वालचंद डायरीज् – भाग १०
वालचंद डायरीज् – भाग १०
वर्गात शिकवताना -३
२०१२ मधे PhD चे course work करायला IIT मुंबईत गेलो. परत एकदा ( मी MTechतिथंच केलं होतं ,म्हणून म्हंटलं परत एकदा)अनेक चांगल्या
प्राध्यापकांच्या तासांना बसायची संधी मिळाली. मी
MTechकरताना मी केवळ विद्यार्थी होतो..पण PhD course work करताना मी विद्यार्थी आणि वालचंदमधे शिकवत असल्याने शिक्षकही होतो..माझे guide डॉ. सलील कुलकर्णी यांच्याबरोबर अनेकदा चर्चा व्हायची. ते तयारी कशी करतात, काय विचार करतात हे समजायचं. खऱ्या अर्थाने autonomous institute असलेल्या IIT संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक वेगवेगळे प्रयोग
करत असायचा. . प्रत्यक्ष शिकवण्यामधली विविधता, वेगळ्या प्रकारच्या assignment देणे, परीक्षा घेताना विविध पद्धती वापरणे हे सगळं जवळून बघायला मिळालं. आणि त्यातलं
आपल्याला वालचंदमधे काय काय वापरता येईल असा विचार सुरु झाला. .एक मात्र पक्कं
ठरवलेलं होतं कि IIT मधलं असलं तरी जसंच्या तसं
काही कॉपी करायचं नाही. त्या त्या विषयाची गरज ओळखून आणि वालचंदची पार्श्वभूमी
लक्षात घेऊन योग्य वाटतील ते बदल करायचे.
लगेचच्या सत्रामध्ये machine design विषय शिकवायला मिळाला.
तोपर्यंत 'design data book' वापरायची पद्धत बंद झालेली होती आणि त्यामुळे
परीक्षेमध्ये पाठ केलेले formulae वापरणे (अर्थात आधी पाठ
केलेले असतील तर) हा मुख्य भाग झालेला होता. त्यामुळे design मधल्या बाकीच्या गोष्टींकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होत होतं. स्मरणशक्ती वरचा ताण
कमी करण्यासाठी काय करता येईल असा माझा विचार सुरु झाला. open book test किंवा open notebook test हा एक पर्याय वापरला जातो पण त्यासाठी जास्ती
वेळाची परीक्षा असावी लागते. मग IIT मधल्या डॉ. कृष्णा
जोनालगड्डा यांची एक युक्ती वापरायची ठरवली. प्रत्येक विद्यार्थाने परीक्षेला
येताना A4 आकाराचा एक पाठपोठ कागद स्वहस्ताक्षरात लिहून आणायचा. त्यात त्याने काहीही
लिहावे- सूत्रं, व्याख्या, माहिती अगदी काहीही.
अक्षरही कितीही लहान काढले तरी चालेल. परीक्षेमध्ये त्यातली माहिती वापरून उत्तरे
लिहावीत. मुलांना पण ही कल्पना आवडली. प्रत्येकाने आपला आपला कागद तयार करायला
सुरुवात पण केली. आता स्मरणशक्तीवर ताण नसल्यामुळे जास्ती अवघड आणि विचार करायला
लावणारे प्रश्न विचारायचे मी ठरवले. सप्टेंबर २०१२ मधल्या mid sem exam मधे हा प्रयोग करायचा हे निश्चित केलं. असा काही प्रयोग करतो आहे हे केवळ
विभाग प्रमुखांना सांगून तशी सूचना प्रश्नपत्रिकेमध्ये घातली. असा काही प्रयोग
पहिल्यांदाच करत असल्यामुळे मुलांबरोबरच मी पण उत्सुक होतो. पण...
प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी पाचच मिनिटांमध्ये ज्या वर्गामध्ये ही
मुलं बसलेली होती तिथे मला बोलावलं गेलं. supervisorम्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ प्राध्यापकांनी या प्रकाराला हरकत घेतलेली
होती. त्यांच्या मते हा कॉपी करण्यातालाच प्रकार होता. गंमत म्हणजे controller of
examination (CoE) यांनीसुद्धा आक्षेप मान्य केला (गंमत म्हणजे हे
दोन्हीही आदरणीय प्राध्यापक स्वतः काही ना काही वेगळे प्रयोग करणारे होते). सगळ्या
मुलांकडून कागद काढून घेण्यात आले आणि परीक्षा चालू केली गेली. “आता मुलं काय लिहिणार?आणि मी पेपर कसे तपासणार?” याचा विचार करत पुढचा एक तास मी tension मधे होतो. परीक्षा
संपल्यावर अर्थातच मुलं भेटली आणि ती चक्क हसत होती. “सर, तो कागद तयार करण्यासाठी आणि त्यावर जास्तीत जास्त महत्त्वाचं सगळं लिहिलं
जावं यासाठी प्रत्येकानी किमान ३ वेळा तो कागद तयार केला होता. त्यामुळे त्यातलं
सगळं जवळजवळ पाठ झालेलं होतं. प्रत्यक्ष परीक्षेला कागद नसल्यामुळे फारसा तोटा
झाला नाही. उलट असं केलं की अभ्यास चांगला होतो हे कळलं.” अशी बहुतेक सगळ्या मुलांची प्रतिक्रिया होती. वा! पेपर तपासताना पण याचा प्रत्यय आलाच. २० पैकी
१८-१९-२० मार्क मिळवणारे पण अनेक विद्यार्थी होते. ती marklistअजूनही मी जपून ठेवलेली आहे.
मधल्या काळात CoEनी माझ्याविरुद्ध
संचालकांकडे तक्रार केलेली होती. नेमकी काय तक्रार हे मला कळलं नाही कारण तो विषय
संचालक आणि विभाग प्रमुख या पातळीवरच मिटवला गेला. पण असे नवीन प्रयोग करायच्या
माझ्या उत्साहावर मात्र पाणी पडलं. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये असे प्रयोग परत करायचे
नाहीत असंच त्यावेळी वाटलं होतं. त्यावेळी थोडा वैतागही आला होता.
पुढच्या वर्षी (२०१३-१४) विषय पण बदलला आणि पहिल्यांदाच दुसऱ्या वर्षाचा Strength of Material (SoM) हा विषय शिकवायला मिळाला. Mechanical Engineering मधल्या design side च्या ६-७ विषयांचा एकत्रित विचार करायला आम्ही
काही प्राध्यापकांनी त्यावेळी सुरवात केलेली होती.SoMहा विषय म्हणजे पुढे
लागणाऱ्या किमान ६ विषयांचा पाया आहे हे लक्षात आलेलं होतं. त्यामुळे थोडं जास्ती
लक्षपूर्वक शिकवत गेलो. खूप नवीन संकल्पना या विषयामध्ये शिकवाव्या लागतात.
त्यामुळे खूप सारी उदाहरणं वर्गात सोडवणे आणि घरी सोडवायला सांगणे असे करत गेलो.
अर्थात वेग कमी झाला आणि खूप जास्ती तास घ्यावे लागले. कितीही झालं तरी
प्रत्येक जण मुळात परीक्षार्थी असतोच
त्यामुळे पेपर अवघड असतील तर अभ्यास जास्ती चांगला होतो. त्यामुळे परीक्षेतले
प्रश्न अवघड किंवा challenging असले पाहिजेत हा विचार
अमलात आणायला सुरुवात केली. अर्थात वालचंद मधले विद्यार्थी पण तितकेच भारी
असल्याकारणाने प्रत्येक परीक्षेत ९०-९५ % गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असायचे.
एखादा विषय शिकताना अनेक प्रश्न पडत असतात. खरंतर असे प्रश्न पडले पाहिजेत. असे
पडलेले प्रश्न वर्गात विचारावे यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन द्यायचा
प्रयत्न करत होतो. त्यासाठी कधीकधी मीच काही प्रश्न विचारायचो आणि वर्गातल्या
कोणालाही उत्तर द्यायला सांगायचो. या प्रकारामुळे तासाला सगळेच जास्ती सजग असायचे.
कधीकधी २ वेगवेगळी उत्तरं देणाऱ्या २ विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद चालायचे आणि मग
त्यात अन्य विद्यार्थी पण सहभागी व्हायचे. विषय नीट समजण्यासाठी त्याचा चांगला
उपयोग व्हायचा.
हे सगळं खूप वेगळं आहे असं मुळीच नाही. शिक्षण शास्त्र शिकताना (BEd) हे सगळं शिकवलं जातं (हे मला BEdकेलेल्या काही
शिक्षकांकडून कळलं होतं.) पण इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या प्राध्यापकांनी हे कधी
शिकलेलं नसल्याने असे प्रयोग सहसा कोणी करत नाहीत. स्वतः विचार करून असे प्रयोग
करताना मी स्वतः खूप शिकत गेलो. पेपर अवघड काढणारे किंवा वर्गात अचानक खूप प्रश्न
विचारणारे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या मते ‘कडक मास्तर’. माझीही प्रतिमा काहीशी तशीच झाली! एका तुकडीला दुसऱ्या वर्षी एक विषय शिकवला
आणि एकदम चौथ्या वर्षी एक विषय. तेंव्हा एकाने लिहिलेली ‘And the Storm has
returned’ ही प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली!! मी ती
सकारात्मकतेनेच घेतली. तेंव्हा ती
प्रतिक्रिया वाचून मी हसलोही होतो खूप.
Automobile विषय शिकवताना practical ला अनन्य साधारण महत्त्व
आहे. कॉलेज मधली प्रयोगशाळा पण सुसज्ज अशी होती. अगदी १९७० मधल्या gearbox पासून अद्ययावत CRDI engine पर्यंत सगळं काही उपलब्ध
होतं. प्रत्येकवेळी एक एक मोडेल संपूर्ण खोलणे आणि परत जोडणे असा एक उद्योग चालू
केला. त्यापैकी gearbox संपूर्ण disassemble करताना खूप मजा आली. शिवाजी सुतार सर आणि मी मिळून एक आठवडा त्यासाठी झगडत
होतो. त्याला लागणारी काही हत्यारे विकत पण आणली. त्या एकाच प्रयोगातून सगळ्यांनाच
खूप काही शिकायला मिळालं. पुढे कंपनीमध्ये काम सुरु केल्यावर पण त्याचा खूप उपयोग
झाला असा एक-दोघांनी सांगितलं. असे feedback हे माझ्या सारख्या शिक्षकासाठी प्रेरणा जागृत ठेवण्यासाठीचं रामबाण औषध असतं.
दुसऱ्या वर्षापासूनचे SoM, TOM (Theory of Machines) हे विषय नव्याने शिकवायला लागलो पण Machine Design हा विषय एखाद्या वर्षाच्या खंडानंतर परत शिकवायला सुरु केला होता. परत एकदा machine design विषय शिकवायला सुरुवात केली तेंव्हा अनेक नवीन गोष्टी सुचायला लागल्या. पण
आधीचा अनुभव...म्हणजे तोच तो.. हवं ते कागदावर लिहून केवळ तो कागद बरोबर ठेऊन
परीक्षा देणे...ज्यावर आक्षेप घेतला गेला होता तो अनुभव.
नेमकं काय चुकलं होतं माझं असा विचार करायला लागलो तेंव्हा लक्षात आलं की तो
प्रयोग करताना मी पूर्ण system चा विचार केलेला नव्हता.
विभाग प्रमुखांची परवानगी घेतली असली तरी CoEना सांगितलेलं नव्हतं.
प्रत्येक गोष्ट नियमात बसते कि नाही हे जसं पाहावं लागतं तसेच एखादा नवीन प्रयोग
करून पाहण्याची आपल्या system ची मानसिकता आहे कि नाही
हे पण पाहावं लागतंच. Ego वगैरे मुद्दे त्या नंतरचे.
एखादा academic experiment
यशस्वी होण्यासाठी हे सर्व करायला
लागतं हे मी ध्यानात घेतलं नव्हतं.
असे प्रयोग करताना स्वतःवर विश्वास लागतो,वरिष्ठांना कल्पना द्यावी
लागते आणि विद्यार्थी सहभागी होण्यास उत्सुक लागतात..मग हा प्रयोग यशस्वी झाला तर
तो प्रयोग रहात नाही, प्रयोगाची यशस्वी कथा
बनते.
२०१५-१६ मधे परत एकदा नव्याने सुरुवात केली असे काही प्रयोग करण्याची त्याची
कथा उद्याच्या भागात..
Comments
Post a Comment