वालचंद डायरीज् – भाग १४

वालचंद डायरीज् भाग १४
वर्गापलीकडे शिक(व)ताना -१
      शीर्षक थोडं वेगळं वाटतंय ना? पण हो, वर्गापलीकडे म्हणजे, वर्गाच्या विषयापलीकडे आणि वर्गाच्या भिंतींपलीकडे. अश्या वर्गांच्या सीमा ओलांडल्या की शिक्षक- विद्यार्थी असं द्वैत उरत नाही. सगळेच त्या शिक्षण प्रक्रियेचा एक भाग बनतात आणि नवनवीन गोष्टी शिकायला लागतात. अर्थात, वर्गातला विषय शिकवत असताना सुद्धा शिक्षकाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत असतातच.
      वर्गात नेमून दिलेला विषय शिकवणं हे तर शिक्षकाचं पाहिलं कर्तव्य आहेच. पण त्यापलीकडे पण विविध गोष्टींविषयी बोलणं, अनुभव share करण हे ही शिक्षकांनी केलं पाहिजे. माझ्या सुदैवाने शाळेमध्ये असे अनेक शिक्षक अनुभवले होते की जे आपला विषय उत्तम शिकवत होतेच पण त्या बरोबरच आमचं अनुभव विश्व मोठं करण्यासाठी प्रयत्नशील होते. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मैदानावर कबड्डी शिकवताना त्यातलं physics सांगणारे आणि वर्गात physics शिकवताना कबड्डीमधले त्याचे application शिकवणारे डॉ. विवेक कुलकर्णी सर आजही आठवतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर कायमच असतो. पण हे कॉलेज मधे शक्य होईल का?
      त्याची पहिली पायरी म्हणजे आपला विषय उत्तम शिकवता येणे. एकदा तुम्ही तुमचा विषय चांगल्या प्रकारे शिकवत आहात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की अन्य गोष्टी ऐकायची पण त्यांची तयारी असते. आपला विषय कधीच शिकवायचा नाही आणि संपूर्ण तासभर बाकीचं तत्वज्ञान सांगत राहायचं, असं करणारे पण काही शिक्षक असतात आणि वालचंद मध्ये सुद्धा आहेत हे सांगणे न लगे! विद्यार्थीच अश्यांना काय ते जोखून असतात.
      काहीसा अनुभव मी कॉलेजमधे विद्यार्थी असताना जेंव्हा १०वी मधल्या हुशार मुलांना NTS परीक्षेसाठी मार्गदर्शन करत होतो तेंव्हा घेतला होता. ते सगळे आणि कदाचित त्यांचे पालकही मी कसा शिकवतो ह्या बरोबरच त्यावेळी माझा कॉलेज मधला academic performance कसा आहे ह्यावर लक्ष ठेऊन होते. अर्थात त्यावेळी पडलेल्या उत्तम मार्कांचा उपयोग त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढण्यासाठी आणि माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी झाला होता.
कॉलेजमधे शिकवायला लागल्यावर पहिल्या २-३ वर्षांमध्ये विषय शिकवणं चांगलं जमायला लागलं, म्हणजे असं मला वाटायला तरी लागलं. मग कधीतरी एखाद्या तासाला ५-१० मिनिटं अन्य विषयांबद्दल, त्या दिवशी आलेल्या एखाद्या बातमीबद्दल वर्गात बोलायला लागलो. असंच एकदा आरोग्य ह्या विषयावर एका वर्गात बोललो होतो. मुलींनी  व्यायाम करणं किती गरजेचा आहे आणि हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखण्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे. ह्याचा चांगला परिणाम झालेला दिसला. वर्गातल्या काही मुली तरी पुढचे थोडे दिवस व्यायाम करायला लागल्या होत्या. अर्थात हा विषय एकदा बोलून संपणारा नाहीच! मग जेंव्हा जेंव्हा प्रसंग आला तेंव्हा शारीरिक तंदुरुस्तीबद्दल बोलत राहिलो. आणि मग बोलायचं तर आधी केले पाहिजे ह्या उक्तीप्रमाणे मी ही स्वतःच्या फिटनेस बद्दल नव्याने सजग होत राहिलो.    
असे वेगळे अनुभव share करायचे असतील तर थोडा जास्ती कालावधी त्या विद्यार्थी गटाबरोबर घालवलेला असावा लागतो. २०१३-१४ मधे दुसऱ्या वर्षाचे विषय शिकवायला सुरुवात केल्यावर अशी संधी जास्ती मिळायला लागली. गप्पा मारता येतील असे अनेक अनुभव घेतलेले होते पण १०-१५ वर्षांपूर्वी घेतलेले अनुभव शिळे तर वाटणार नाहीत ना अशी शंका कायम मनात असायची. २०१४ आणि २०१५ मधल्या जून महिन्यांमध्ये १०-१० दिवस आसाम आणि अरुणाचल प्रदेशामधे तिथल्या काही विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यासाठी तिकडे  जाण्याची संधी मिळाली. तो प्रदेशच विलक्षण आहे. चहाचे मळे, ब्रह्मपुत्रा नदी, oil refinery, विवेकानंद केंद्राच्या शाळा, म्यानमार सीमा असं खूप काही अनुभवलं.  हे सगळं वर्गात बोललं पाहिजे असं प्रकर्षानं वाटलं. जुलै २०१५ मधे नवीन सत्र चालू होताना पहिल्या तासाला एका वर्गामध्ये त्या दोन्ही प्रवासांविषयी आणि अनुभवांविषयी फोटो वगैरे दाखवून खूप सविस्तर बोललो. असे काही वेगळे अनुभव घेतले पाहिजेत, त्यासाठी सुट्टीचा उपयोग केला पाहिजे हे तरी त्यानिमित्ताने पोचवू शकलो.
      माझे अनुभव share करत असतानाच कधीतरी मुलांच्या अनुभाविश्वामध्ये पण डोकावता यायला लागलं. एका वर्गाला दुसऱ्या वर्षी दोन्ही सत्रांमध्ये शिकवलेलं होत. परत तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रात पण शिकवणार होतोच. सवयीप्रमाणे पहिल्या तासाला CR कोण हा प्रश्न विचारला? वर्गात शांतता. आधीच्या CR ने  काही वादामुळे राजीनामा दिलं आहे आणि नवीन CR कोण हे ठरलेलं नाही असं समजलं. पुढचे काही दिवस मग त्या वर्गामध्ये निवडणुकीचे वारे वाहत होते. २ विद्यार्थ्यांमध्ये चुरस होती. त्यात मुलींनी आपली नवीन आघाडी उघडली. प्रत्यक्ष गुप्त मतदान सुद्धा झाले. मधल्या काळात नेमकं काय काय झालंय ह्याचा मी अभ्यास केला. वर्गामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे गट पडून भांडणं झालेली होती आणि त्यातूनच सगळा प्रकार सुरु झालेला होता हे लक्षात आलं . निवडणुकीचा प्रचार पण regional झालेला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर करायच्या दिवशी या संबंधी बोललो, असं होणार असेल तर ते वालचंद कॉलेजला कसं शोभून दिसत नाही वगैरे वगैरे. आणि निवडणुकीची सगळी प्रक्रियाच रद्द करायचा निर्णय सर्वानुमते घेतला गेला आणि पुढंच वर्षभर आधीच्याच विद्यार्थ्याने CR म्हणून उत्तम काम केले. माझं तेंव्हाचं बोलणं मुलांना पटलं का? सगळ्यांना त्यावेळी पटलंच असेल असं नाही. पण काही वाईट प्रथा चालू होण्यापासून रोखायला वर्गातले बहुतांश तयार झाले.
      हा जसा वर्ग म्हणून अनुभव तसाच एक वेगळा प्रसंग. आधीच्या तासाला घरून काहीतरी काम करून यायला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी randomly एका मुलीला त्या संदर्भात विचारले. (असं randomly कोणाला तरी प्रश्न विचारण्याची सवय मला होतीच. अनेकांनी या सवयीमुळे माझी भीती वाटते वगैरे सांगितलेले होते पण वर्गात सगळ्यांनी सजग असावे म्हणून मी कधीतरी हे करत असतोच. सध्याच्या online पद्धतीमध्ये पण असा प्रयोग मी १०वी चे तास घेताना करून पहिला आहे) तर नेमकी ती मुलगी आदल्या दिवशी अनुपस्थित होती. कारण अर्थातच न पटण्यासारखे होते त्यामुळे तुला मैत्रिणी नाहीत का? त्यांनी तुला सांगितले नाही कि तू विचारले नाहीस?” वगैरे वगैरे सरबत्ती मी केली. त्या विद्यार्थिनीला ते चांगलेच बोचले असावे कारण वर्गातच तिच्या डोळ्यात पाणी आले होते. माझ्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्या मुलीने अनोखा मार्ग स्वीकारला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या mid-semपरीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेच पण अवघड म्हणून विचारलेल्या प्रश्नात पैकीच्या पैकी गुण मिळवले. असं आव्हान स्वीकारणारे आणि ते पूर्ण करून दाखवणारे  विद्यार्थी विरळाच. आजही तो प्रसंग आणि नंतर तिची उत्तरपत्रिका माझ्या लक्षात आहे.
      काही विद्यार्थी मात्र अवघड प्रश्न विचारून वर्गात आव्हान उभे करायचे. सगळं शिकवून झालं असं वाटत असतानाच हात वर करून सर एक शंका आहे.अशी सुरुवात करून काहीतरी भन्नाट प्रश्न विचारणारे खूप कमी विद्यार्थी अनुभवले. असे विद्यार्थी वर्गात असले की शिकवणाऱ्याचा पण कस लागतो. २०१६ आणि २०१७ च्या batch मधले असे काही विद्यार्थी अजूनही चांगलेच लक्षात आहेत.
या आणि अश्या काही प्रसंगांमधून कुठेतरी वाटायला लागलं होतं की वर्ग, अभ्यास, परीक्षा याबरोबरच अन्य काही वैयक्तिक समस्या विद्यार्थी मोठ्या कोणाबरोबर तरी share करू शकले पाहिजेत. शिक्षकच असं काम करू शकतो का ? त्याच दरम्यान “Mentorship Program” ची सुरुवात कॉलेज मधे झाली. प्रत्येक शिक्षकाला १५ -१५ विद्यार्थी वाटून देण्यात आले. माझ्या वाट्याला आलेल्या १५ विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारायचा मी एक-दोन वेळा प्रयत्न पण केला. पण त्यावेळी ते सगळे शेवटच्या वर्षाला असल्यामुळे त्यांना अशी काही गरज वाटली नाही म्हणा किंवा मी तेवढा मोकळेपणा निर्माण करू शकलो नाही म्हणा, प्रयोग बऱ्याच अंशी फसला होता. बहुतेक शिक्षकांची अवस्था माझ्यासारखीच होती. नंतर ह्याचं स्वरूप थोडसं बदललं आणि प्रत्येक शिक्षकाकडे प्रत्येक वर्षातले ५-५ विद्यार्थी वाटून देण्यात आले. हेतू चांगला असला तरी असा जबरदस्तीने नियुक्त केलेला mentor कोणालाच आवडला नाही. सगळं कागदावरंच राहिलं.
      माझ्या वाट्याला आलेल्या काही विद्यार्थ्यांबरोबर चांगली मैत्री जमली आणि ती आजही टिकून आहे. तसंच अशी काही official नियुक्ती नसताना सुद्धा काही विद्यार्थी problem share करायचे आणि माझ्यापरिने मी त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचो. एकंदर काय तर mentor होणे हे कुठल्या नियुक्तीमुळे शक्य नाही हे नक्की. त्यासाठी विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता, जिव्हाळा, त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेण्याचा patienceआणि योग्य तो सल्ला देण्याची maturity हे किमान आवश्यक गुण आहेत. हे सगळे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आजही चालू आहे.
कॉलेज मधले राजकारण, अन्य निरुपयोगी वाटणारी कामं हे सगळं प्रत्येक शिक्षकाला करावंच लागतं. काही शिक्षक ह्या सगळ्यात रमून पण जातात तर काही शिक्षक स्वतःवर चडफडत हे सगळं करत राहतात. माझ्या सुदैवाने मला असे अनेक सहकारी मिळाले की जे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या जागी ठेऊन प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेत जास्ती रमत होते. स्वाभाविकपणे मीही त्यांच्यातला एक झालो. १० वर्षामध्ये एकच प्रसंग असा घडला की जेंव्हा विभागातल्या राजकारणाचा थोडासा राग किंवा वैताग विद्यार्थ्यांवर काढला गेला.
      एका वर्गाला  दुसऱ्या वर्षापासून शिकवत होतो. त्याच वर्गाबरोबर कॉलेजमधे आणि कॉलेजच्या बाहेरचे अनेक उपक्रम केलेले होते. आधीच्या एका भागात लिहिलेला ४ तासांची परीक्षा घ्यायचा प्रयोग पण त्याच वर्गावर केलेला होता. त्यांचा कॉलेज मधला शेवटचा महिना. नेहमीप्रमाणे विभागामध्ये काही विषयांवरून जोरदार वाद झालेले होते आणि त्याचा राग येऊन विभागातल्या कार्यक्रमाला उपस्थित रहायाचे नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि मग या माझ्या लाडक्या वर्गाच्या निरोप समारंभाला आम्ही ३-४ शिक्षक अनुपस्थित राहिलो. म्हंटलं तर साधीच घटना. पण एकदा तुम्ही वर्गापलीकडचे शिक्षक झालात की अशा चुका माफ नसतात. आजही त्या चुकीची बोज मनात खोलवर टोचत असते, मलाही आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनाही! बाह्य परिस्थिती आणि घटनांचा आपल्यातल्या शिक्षकावर किती परिणाम होऊ द्यायचा आणि त्याचा effect विद्यार्थ्यांवर किती होऊ द्यायचा याचा चांगला परिपाठ या घटनेमुळे मिळाला.
      वर्गातल्या विषयाचं शिक्षण, वर्गाबाहेरचं अनुभव शिक्षण आणि त्या त्या प्रसंगानुरूप विद्यार्थ्यांशी जडलेलं मैत्र ह्या तीन गोष्टी जिथे एकत्र येतात तिथे खरं आनंददायी शिक्षण सुरु होतं. नाही का ?
( अश्याच आनंददायी शिक्षणातले शेवटच्या २-३ वर्षामधले अनुभव उद्याच्या लेखात.)


                                                           अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem