रयोग एकदा केला. वर्गातल्या ५-६ जणांना काही कारणाने शिक्षा करायची वेळ आली. मग त्या ६ जणांनी मिळून एक topic वर्गात शिकवायचा अशी शिक्षा केली. खूप छान तयारी करून त्यांनी शिकवलं. शेवटच्या टप्प्यात काही शंका निरसन करायला मी मदत केली पण ९५% भाग त्यांनी केला. त्यावेळी जरी शिक्षा वाटली असली तरी नंतर त्यातल्या जवळ जवळ प्रत्येकानं सर शिकवायला मजा आली.असा feedback दिला. या विषयाला ठरावीक असं पाठ्यपुस्तक नव्हतं त्यामुळे परीक्षेच्या वेळी अभ्यास कशावरून करायचा हा प्रश्न पडायचा. मग ५-५ च्या गटामध्ये एकेका module च्या notes तयार करायची assignment दिली. नंतरच्या एका तासाला आपणच काढलेल्या १०-१५ पानी notes वरून १ पानी संक्षिप्त नोट  तयार करा असं सांगितलं. प्रत्येक गटानी केलेल्या अश्या notes नंतर स्कॅन करून सगळ्यांना दिल्या. अभ्यासाची ही पद्धत GATE , IES वगैरे परीक्षांसाठी नक्की खूप उपयोगी पडेल.
वालचंद काँलेजमधे येणाऱ्या हुषार मुलांनी केवळ वर्गात शिकवले जाईल त्यावर समाधान मानावे की पडलेल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी  स्वतःचा अभ्यास करावा..मग स्वतः अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय ?त्यासाठीचा मी केलेला हा खटाटोप..
( आता खटाटोप म्हंटलं की एका दिवसाची गोष्ट नाही, अर्थातच एका लेखात हे सांगून संपणार नाही.. तेंव्हा या खटाटोपाची उरलेली कथा उद्या.)

                                                    अमर परांजपे


Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem