वालचंद डायरीज – भाग ८


वालचंद डायरीज – भाग ८
Consultancy – एक वेगळे विश्व २
२०१३ ते २०१५ ह्या काळात मी आणि पाटील सर खूप ठिकाणी काम करायला गेलो. सातारा, पुणे, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, कोल्हापूर, चंदगड, गारगोटी, अथणी, विजापूर, बेळगाव, बागलकोट, हुबळी हावेरी, दावणगिरी असं कुठे कुठे फिरलो. दोघांनाही driving आवडायचं त्यामुळे प्रवासाचा ताण पण आला नाही. कॉलेज मधे Registrar असल्यामुळे चव्हाण सर क्वचितच बरोबर असायचे. कधी कधी तर ४०० किमी प्रवास करून जायचं, मग ८-१० तास काम करायचं आणि परत ४०० किमी प्रवास करून परत यायचं, ते ही एका दिवसात. एकदा तर अचानक ठरल्यामुळे रात्री १० वाजता निघालो, रात्री २ वाजता कारखान्यात पोचलो. २-३ तास झोपून मग सकाळी ६ ते दुपारी१२ काम करून संध्याकाळी सांगलीला परत आलो. या कामाची एक झिंग चढली होती असा म्हणालात तरी चालेल. असं काहीही केलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज मधे वेळापत्रकानुसार असलेला तास घ्यायचाच हा नियम एकदाही मोडला नाही. एकदा तर रात्री काम संपायला खूप उशीर झाला आणि तिथून पुढे प्रवास नको वाटला. मग पहाटे ३ ला निघून सकाळी ७ वाजता सांगलीला पोचलो आणि सकाळी ८ च्या तासाला गेलो.(सांगलीत अंतरं, ट्रँफिक तुलनेनं कमी असल्यामुळे हे शक्य होते.) अश्या वेळी एखादा विद्यार्थी जर उशिरा आला तर त्याचं काय होत असेल ... कल्पना न केलेलीच बरी ना!! आठवत असेल आजही अनेक विद्यार्थ्यांना.
      साखर कारखान्यांमधे कामं करतच होतो. याशिवाय 'किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड' ही किर्लोस्करवाडीची कंपनी आमची मुख्य ग्राहक होती. तिथे मोठे मोठे पंप तयार होत आणि मग त्यामध्ये vibration संबंधी काही समस्या असेल तर आम्हाला बोलावत. साखर कारखान्यांपेक्षा इथे वातावरण खूप चांगलं असायचं. अनेकदा खूप मोठे पंप असले कि त्याची तपासणी फक्त रात्रीच करायला परवानगी असायची. मग अख्खी रात्र तिथेच जायची. खूप वेळा निर्यात होणारे पंप असले कि विदेशी ग्राहक witness testing साठी आलेले असायचे. सुरक्षितता नियमांचं पालन काटेकोरपणे करण्यावर त्यांचा भर असायचा. आपण इथे किती असुराक्षितपणे काम करत असतो हे जाणवायचं.
      किर्लोस्करवाडीतील कंपनी मधल्या बऱ्याच लोकांना vibration बद्दल Acadamicअशी जास्ती माहिती नसायची म्हणून मग २०१५ मधे आम्ही तिघांनी मिळून २ दिवसांचा एक प्रशिक्षण वर्ग घेतला तिथे. असं दुसऱ्या कंपनी मधे जाऊन शिकवायची माझी तरी पहिलीच वेळ होती. पण छान झाला सगळा कार्यक्रम. नंतरही २०१९ मधे तसा प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी आली होती पण ते जमलं नाही.
२०१६ आणि २०१७ मधे ONGC सारख्या मोठ्या कंपनी बरोबर काम करायची संधी मिळाली. त्यांच्या गुजरात मधील भरूच जवळ असलेल्या  C2C3 plant मधे काही pump ना vibration संबंधी समस्या होत्या. त्यासाठी आम्हाला बोलावले होते. एकूण ३ वेळा तिकडे कामासाठी जाणे झाले. खूप वेगळा अनुभव मिळाला. त्याच्या काही दिवस आधीच आम्ही तिघांनी “Institute of Vibration, USA”  ह्यांची एक परीक्षा दिली आणि Certified Vibration Analystम्हणून मान्यता मिळवली.
      जाता येता प्रवासात कामाविषयी चर्चा चालायच्या. त्यातून मग आमचं ज्ञान पण वाढायला लागलं. कोल्हापूरचा संदीप रामनामे म्हणून एकजण देखील अशी consultancy ची कामे स्वतंत्रपणे करायचे.मग काही वेळा एकमेकांच्या अनुभवांची मदत व्हायची.नवनवीन गोष्टी कळायला लागल्या. कामात आलेल्या अडचणी मग आम्ही काँलेजमधे प्रयोगशाळेत तपासून पाहायला लागलो. BTechआणि MTechच्या project साठी अनेक विषय आम्हाला त्यातून सापडायला सुरुवात झाली. कारखान्यामध्ये पण नवीन काही दिसलं कि त्याचे फोटो काढायचे आणि संधी मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांना ते दाखवायचे. Whatsappचं हत्यार मिळाल्यावर तर ते खूप सोपं झालं.
कामाला सुरुवात केली तेव्हा अनेकदा MTechकरणारे १-२ विद्यार्थी बरोबर असायचे. नंतर काही कारणामुळे ते बंद झालं. MTechच्या विद्यार्थ्यांबरोबरचा संपर्क पण कमी झाला. मग BTechच्या विद्यार्थ्यांना का घेऊन जाऊ नये असा विचार केला. त्यावर्षी माझ्याबरोबर project करणारा गट vibration आणि balancing यावरच काम करत होता. मग ३-४ वेळा त्या गटातले विद्यार्थी बरोबर आले. पुढच्या वर्षी मग ठरवून प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी विद्यार्थी बरोबर असायचा.
फेब्रुवारी २०१९ मधे किर्लोस्कर कंपनीकडून एक मोठं काम मिळालं. १७ पंप तपासायचे होते. पंप तसे आकाराने लहानच होते पण सगळे निर्यात होणार होते आणि vibration ची acceptable limit खूप कमी होती. या कामासाठी खूप वेळा किर्लोस्करवाडीला जात होतो. त्यावेळी पण बरोबर कोणीतरी विद्यार्थी असायचे. मुद्दाम सांगावं वाटतं विद्यार्थ्यांना पण रात्रभर जागरण होणार असलं तरी कामाबद्दल उत्सुकता असायची, त्यांना ही चांगले प्रश्न पडायचे. एकदा तिथे एक महिला engineer काम करताना दिसल्या आणि मग नंतर काही विद्यार्थीनींना पण बरोबर घेऊन गेलो. प्रत्यक्ष काम करायला कंपनी मधे जायला मिळणे, critical समस्या सोडवताना मदत करणे हा अनुभव सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरला असेल यात शंका नाही.
एकीकडे तांत्रिक बाबतीत आम्ही समृद्ध होत असताना बाकी पण अनेक गोष्टी समजावून घ्याव्या लागत होत्या. २०१० मधे मी हे काम करायला सुरुवात केली त्याचवेळी कॉलेज मधे MTE सोसायटी आणि वालचंद ग्रुप ह्यांच्यामध्ये वाद होऊन कॉलेजने स्वतंत्र PAN घेतला होता त्यामुळे काही ठिकाणी TDS चा प्रश्न यायला सुरुवात झाली. त्याच सुमारास सेवा कर (service tax) पण सुरु झालेला होता. कॉलेज मधे अनेकांना हे माहिती नसल्याने लेखा विभागाला (accounts office)) अडचणी येत.
उदाहरणार्थ consultancy चे शुल्क समजा रुपये १०,००० असेल तर प्रत्यक्षात १०.३३% सेवाकर मिळवून रुपये ११,०३३ घेणे अपेक्षित असायचे. पण काही विभागांना हे नीटसं माहित नसल्यामुळे ते फक्त १०,००० रुपयेच घेत आणि रोखपालाकडे (cashier) पाठवून देत. मग त्या १०,००० ची योग्य ती फोड करावी लागायची आणि तिथेच काम अडायचे. काम अवघड होते असे नाही पण ते पटकन आणि अचूक कसे करायचे हे कळत नव्हते. कारण Engineering मधे tolerance असतो पण हिशोबाच्या कामात एक रुपयाचा फरकसुद्धा चालत नाही. मग १०,००० ची फोड ९,०६४ रुपये मुळ रक्कम आणि त्यावर १०.३३% सेवाकर म्हणजे ९३६ रुपये अशी करता येते आणि त्यासाठी एक छोटं सूत्र आहे हे तिथे काम करणाऱ्या व्यक्तींना समजावून देताना आमच्यातलं शिक्षकी कौशल्य पणाला लावावं लागलं! (एकदा शिक्षक झालात की इंजिनिअरिंग आहे की अकाऊंटस् काही बघायचं नाही. बरोबर आहे ना, आपल्याला समजलंय ना.. आणि समोरच्याचं अडलंय का तर मग जे जे आपणासी ठावे....)
पैसे देणे टाळण्यासाठी किंवा काही ठिकाणी अन्य अपेक्षांमुळे अडवाअडवीचे अनुभव पण आले. असल्या गैर अपेक्षांना आम्ही कधीच शरण गेलो नाही. २०१४ मधे एकदा असेच एका कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेलो असताना एक महाशय आमच्या सरांना म्हणाले, “हे काय तुमचं बिल आहे का? बिल आहे कि पत्र तेच कळत नाही. बिल नंबर पण नाही यावर साधा. पुढच्या वेळी असलं बिल स्वीकारणार नाही.बाहेर पडल्यावर थोडं शांतपणे विचार केल्यावर जाणवलं कि त्याचं मत बरोबर होतं. पूर्वी सेवाकर वगैरे नसताना नुसती रक्कम, सही ,शिक्का एवढंच पुरत होतं. पण आता नियम बदलले होते. थोडं अधिक व्यावसायिक होण्याची गरज होती. बरेच कष्ट घेऊन मग आम्ही एक नमुना तयार केला. कॉलेजच्या ऑफिसमध्ये दाखवायला आणि त्यांची मान्यता घ्यायला गेलो तर तिथे कोणाला काही घेणं देणंच नव्हतं.    मग आमचं आम्ही नवीन नमुन्याप्रमाणे बिल तयार करायला लागलो. ओळीने बिल क्रमांक द्यायला लागलो. GST लागू झाल्यानंतर कॉलेजला या सगळ्याचं महत्त्व कळलं. मधे फक्त तीन साडे तीन वर्ष गेली होती. नंतर मात्र आम्ही केलेल्या नमुन्यानुसार कॉलेज मधली सगळी बिल्स व्हायला लागली. पण बिल किंवा invoice करण्याची पद्धत आम्ही तयार केली आहे याचा साधा नामोल्लेख सुद्धा कुठे केला गेला नाही. याचा निदान त्यावेळी तरी राग आलेला होता. माझ्या व्यवहारी- शिक्षणात (consultancy work ने) कारखान्यांनी भर घातली आणि हे घेतलेलं शिक्षण मी वर्गात indirectly share केल्याने माझ्या विद्यार्थ्यांना काँलेजनंतर (त्यांच्या job च्या ठिकाणी ) कारखान्यात उपयोगी पडतं असं माझ्या लक्षात आलं होतं.
चव्हाण सरांबरोबर मी आणि पाटील सर ह्या उद्योगामध्ये पडलो त्याच दरम्यान चव्हाण सरांच्याच प्रेरणेने आडमुठे सर सुद्धा त्यांच्या क्षेत्रात (material characterization, NDT वगैरे) consultancy करायला लागले होते. कॉलेज मधल्या metallurgy प्रयोगशाळेचा त्यांनी अक्षरशः कायापालट केला म्हंटलं तरी चालेल. सांगली मधल्या अनेक foundry मधे आता आडमुठे सरांचा सल्ला घेतला जायला लागला आहे. पण वालचंद मधे त्याची दखल कधीच घेतली गेली नाही. हे negative thinking किंवा उकरून काढणे नाही. हे तेंव्हा पण बोलत होतो आजही तेच मांडतोय. अर्थात हे केवळ आमच्या इथे घडत होतं असं नाही. हा अनुभव अनेकांना असेल. प्राध्यापक आहात शिकवा ना मग, कशाला consultancy करताय (त्यांच्या मते जास्त पैसे मिळवताय)
पण वालचंद मधे आणि विशेषतः आमच्या विभागात चव्हाण सरांनी आम्हालाच का हाताशी घेतलं असा प्रश्न अनेकांना पडत होता (सरांनी नकळतपणे आमच्या घेतलेल्या परीक्षा आणि आम्ही करत असलेले कष्ट त्यांना दिसत नव्हते, त्यांना फक्त दिसत होते यातून मिळणारे पैसे). यामध्ये बरोबरीचे असे काही प्राध्यापक होते तसेच काही वरीष्ठ पण होते. काही प्राध्यापक विभाप्रमुख झाल्यावर तर आनंदी आनंदच होता. जिथे जिथे अडवाअडवी करता येईल तिथे तिथे ती केली जायची. पण हळूहळू आम्हाला पण सवय झाली त्याची. शक्यतो दुर्लक्ष, काही ठिकाणी bypass काही वेळा जोरदार वाद असं चालत राहिलं. आम्ही हे सगळं राजकारण पूर्णपणे थांबवू शकलो नाही तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे पहात होतो. खरंतर consultancy मुळे प्रत्यक्ष फील्डवर काम करायला मिळत होते याचा उपयोग थेट वर्गात करता येत होता.

२०१७ मधे चव्हाण सरांची पुनर्नियुक्ती होऊ नये म्हणून विभागप्रमुखांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले पण २०१८ मधे पाटील सरांना PhD साठी IIT मधे जाता येऊ नये या  त्यांच्या प्रयत्नांना मात्र अपयश आले. तात्पर्य, सप्टेंबर २०१८ मधे consultancy चं काम करायला मी एकटाच शिल्लक राहिलो. सुहास जगताप सर माझ्याबरोबर यायला आणि शिकायला तयार होते पण परत एकदा विरोधासाठी विरोध म्हणून त्यांना माझ्याबरोबर येण्यापासून रोखलं गेलं. पण एव्हानी अश्या प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी positive घडवता येतं हे कळलेलं होतं.
ऑक्टोबर २०१८ मधली अशीच एक भन्नाट आठवण. बहुदा २६-२७ ऑक्टोबर. कॉलेजमधे २ दिवसांची एक कार्यशाळा मी आयोजित केलेली होती. त्यासाठी बाहेरून व्याख्याते आलेले होते. आणि नेमकं त्याचवेळी रेणुका शुगर्स मधून फोन आला कि काहीही झालं तरी उद्या सकाळपर्यंत या. कारखाना चालू झालेला आहे आणि उद्या दुपारपर्यंत centrifugal विभागाचं काम चालू होईल त्यापूर्वी तिथली मशीन तपासून दुरुस्त करावीच लागतील. मला कॉलेजमधून बाहेर पडण अशक्य होतं. दुसऱ्या कोणाला पण जमणार नव्हतं. मग एकचं पर्याय शिल्लक होता. संध्याकाळी कॉलेजमधलं सत्र संपलं की निघायचं, रात्री काम करायचं आणि सकाळी परत कॉलेज सुरु व्हायच्या आधी पोचायचं. मी असं काहीतरी करणार ह्याची कुणकुण चव्हाण सरांना लागली. आणि एकट्याने जायचे नाही रात्री, मी येतो बरोबर.असा त्यांचा मेसेज आला. दोन्ही दिवस त्यांना पण आष्टा कॉलेज मधे महत्त्वाचं काम होतं. तरीही ते यायला तयार झाले. त्यांचं तेंव्हावय वर्ष फक्त ६६! संध्याकाळी ७ वाजता निघालो, खूप दिवसांनी एकत्र प्रवास करत असल्याने गप्पांना खूप विषय होते. १६५ किमी प्रवास करून रात्री १० च्या आसपास कारखान्यात पोचलो. आधी कळवलेलं असल्याने तिथली टीम तयारच होती. रात्री १०:३० ते २:३० काम चालू होतं. काम झाल्यावर थोडावेळ झोपायच्या आग्रहाला न जुमानता परतीच्या प्रवासाला लागलो. पन्नास एक किमी प्रवास झाला असेल. रस्त्यात एक tractor उलटून पडलेला. जवळजवळ सगळा रस्ता बंद. पर्यायी रस्ता नाही. आता crane येणार कधी तो tractor सरळ करणार कधी आणि रस्ता मोकळा होणार कधी. दोघांनाही सकाळी ८ पर्यंत आपापल्या कामाच्या ठिकाणी पोचायचं होतं त्यामुळे एक डोळा घड्याळावर आणि एक डोळा रस्त्यावर अशी जयद्रथ वधापूर्वीच्या अर्जुनासारखी आमची अवस्था. त्या परिस्थितीमधून आम्हाला सोडवायला कोणी कृष्ण येणार नव्हता त्यामुळे आपल्यालाच हातपाय मारले पाहिजेत हे लक्षात आलं. थोडं नीट निरीक्षण केल्यावर समजलं कि आडव्या पडलेल्या trolley शेजारी जो tractor उभा आहे तो ८-१० फुट हलवला तर आमची गाडी निघू शकेल. पण त्या tractor चा चालक तिथे नव्हता. मग धक्का देऊया असा ठरवलं. आम्ही काही प्रयत्न करतोय हे बघून आणि ३-४ ट्रकचालक मदतीला आले. अनेक विद्यार्थी Johndeereह्या tractor बनवणाऱ्या कंपनी मधे काम करतात. त्याचं स्मरण करून tractor वर चढलो. ब्रेक सोडले, गिअर काढला आणि मग बाकीच्यांनी धक्का दिला. २ प्रयत्नांनंतर पुरेशी जागा झाली आणि आम्ही आमची गाडी सुखरूप पुढे काढली. पहाटे ६:३० च्या आसपास सांगलीला पोचलो आणि वेळेवर कॉलेजमध्ये गेलो. म्हंटलं तर पराक्रम ,म्हटलं तर थ्रिल( अगाऊपणा) आणि म्हटलं तर कामाप्रती निष्ठा! पण इच्छा असेल तर कुठल्याही अवघड परिस्थितीमध्ये मार्ग काढता येतो याचं एक उत्तम उदाहरण. आयुष्यभर लक्षात राहिलं असं.
Consultancy च्या वेगळ्या विश्वाबद्दल खूप काही लिहिण्यासारखं आहे. पण योग्य तिथे थांबलेलं उत्तम. वालचंद डायरीज् मधला consultancy हा खूप मोठा आणि विस्ताराने लिहिण्यासारखा विषय आहे पण तो सध्या थांबवतोय..पुढच्या काही भागात ओघाने लिहिणे झाले तर होईलच नाहीतर पूर्णविराम.
कॉलेज सोडताना ह्या क्षेत्रामध्ये कमावलेलं कोणाकडे तरी द्यावं अशी खूप इच्छा होती. कारण मी सगळं इथेच शिकलो होतो ना! सुदैवाने एप्रिल २०१९ पासून सुहास जगताप सर कॉलेजमधल्या सगळ्या अडचणींवर मात करून माझ्याबरोबर यायला लागले. शेवटचे ६ महिने मग काम करत असतानाच एक एक गोष्ट त्यांच्याशी share करणे सुरु होते. वेळ कमी पडला. पण मी जे शिकलो त्यापैकी अंशतः तरी पुढे pass on करू शकलो याचं समाधान आहे. आणि वालचंद कॉलेजमधली मेकँनिकल डिपार्टमेंट मधली ही consultancy ची परंपरा अशीच पुढे चालू राहिल ह्याची खात्री सुद्धा!

अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem