वालचंद डायरीज् – भाग १२


वालचंद डायरीज् भाग १२
वालचंदमधील क्लब आणि मी
      वालचंदकॉलेजमधील क्लब सिस्टीम हा एक अफलातून प्रकार आहे. अभ्यासपूरक (co-curricular) आणि अभ्यासेतर (extra curricular) उपक्रमांची खूप चांगली रचना या क्लबच्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये मोठे योगदान या सगळ्या क्लबचे आहे यात दुमत असणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या आवडीनुसार सामावून घेता येईल असे अनेक विषय इथे हाताळले जातात. प्रत्येक क्लबचे असे स्वतःचे वैशिष्ट्य आणि परंपरा तयार झालेली आहे. व्यक्तिमत्त्व विकसन हेच उद्दिष्ट असलेला PACE क्लब असो किंवा सामाजिक बांधिलकी जपणारा ROTARACT क्लब असो, खास सांगलीकर मंडळींसाठी चालू झालेला SOFTA असो किंवा कलाकारांचा ART CIRCLE क्लब असो प्रत्येक क्लब आपापले काम चोख करत असतो. या बरोबरच प्रत्येक विभागाचा technical क्लब म्हणजे MESA, CESA , EESA , ELESA वगैरे आहेतच. आजही कुठलाही अगदी जुना माजी विद्यार्थी भेटला तर कॉलेज मधल्या आपल्या क्लबविषयी आस्थेने चौकशी करत असतो.
      विद्यार्थीदशेमध्ये मी कॉलेजमध्येच खूप कमी जायचो त्यामुळे कधीतरी मित्रांच्या आग्रहामुळे कधी MESA किंवा SOFTA ह्यांच्या meeting ना गेलो असेन. बाकी कॉलेज बाहेरच ज्ञानप्रबोधिनीचे माझे उद्योग जास्त चालू असायचे. (NTS साठी मुलांना शिकव, शालेय वयोगटातील मुलांचे ट्रेक नेणे, गणेशोत्सवात मिरवणुकामधे बर्चीचा गट बसवणे इ.) प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे प्रवेश झाल्यावरच हळूहळू या सगळ्या क्लब विषयी जास्ती माहिती होत गेली.
      २०१० मधे श्री. कानिटकर सर VRS घेऊन निवृत्त झाले आणि ROTARACT क्लबचा staff advisor होण्याची जबाबदारी माझ्यावर आली. एखाद्या activity मधे स्वतः सहभागी होणं वेगळं आणि फक्त शिक्षकाच्या भूमिकेतून सल्ले देणं वेगळं. staff advisor ने  नेमकं काय करायचं असतं? असा प्रश्न तर नक्कीच पडला पण त्याचं उत्तर देणार कोण? अर्थात ते ही काम विद्यार्थ्यानीच हाती घेतलं.
      अगदी सुरुवातीला तर माझा सहभाग फक्त वेगवेगळ्या परवानगी पत्रांवर सह्या करण्या इतकाच मर्यादित होता. बहुदा मुलांना पण असंच कोणीतरी सह्याजीरावगरजेचा असावा! पण मग हळूहळू मी त्या प्रत्येक पत्रामध्ये छोट्या छोट्या सुधारणा सुचवायला सुरुवात केली. त्या निमित्ताने क्लब मधल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलणं होऊ लागलं. एकेका activity बद्दल ते कसा विचार करतात हे समजावून घेत होतो. एकंदर सगळा कारभार परंपरावादी होता. म्हणजे अमुक एक गोष्ट तुम्ही का करताय असा प्रश्न विचारला की    दरवर्षीच करतो आम्हीअसं उत्तर मिळायचं. रोज नवीन सुचले पाहिजेअसा विचार लहानपणापासून ऐकलेला असल्यामुळे अश्या उत्तरांचा मला राग यायचा. कधीतरी या परंपरांपलीकडे जाऊन मुलांनी स्वतः विचार केला पाहिजे हे माझं ठाम मत होतं.
दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी च्या आसपास rotaractक्लब रक्तदान शिबीर आयोजित करायचा. रक्तदान हा माझ्या पण जिव्हाळ्याचा विषय. मग तिथून आमचे सूर थोडे जुळायला लागले. ३००० विद्यार्थी असलेल्या महाविद्यालयामध्ये १०० बाटल्या रक्त गोळा करून समाधान मानलं जात होतं. त्यावर्षी नियोजनाच्या बैठकीमध्ये किमान ३०० बाटल्या रक्त गोळा झालं पाहिजे असं मी उद्दिष्ट दिलं. आणि मग अपोआप बाकी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय होत गेले. जास्ती विद्यार्थी पाहिजेत तर सुट्टीचा दिवस नको, मग कॉलेज च्या दिवशी संध्याकाळच्या ४ तासांमध्ये एका blood bank ला इतकं उरकणार नाही त्यामुळे एकावेळी २ blood bank ला बोलावता येईल का वगैरे वगैरे. त्याच दरम्यान सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मधे रक्ताचे घटक वेगळे करण्याची यंत्रणा बसवलेली होती. त्यामुळे परंपरेनुसार शिरगावकर रक्तपेढी आणि सिद्धिविनायक मधली रक्तपेढी अश्या दोघांना एका वेळी आमंत्रण दिलं. एकदा मुलं आपला आपला नवीन विचार करायला लागली की त्यांना advisor ची फारशी गरज पडत नाही. मग शिक्षकाचं काम फक्त पाठीशी उभे राहणे. एकदा रक्तदान शिबीर यशस्वी होऊ लागल्यावर मग आम्ही पुढच्या टप्प्याचा विचार करायला लागलो. emergencyमधे अनेकदा रक्तपेढी मधून फोन यायचे आणि गरजेप्रमाणे अनेक विद्यार्थी जाऊन रक्तदान करून यायचे. या निमित्ताने सिद्धीविनायक मधले तंत्रज्ञ श्री जितेंद्र आणि तिथले प्रमुख डॉ. उदगावकर ह्यांच्याशी चांगला परिचय झाला. आजही रक्ताची गरज पडली की ते हक्काने फोन करतात आणि वालचंद मधले विद्यार्थी आणि शिक्षक मदतीला धावून जातात.
रक्तदानाबरोबरच पहिल्या सत्रामध्ये “Rainbow” नावाचा शालेय विद्यार्थ्यांसाठीचा खूप छान कार्यक्रम किंवा स्पर्धा rotaractक्लब आयोजित करायचा. सांगलीमधल्या पन्नासेक शाळांमधले विद्यार्थी त्यात सहभागी व्हायचे. इतकेच नव्हे तर अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी पण त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये जाऊन ही स्पर्धा घेतली जायची. ते दोन दिवस कॉलेज खरंच इंद्रधानुष्यासारखं रंगबेरंगी झालेलं असायचं. एकीकडे आयोजकांसाठी एकावेळी २००० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ७ स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठीचं नियोजन करण्याचं आव्हान असायचं तर दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांना वालचंद कॉलेजमध्ये येऊन तिथले ताई -दादा काय काय करतात हे बघायला मिळायचं. इथे सुद्धा दरवर्षी एकतरी वेगळी स्पर्धा घेतली पाहिजे असा आग्रह मी धरत होतो आणि आधीच्या लोकप्रिय स्पर्धा न थांबवता आल्यामुळे ७ ऐवजी ८-९ अशी स्पर्धांची संख्या पण वाढत गेली. या दरम्यान अनेक गमती पण घडायच्या. कॉलेज मधली गर्दी योग्यप्रकारे मार्गी लावणाऱ्या गटामधल्या पहिल्या वर्षातल्या एका विद्यार्थ्याने एकदा कॉलेजच्या उपप्राचार्यांनाच पालक समजून हटकले आणि पालकांसाठी केलेल्या विश्रांती कक्षाकडे जाण्याची विनंती केली.
दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा अशीच एक अंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केली जायची. तिथे पण दरवर्षी नावीन्यपूर्ण विषय असायचे. मार्केटिंग, आंतरराष्ट्रीय राजकारण, युद्ध प्रसंग, अर्थकारण यावर आधारित या स्पर्धांमधे सहभागी विद्यार्थी खूप चांगली तयारी करून यायचे. त्यामुळे अशा स्पर्धा बघायला जाणे हे पण मला आवडायचे. रोजचे इंजिनिअरिंग मधले विषय सोडून अनेक वेगळे विषय या निमित्ताने समजायचे.
२०१३-१४ नंतर काही वैयक्तिक कारणांमुळे मी rotaractच्या staff advisor पदावरून बाहेर पडलो. पण कॉलेज मधे असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याशिवाय चैन पडायचे नाही.
२०१५ च्या जुलै महिन्यात नवीन सत्र सुरु होताना विभागातल्या शिक्षकांची बैठक सुरु होती. काही जबाबदाऱ्याची पुनर्रचना किंवा फेर वाटप सुरु होते. श्री दिघेवाडे सर, श्री नाईक सर, श्री पाटील सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली Mechanical Engineering Students Association (MESA) हा क्लब चांगला नावारूपाला आलेला होता.  त्यापूर्वी ३-४ वर्ष पाटील सर staff advisor म्हणून काम बघत होते आणि नवीन कोण ही जबाबदारी घेणार अशी चर्चा चालू होती. त्यांच्या थोडाच आधी मी कॉलेजच्या  LMC (Local Management Committee) वर शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेलो होतो आणि तिथे काही नवीन जबाबदारी स्वीकारलेली होती. पण तरी विभागाताल्याच विद्यार्थ्यांबरोबर काम करायची संधी सोडावीशी वाटली नाही. अन्य कोणी उत्सुकता दाखवली नाही आणि परत एकदा  मी staff advisor बनलो.
तोपर्यंत उत्साही board members मंडळीनी त्या वर्षातल्या उपक्रमांचे नियोजन पूर्ण केलेलं होतं. इतकंच नाही तर खातेवाटप होऊन लगेच येणाऱ्या मोठ्या कार्यक्रमाचे म्हणजे “Vertex” साठी काम पण चालू झालेलं होतं. अर्थात माझं काम फक्त ममम्हणायचं होतं. २०१५ हे Vertex ह्या स्पर्धेच दहावं वर्ष असल्यामुळे विशेष होतं. पहिल्याच meeting मधे बहुसंख्य मुली board member असलेल्या पाहून मी थोडा चक्रावून गेलो. (मेकॅनिकलला आम्ही शिकताना पण मुली नसायच्याच  आणि मी शिकवायला लागल्यावरही मुलांच्या तुलनेत  मुली कमीच असत.)पण माझ्या मनातली भीती थोडेच दिवसात कमी झाली. विद्यार्थी विद्यार्थिनींचा तो गट खूपच अफलातून होता. काळजीपूर्वक केलेलं नियोजन, उत्साहाने प्रत्येकाने आपापले काम पूर्ण करणे यामुळे मला विशेष काही कामच नव्हते. प्रत्येकवेळी फक्त नवीन काय विचार करताय हा प्रश्न मी विचारात राहायचो. प्रत्यक्ष स्पर्धेच्या आधीचे ८-१० दिवस हातघाईचे असतात. संध्याकाळी उशिरापर्यंत सगळ्यांना काम करावे लागते. इथे मात्र थोडी अडचण आली. त्यावेळच्या नियमानुसार रात्री ९ वाजता सगळ्या मुलींनी होस्टेलमधे परत जायला लागायचे. पण त्या गटात  इथे काम करणाऱ्या मुलीच बहुसंख्य असल्याने कामाचा खोळंबा व्हायचा. सगळ्या मुलींनी उशिरापर्यंत काम करण्याची रितसर परवानगी मागितली आणि ती नाकारली गेली. हळूहळू मग ९ चे १०,१०:३० वगैरे पर्यंत मुली काम करायच्या आणि एकत्र सुखरूप होस्टेलवर परत जायच्या. एकेदिवशी सकाळी लवकरच मी consultancy च्या कामासाठी बाहेर गेलो. दुपारी ४ च्या सुमारास परत यायला निघालो होतो इतक्यात.फोन वाजला.सर, मी ... बोलतीय.आवाजावरून कळलंच की काहीतरी गडबड आहे.सर, आमच्या विरुद्ध security ने तक्रार केली आहे आणि आता आम्हाला director सरांनी बोलावलंय. काय करू?”
झालं असं होतं की आदल्या रात्री workshop मधे काम करताना १२ वाजून कधी गेले हे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं आणि अर्थातच सुरक्षा रक्षकांनी सगळ्या मुलींची नावं लिहून घेतलेली होती. असं नावं लिहून घेणं वगैरे प्रकार फक्त भीती दाखवण्यासाठी केले जातात असं वाटून या मुलींनी पण कोणाला काही सांगितलेलं नव्हतं आणि त्यावेळच्या सुरक्षा रक्षकांची दुसऱ्या दिवशी माफी वगैरे पण मागितलेली नव्हती. अर्थातच विषय संचालकांपर्यंत गेला होता. मी कॉलेज मधे पोचलो तोपर्यंत वातावरण चांगलंच गंभीर झालेलं होतं. एकदा staff advisor म्हणून माझं मत घ्यायचं आणि मग काय ती शिक्षा करायची असं जवळजवळ ठरलेलं होतं. काय करावं असा विचार करतच मी माननीय संचालकांच्या कॅबिनमध्ये गेलो. सर बऱ्यापैकी चिडलेलेच होते. सगळा प्रकार मला सांगून त्यानी विचारलं की आता काय करायचं? Now ball was in my court. “सर, खूप सोपं आहे. ह्या सगळ्या मुली एकत्रितपणे कॉलेजच्या event साठी काम करत होत्या. कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत. त्यानी रितसर परवानगी पण मागितलेली होती. तुम्ही त्याच पत्रावर परवानगी द्या. ते पत्र माझ्याकडे राहिल्यामुळे काल मुली ते पत्र सुरक्षारक्षकांना दाखवू शकल्या नाहीत असं मी लिहून देतो. मग कुठलाच प्रश्न राहणार नाही.मी काय म्हणतोय ते अनुभवी सरांना लगेच कळंल. इथून पुढे या मुलींची जबाबदारी तुझीअसं म्हणत त्यांनी त्या जुन्या पत्रावर परवानगी दिल्याची सही केली. त्या दिवशीचा तिढा सुटला, सगळ्या मुलींचा जीव भांड्यात पडला. पण event संपेपर्यंतचे पुढचे ६-७ दिवस मी त्या जबाबदारीमुळे मी चांगलाच tension  मधे होतो.    
दुसरा असाच वादग्रस्त विषय ठरला तो म्हणजे हिशोब. सुरुवातीला एकदा सगळी अपेक्षित आकडेवारी पाहिल्यावर मी दररोज काही बघत नव्हतो. सगळा कार्यक्रम संपल्यावर हिशोब पूर्ण करून त्या कार्यक्रमाचे प्रमुख असलेले दोघे आणि treasurer असे तिघे माझ्याकडे आले. पण हिशोब पूर्ण करणे आणि हिशोब जुळणे म्हणजे काय हेच त्यांना माहित नव्हते. सिनिअर मंडळींनी पण काही सांगितलेले नव्हते. माझ्या घरातले वातावरण हिशोबाच्या बाबतीत तसे कडक. तेच माझ्यात आलेले. मग काय... पुढचे ५-६ दिवस खूप तास खर्च करून त्यांना हिशोब पूर्ण करावे लागले. मी पण थोडा जास्तीच कडक वागलो असणार कारण त्यावेळी tresurerअसलेली विद्यार्थिनी त्यानंतर आजतागायत माझ्या समोर आलेली नाही! पण ती विद्यार्थिनी या प्रसंगातून उत्तम हिशोब करायला मात्र शिकली असेल अशी आशा करतो.
जुलै ते डिसेंबर चा कालावधी आणि  नंतर जानेवारी मधला माजी विद्यार्थी मेळावापण पार पडला. जानेवारी मधे विभाग प्रमुख बदलले. नवा गडी नावं राज्य!! ६ च महिन्यांपूर्वी मी ही MESA staff adviser ची जबाबदारी स्वीकारलेली होती. विभाग प्रमुखांना चांगलं चालू असलेलं बघवलं नाही.  त्यांनी ती जबाबदारी बळजबरीने दुसऱ्या प्राध्यापकांकडे दिली. अश्या घटनांची मला तोपर्यंत सवय झालेली होती आणि एव्हानी वाचकांना पण सवय झाली असेल. तेंव्हा मी जास्ती काही लिहित नाही. पण त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांनी   विभागप्रमुखांच्या या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता. पण नवीन विभाग प्रमुखांना त्यांच्या पद्धतीने विभाग हाताळू द्यावा असा विचार मा. संचालकांनी केला. त्यानंतर च्या कालावधीमध्ये MESA चं काय काय झालं यावर मी भाष्य करणे योग्य नाही. पण ते सहा महिने मला  अनुभव समृद्ध करून  गेले आणि पुढच्या काळात विद्यार्थ्यांबरोबर अनेक उपक्रम करताना त्याचा भरपूर उपयोग झाला. ते सगळे विद्यार्थी त्या सहा महिन्यांची नेहमी चांगली  आठवण काढत असतात हेच काय ते माझे यश !
(याशिवाय २०१० मधे आम्हीच स्थापन केलेल्या SAE INDIA Collegiate club चा staff advisor म्हणून मी २०१९ पर्यंत काम करत होतो. पण ते सगळे अनुभव ही वेगळीच कथा आहे. त्यामुळे त्याबद्दल परत कधीतरी लिहीन.)   
एक मात्र नक्की वालचंद मधे अभ्यासातील गुणवत्तेबरोबरच आजही हे क्लब, event जोमात सुरू असतात.. आणि काँलेजला जीवंतपणा आणत रहातात .
     
                                                           अमर परांजपे

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem