वालचंद डायरीज् – भाग ११


वालचंद डायरीज् भाग ११
वर्गात शिकवताना -४
       २०१३-१४ पर्यंत हळूहळू वालचंद कॉलेज नेमकं कसं आहे ते थोडं थोडं कळायला लागलं होतं. त्यामुळे स्वतःपुरते का होईना काही बदल करायचे असतील तर काय काय करावं लागेल याचा अंदाज आला होता. किंवा काही बदल करायचे असतील तर ते system च्या गतीने करण्याएवढा patience वाढला होता. मी काल लिहिलं होतं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण विद्यार्थीदशेमध्ये परीक्षार्थी जास्ती असतो. त्यामुळे “Quality of Exam determines quality of education” हे खूप प्रमाणात सत्य असतं. पण गंमत अशी आहे ,की ‘Quality of Exam cannot be higher than quality of teaching-learning’ आणि ‘teaching learning process is majorly driven by teacher’.
खूप philosophical होतंय ना? पण काय करणार गेल्या काही वर्षांमध्ये NBA, NACC, ABETTE या सगळ्यांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये objectives, outcomes, OBE, SCE वगैरे सारख्या अनेक jargons नी प्रवेश केला आणि मग असं काहीतरी अवघड अवघड बोललं किंवा लिहिलं की भारी समजलं जायला लागलं. एखादा शिक्षक नेमकं कसं शिकवतो, विषय कसा पोचवतो, परीक्षा घेताना काही वेगळा विचार करतो का  आणि या सगळ्याचा समोरचा विद्यार्थी चांगला engineer होण्याला कसा उपयोग होतो हे सगळं दुर्लक्षित झालं. असो, यावर राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विचार करत असतीलच अशी आशा करतो आणि थोड्याच दिवसात सर्व शिक्षकांना अजून काही form भरायलाही  देतील..त्या सर्व्हे मधून काय कळतं कोण जाणे..मला शिकवणं आणि त्यातले प्रयोग करणं कळतं त्यातूनच मी माझे अंदाज बांधत गेलो आजही तसंच करतो...मी वर्गातील प्रयोगांबद्दल बोलत होतो तेंव्हा आपण आपल्या वर्गात जाऊ हेच योग्य !!!
 २००५ साली tata motors मधे कामाला लागलो तेव्हा drawing board वर असणारी गाडी माझ्या सुदैवाने २००९ मधे मी बाहेर पडलो तेंव्हा जवळजवळ launch व्हायला तयार झालेली होती. त्यामुळे concept to market अशी product development ची संपूर्ण cycle जवळून बघायला मिळाली होती. विविध ठिकाणी उपलब्ध data शोधायचा आणि त्याचा उपयोग आपल्या design मधे करायचा, एक एक constraint चा विचार करत मग design २-३-४-५ वेळा बदलायचं, ती वस्तू बनवताना येणाऱ्या अडचणी आणि वस्तू वापरणाऱ्या व्यक्तीचा विचार करून त्यात आणखीन सुधारणा करायच्या या प्रक्रियेचा किंवा त्यातल्या काही भागाचा अनुभव विद्यार्थ्यांनी वर्गात शिकत असताना घेतला तर...
वाचायला खूप भारी वाटलं ना ? पण असं काहीतरी मुलांसाठी, मुलांबरोबर  करायला गेलं कि काहीतरी वेगळाच घोळ होतो हा पूर्वानुभव होता. आणि एकदम परीक्षेमध्ये काही बदल करण्यापेक्षा ते बदल वर्गातून सुरु केले तर जास्ती योग्य होईल असं वाटलं. २०१५-१६ च्या पहिल्या सत्रामध्ये Theory of machines शिकवताना हळूहळू वेगळ्या प्रकारे शिकवणे आणि प्रश्न विचारणे सुरु केले. सुरुवातीला असे वेगळे प्रश्न फक्त assignment आणि class test पुरते मर्यादित ठेवले. पण मुलांना ते challenging वाटायला लागलं होतं. एकदा सकाळच्या तासाला test घेतली आणि consultancy च्या कामासाठी गुजरातला जायला बाहेर पडलो. संध्याकाळी उशिरा एका विद्यार्थ्याचा message आला कि test मधला प्रॉब्लेम आत्ता सुटला. वा! म्हणजे परीक्षेपलीकडे विचार करायला सुरुवात झाली होती तर.
२०१५-१६ च्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशीच TY Mechanical वर्गात हे जाहीर करून टाकलं की यावेळी machine design हा विषय वेगळ्या प्रकारे शिकायचा आहे. पाहिलं module होतं  design of springs आणि सुदैवाने tata motors मधले spring संदर्भातले अनेक अनुभव माझ्याकडे होते. ते अनुभव गोष्ट रुपात सांगताना text book ते practice आणि class room ते industry असा प्रवास घडायचा. तासाला सुद्धा नुसते lecture घेण्यापेक्षा गटचर्चा, वादविवाद ह्यामुळे सगळ्यांचा सहभाग सक्रीय होता. spring design साठी लागणारी सगळी माहिती design data sheet च्या रुपात एकत्रित केली. पहिल्या महिन्याच्या शेवटी class test घेताना सगळ्यांनी त्याचा वापर करावा असं सांगितलं. प्रयोग यशस्वी झाला. मग आली mid sem exam. त्यावेळच्या नियमानुसार २ पानी data sheet परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेबरोबर दिलेलं चालत होतं. मग ४०% (म्हणजे ३० पैकी १२ गुण) प्रश्न हे असे data sheet वापरून सोडवावे लागतील असे तर उरलेले ६०% प्रश्न पारंपारिक पद्धतीचे अशी विभागणी केली.   पास व्हायला सोपी पण जास्ती मार्क पडायला आव्हानात्मक अशी परीक्षा मुलांना आवडली. पण वेळ थोडा कमी पडला होता.
त्या विषयामधल्या ६ पैकी ४ module वर असे १६ पानी design data booklet तयार केले. असे १६ पानी booklet परीक्षेमध्ये वापरायला वेगळी परवानगी लागणार होती. त्याहून अवघड होतं ते परीक्षेची वेळ वाढवून मागणं. कारण २ तासांच्या परीक्षेमध्ये वेगळा विचार, योग्य data शोधून वापरणं, अनेकदा calculation करणं शक्य नव्हतं. architectureच्या काही परीक्षा ६ तासांच्या असतात तेंव्हा ६ तासांची परीक्षा घेता येते. तेव्हा मग मा. संचालकांना ६ तासांची परीक्षा आणि १६ पानी booklet वापरायची परवानगी मागणारे एक सविस्तर पत्र लिहिले. ते पत्र विभाग प्रमुख आणि dean academics ह्यांच्या मार्फत म्हणजे through proper channel पाठवले. हो नाही करत शेवटी ४ तासांचा पेपर घ्यायची परवानगी मिळाली. सगळ्यांना विश्वासात घेतलेलं असल्यामुळे मग सगळ्यांकडून सहकार्य मिळत गेलं. परीक्षा विभागाने booklet च्या ८० प्रती तयार करून घेतल्या. शिवाय ४ तासांची परीक्षा घेण्यासाठी वेळापत्राकामध्ये योग्य ते बदल सुद्धा केले. इतकेच नाही तर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सलग ४ तास पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर च्या दरम्यान frootyपण देण्यात आली. frootyपीत पीत लिहिलेला हा पेपर सगळ्यांना चांगलाच लक्षात राहिलेला असेल ह्यात शंका नाही.
इथे एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते की वालचंद कॉलेज मधला परीक्षा विभाग हा सर्वोत्कृष्ट आहे. तिथे काम करणारे वर्धमान पाटील सर, प्रदीप कांबळे सर, राजू वडेर सर आणि अन्य सहकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळला जाईल ह्याची दक्षता घेतात. त्यामुळे कॉलेजची exam integrity टिकून आहे. CoEम्हणून काम केलेले सगळे प्राध्यापक सुद्धा नेटकेपणे काम करणारे होते.
त्यामुळे माझ्या सगळ्या प्रयोगांना त्या सगळ्यांनी खूप चांगले सहकार्य केले. पण वालचंदमधे असे काही महाभाग आहेत जे अश्या प्रत्येक नवीन प्रयोगांना गालबोट लावण्याचा कायम प्रयत्न करत असतात. इथे ही असेच झाले. एक विद्यार्थी--- एक वर्ष नापास झाल्यावर सुद्धा शेवटच्या वर्षाला पोचला तरी तिसऱ्या वर्षाचे design आणि अन्य एक दोन विषय मागे राहिलेले होते.. आणि परत एकदा design विषयात नापास झाला.  त्याने मला मुद्दामहून नापास करण्यात आलेअश्या आशयाची तक्रार दाखल केली. त्या विद्यार्थ्याचे वडील सुद्धा कॉलेजमधे अन्य विभागात प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि तक्रार अर्ज लिहून देणारे पण त्याच विभागामधले एक सन्माननीय प्राध्यापक होते. एकदा लेखी तक्रार दाखल झाली की त्यावर तक्रार निवारण समिती नेमून चौकशी व्हावीच लागते. मी हा  अनुभवही घ्यायचा राहू नये हीच देवाची इच्छा असावी बहुदा.
संचालक, उप संचालक, dean academics आणि CoEअश्या चौघांच्या समिती समोर मे २०१६ च्या २९ किंवा ३० तारखेला मला बोलावले गेले. मी बरेच नवीन प्रयोग त्याच विषयामध्ये केलेले असल्याने कुठेतरी माझी चूक सापडेल असा तक्रार करणाऱ्यांचा कयास असावा. पण माझ्याकडे सगळ्या नोंदी  व्यवस्थित होत्या, model answer, scheme of marking वगैरे खूपच नीट ठेवलेलं होतं. समिती मधील सदस्यांनी खूप बारकाईने सगळं तपासलं. अगदी continuous assessment किंवा In semester evaluation च्या नोंदी पण तपासल्या गेल्या. तक्रारदार विद्यार्थ्याला सुद्धा समितीने बोलावलेले होते आणि आपले म्हणणे मांडायची संधी दिलेली होती. कुठल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याला मुद्दामहून नापास केले आहे असे सिद्ध झाले नाही. तोपर्यंत वालचंद मधल्या राजकारणाचा पुरेसा अनुभव माझ्यापण गाठीशी आलेला होता. तक्रार करणारे तर मुरलेले राजकारणी होते आणि तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांनाही माहिती होते. मग हा सगळा उपद्व्याप कशासाठी? आधीच्या काही घटनांमुळे असलेला माझ्यावरचा राग असावा किंवा  विभाग प्रमुखांशी संधान बांधून २ महिन्यांनी होणाऱ्या makeup exam चा पेपर ह्या तक्रारी च्या आधारे मला काढू द्यायचा नाही आणि सोपा पेपर काढून त्या विद्यार्थ्याला पास करावयाचे असा हेतू असावा. हा दुसरा मुद्दा उपस्थित केला जाणार हा कयास मी आधीच केला आणि मी समितीसमोर असताना त्याचवेळी हा मुद्दा मांडून समितीच्या आहावालामधेच पुढचा पेपर पण मीच काढावा हे वाक्य घालायची विनंती मी केली. माझा अंदाज खरा ठरला कारण नंतरच्या एका meeting मधे विभाग प्रमुखांनी पुढचा पेपर मला काढू न देण्याविषयी बरीच आग्रही भूमिका घेतल्याचे कळले.
सुदैवाने तो विद्यार्थी ह्या अनुभवातून शहाणा झाला आणि पुढच्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास करून पास सुद्धा झाला. एकीकडे  माझे सगळे प्रयोग मी अतिशय systematically केल्याचे आणि त्यात कोणावरही अन्याय न झाल्याचे शिक्कामोर्तबच जणू त्या समितीने केले. याचा मला आनंद तर आहेच पण आपल्याच सहकारी मंडळीनी स्वतःच्या निहित स्वार्थासाठी माझ्या विरुद्ध तक्रार केली आणि ती सुद्धा एका माझ्याच विद्यार्थ्याचे नाव पुढे करून हा उठलेला ओरखडा कायम राहिला !
माझा शिकवण्याचा प्रवास,त्यातले प्रयोग आणि येणारे आव्हानात्मक अडथळे..तरीही ठरवलेलं गाठलं की मजा तर यायचीच,पण आत्मविश्वास पण वाढायचा. त्यावेळी अनेकदा वैतागही यायचा कि याचसाठी आपण ठरवून शिक्षक झालो का? पण त्या विचारात असतानाच एखाद्या विद्यार्थ्याचा फोन यायचा किंवा कुणी pass out मुलं भेटायला यायची..आपापल्या ठिकाणी छान काम करतायत सांगायची.. सर,तुम्ही सांगितलेलं आता काम करताना आठवतं अनेकदा असं म्हणायची किंवा Gate ला चांगला स्कोअर आला कळवायची..मग वाटायचं अरे हा चालू असलेला प्रवास व्यर्थ नाही... प्रवास चालू ठेवायचा,कारण आपलं बघून अनेक जण त्याच दिशेने प्रवास सुरू करतात.

                                                   अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem