वालचंद डायरीज् – भाग १३


वालचंद डायरीज् भाग १३
शिक्षकांच्या समस्या, राजकारण आणि संघटना
      मी विद्यार्थ्यांमध्ये रमणारा एक शिक्षक होतो, आहे. पण विद्यार्थ्यांपलीकडे शिक्षकांच्या काही समस्या असतात. आणि त्यांना तोंड द्यावे लागतेच. सुरुवातीपासून ज्या समस्या समोर आल्या त्यापैकी एक म्हणजे DCPS.
आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. वालचंद कॉलेज हे एक सरकारी अनुदानित महाविद्यालय आहे. त्यामुळे सगळे सरकारी नियम इथे काम करणाऱ्यांना लागू होतात. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेल्यांना निवृत्ती वेतनाचा( पेंशन) लाभ मिळणार नाही असा नियम झाला त्याचवेळी DCPS (Departmtmental Contributory Pension Scheme) लागू करण्यात आली. साधारण EPF सारखीच याची रचना. पण त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नव्हती. कायद्याप्रमाणे PF चे पैसे त्या त्या महिन्यात कट करून योग्य ठिकाणी भरावे लागतात. पण इथे तर सगळा आनंदी आनंद होता.
सरकारी कामात देर है पर अंधेर नहीअसं म्हणतात हे खरं ,पण इथे कशाची हालचालच नव्हती. माझे स्वतःचे Tata Motors मधले PF चे पैसे इकडे हस्तांतरित करायचे होते. त्यासाठी मी खूप वेळा कॉलेजच्या ऑफिसमध्ये पत्रव्यवहार केला पण काहीही उपयोग झाला नाही. माझे पैसे “tata” कडे असल्याने उशीर झाला तरी ते मिळतीलच ह्याचे खात्री होती. पण त्यालाही मर्यादा होती. जवळ जवळ ३ वर्ष वाट बघून ते पैसे काढून घ्यावे लागले आणि नियमाप्रमाणे त्यावर प्राप्तीकर पण भरावा लागला.
एवढी एकच समस्या होती असं नाही. २००९ मधे join झालेल्या शिक्षकांच्या भरतीला विद्यापीठाची मान्यता पण नव्हती. कॉलेज स्वायत्त व्हायच्या वेळी विद्यापीठाबरोबर बरेच वाद झालेले होते आणि त्याचाच परिणाम म्हणून आमच्या पदांना विद्यापीठाने मान्यता दिलेली नव्हती. व्यवस्थापनाने पण या बाबतीत थोडा हलगर्जीपणा केलेला होताच. कारण साधारण आमच्या बरोबरच join झालेल्या संचालकांच्या पदाला विद्यापीठाकडून मान्यता मिळवली गेली होती पण आमच्या बाबतीत तशी पुरेशी हालचाल केलेली नव्हती. यामुळे आम्ही कोणी विद्यापीठाच्या काही विशिष्ट कामात सहभागी होऊ शकत नव्हतो. तर आमच्यातले काही जण eligible असूनही PhD चे मार्गदर्शक होऊ शकत नव्हते. ह्या सगळ्या बाबतीत पण व्यवस्थापनाने आम्हाला कधी विश्वासात घेतले नाही. जी तऱ्हा विद्यापीठ मान्यतेची तीच तऱ्हा DTE (Directorate of Technical Education) कडून घ्यायच्या मान्यतेची .तीच गत २ वर्षांचा probation period संपल्यावर घ्यायच्या नियुक्ती confirm झाली असल्याचे पत्र मिळवायची. स्पष्ट सांगायचं झालं तर ही सगळी कामे कॉलेजच्या ऑफिसने करणे आवश्यक होते. पण हा ही establish न होऊ देण्यातलाच भाग होता की काय असं आता वाटतंय. असो..
२०१३-१४ मधे अश्या समस्याग्रस्त लोकांची संख्या ३० च्या वर पोचली. तरी संचालक, उपसंचालक किंवा अन्य वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींना ह्याचं गांभीर्य कळत नव्हतं. इतकंच नव्हे, तर एकदा तर नवीन संचालकांना आम्ही या संदर्भात भेटायला गेलेलो असताना त्यांच्याकडून थोडी अपमानास्पद वागणूक मिळाली.  कधीतरी समस्या सुटेलच आपण आपले शिकवण्याचे काम करत राहावेअसा विचार करणारे आम्ही सगळे त्या प्रसंगानंतर मात्र चांगलेच दुखावले गेलो. आपणच हातपाय हलवायला पाहिजेत ह्याची पुरेशी जाणीव सगळ्यांना झाली. कारण कुठल्याही वरिष्ठाला ही समस्या नव्हती आणि कनिष्ट शिक्षकांच्या समस्येकडे लक्ष देण्याची इच्छा नव्हती. त्या दरम्यानच २०१४ मधे शिक्षकांची नवीन तुकडी दाखल झाली आणि आमची संख्या ४० ला जाऊन पोचली.
जून जुलै २०१४ मधे LMC म्हणजे (Local Management Commitee) मधे असणाऱ्या ३ शिक्षक पद आणि एक शिक्षकेतर कर्मचारी पद ह्यांच्यासाठी निवडणुका घोषित झाल्या. वर्षानुवर्ष ह्या समितीवर कायमच ज्येष्ठ शिक्षक निवडले जात होते. आपण सर्व junior शिक्षक एकत्र आलो तर ३ पैकी १ पदावर आपला प्रतिनिधी निवडून आणू शकतो आणि आपला प्रतिनिधी तिथे असेल तर आपल्या समस्यांकडे आणि पर्यायाने आपल्याकडे थोडे तरी गांभीर्याने पहिले जाईल अशी चर्चा सुरु झाली. आम्ही असा काही विचार करतो आहे याची कुणकुण आमच्यापेक्षा थोडे आधी म्हणजे २००२०४ दरम्यान महाविद्यालयामध्ये आलेल्या शिक्षकांना लागली. त्यांच्या पण वेगळ्या काही समस्या होत्या आणि त्याकडे कॉलेज व्यवस्थापन लक्ष देत नव्हतं. ते ही सगळे आमच्यामध्ये सामील झाले आणि संख्याबळामुळे (थोडी risk घेतली तर) २ पदं पण आपण मिळवू शकतो अशी पण चर्चा सुरु झाली.
एक उमेदवार २००४ पूर्वीच्या गटामधला असावा आणि एक उमेदवार २००६ नंतरच्या गटामधला यावर एकमत झाले. पहिल्या गटामध्ये तुलनेने कमी जण होते. त्यांच्या मधून electrical विभागातले डॉ. एम. एम. वावरे सर ह्यांचे नाव निश्चित झाले. अतिशय शांत स्वभावाचे, स्पष्टवक्ते आणि ठामपणे भूमिका मांडणारे असा त्यांचा लौकिक होता. दुसऱ्या गटातून कोणीतरी अचानक माझं नाव सुचवलं आणि फारसा विरोध न होता ते मंजूर पण झालं. असं काही होईल हे माझ्या खयाली पण नव्हतं. पण आता मागे हाटून उपयोग नव्हता.
निवडणुका ही एक वेगळीच गंमत असते, मग त्या लोकसभेच्या असोत किंवा कॉलेज मधल्या! त्या त्या उमेदवारासाठी तो जणू काही जीवन मरणाचा प्रश्न होतो. इथे खरंतर निवडणूक होण्याचीच गरज नव्हती. कारण अनेक ज्येष्ठ प्राध्यापकांना आम्ही आधीच भेटून आम्ही का उभे राहत आहोत हे सांगितलेले होते आणि त्यांनी पण आम्हाला पाठींबा दिलेला होता. पण तरी काँलेज  व्यवस्थापनाच्या बाजूला असणाऱ्या एका प्राध्यापकांना आम्ही जे करत होतो ते बघवलं नाही. त्यानी त्यांच्या मर्जीतल्या आणखीन दोघांना मैदानात उतरवलं. त्यामुळे आता ३ जागांसाठी ४ उमेदवार अशी परिस्थिती झाली. पुढचे ८-१० दिवस रणधुमाळीचे होते. पण आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे ताण कधी आला नाही. preferential voting प्रकाराने होणारे मतदान असल्या कारणाने नेहमीपेक्षा गणित थोडं वेगळ होतं. हक्काची मतं दोघांमध्ये विभागून घेणे, त्या त्या व्यक्तीला तसा निरोप देणं, अन्य प्राध्यापकांना जाऊन भेटणं आणि मत द्या अशी विनंती करणे हे सगळं आम्ही खूप enjoy पण केलं. कारण काहीही झालं तरी आमच्यामधला एकजण तरी नक्की निवडून येणार होता आणि तेवढं यश पण आम्हाला पुरेसं होतं.
नक्की तारीख आता आठवत नाही पण बहुदा ३० सप्टेंबर २०१४ असावी. प्रत्यक्ष मतदान आणि लगेच मतमोजणी. पहिल्या फेरीत वावरे सर, दुसऱ्या फेरीत मी आणि तिसऱ्या फेरीत प्रा. मधाळे सर असे निवडले गेलो. सगळे मिळून कॅन्टीन मधे जाऊन चहा प्यायलो आणि मग एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवली हे विसरून पण गेलो. अर्थात सगळ्यांचं असंच झालं असं म्हणणं धडासचं होईल. नंतरची ४ वर्ष (ऑगस्ट २०१८ मधे पुढची समिती गठीत होईपर्यंत) मात्र आम्ही तिघांनी मिळून एकत्र काम केलं.
प्रत्येक सहा महिन्यांनी ह्या समितीची meeting असायची. आम्ही एक वेगळी प्रथा चालू केली. अश्या प्रत्येक meeting च्या आधी आम्ही सगळ्या प्राध्यापकांची एक meeting घ्यायचो, सगळ्यांचे प्रश्न समजावून घ्यायचो आणि ते मांडायचो. ह्याचा किती उपयोग झाला हे नाहीं माहिती पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले.
वावरे सरांच्या initiative मुळे आणखीन एक उद्योग केला. Maharashta Engineering teachers Association (META) ह्या संघटनेचे आम्ही सगळे, म्हणजे वालचंद मधले जवळ जवळ ७२ शिक्षक सदस्य झालो. ही संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ याच्याशी संलग्न आहे. त्या निमित्ताने वालचंद कॉलेज मधले तरी सगळे शिक्षक एकत्र येतील अशी आमची अटकळ होती.
२०१५ मधे मग DCPS ची समस्या धसाला लावायची असा पण सगळ्यांनी मिळून केला. त्यासाठी एकदा तर मी, पाटील सर, खरात सर, आणि कोकणे सर मंत्रालयात पण जाऊन आलो. माझ्या आयुष्यातला मंत्रालयात जाण्याचा आत्तापर्यंतचा तो एकमेव प्रसंग! अर्थात META चे सदस्य असल्याचा फायदा त्यावेळी नक्की झाला. परत आल्यावरही कॉलेज मधेही बराच संघर्ष करावं लागला आणि अल्प प्रमाणात यश पण मिळालं. निदान आमच्या पगारातून रक्कम कापली जाऊन ती treaseryमधे भरली जायला लागली. फक्त वालचंद मधेच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये असलेल्या जवळ जवळ ४० महाविद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचार्यांना ह्याचा फायदा झाला. पण हे अर्ध यश होतं. त्यात सरकारचा वाटा भरला जाणं , व्याज जमा होणं आणि प्रत्येकाला आपापल्या खात्याचं statement मिळणं हे काम अजून बाकी होतं.
एखाद्या संघटनेला तात्पुरतं उद्दिष्ट असेल तर ते संपल्यावर संघटना पण संपते. META च्या बाबतीत पण तेच झालं. ज्याचे त्याचे problem सुटल्यावर एकेकाचा रस संपत गेला. आणि मग कधीतरी आमच्यातलं कोणीतरी विनोदानं म्हंटल की “META आता अगदी मेटाकुटीला आलंय!तात्पर्य संघटनेला दूरदर्शी उद्दिष्ट आणि विचारांचा खोल पाया असणं गरजेचं आहे हा धडा आम्ही घेतला.
DCPS चा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला तरी विद्यापीठ मान्यतेचा प्रश्न तसाच राहिला होता. गंमत म्हणजे ज्या काळात विद्यापीठाने आमच्या नियुक्तीला मान्यता द्यायला दोन वेळा नकार दिला त्याच कालावधीमध्ये विद्यापीठाच्या Management Council मधे आमच्याच महाविद्यालायामधले एक सन्माननीय प्राध्यापक सदस्य होते. दोन वेळा एखादा प्रस्ताव नाकारला गेला की उच्च न्यायालयात गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. मग तेही करून बघू. २०१६ किंवा २०१७ मधेच मग आम्ही ९ जणांनी उच्च न्यायालयामध्ये शिवाजी विद्यापीठाविरुद्ध केस दाखल केली. आजही ती केस चालू आहे. त्यामुळे त्याविषयी जास्ती काही बोलणे उचित होणार नाही.
आठवायला लागलो तर अश्या अनेक घटना आणि किस्से आठवतील. पण ते आठवत बसायची इच्छा मुळीच नाही. हे सगळं रामायण चालू असताना वर्गातला आमचा performance अबाधित राहिला होता. त्या वेळच्या एकाही विद्यार्थ्याला वर्गाबाहेर इतक्या घडामोडी कॉलेज मधे चालू होत्या हे कळलेलं पण नसणार याची खात्री आहे. विद्यार्थ्यांना हे कळण्याची गरजही नसते.
असं सगळं सगळ्याच ठिकाणी घडत असतं. वालचंद मधे खूप काही वेगळं घडत होतं असं नाही. पण म्हणूनच हे कुणीतरी मांडायला हवं ,म्हणून मी मांडतोय इतकंच. आज हा लेख वाचताना अनेकांना आपापले असे अनुभव नक्की आठवले असतील..कदाचित माझ्या अनुभवांशी तुम्हाला साधर्म्य पण वाटलं असेल..
पण या सगळ्यातून मी काय शिकलो? काय कमावलं, काय गमावलं? याचा विचार करून पुढची वाटचाल करत रहायची, हे महत्त्वाचं !तशी वाटचाल मी करत राहिलो.

                                                       अमर परांजपे




     
     

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem