एक संस्मरणीय भेट !

अजित कानिटकर ( १९७६ तुकडी )
दिल्ली, साऊथ ब्लॉक, १० डिसेंबर २०१९, संध्याकाळचा एक तास संस्मरणीय होता. साऊथ ब्लॉकमधे मोठ्या पदावर असलेल्या वर्गमित्राला पुण्याहून निघण्यापूर्वी एस.एम.एस. करून विचारले होते की 'वेळ असेल तर भेटायला आवडेल', 'कामाची गडबड पाहून कळवितो' असा लगेच प्रतिसाद आला. दिल्लीत पोहोचण्याच्या आदल्याच दिवशी त्याच्या कार्यालयातून संपर्काचा फोन आला की संध्याकाळी सहा वाजता साऊथ ब्लॉक गेट येथे यावे, पंधरा मिनिट अगोदर पोहोचावे, त्याप्रमाणे प्रवेशपत्र मिळेल.
      दिल्लीतील थंडीमधील संध्याकाळ सुंदर असते. मी वेळेपूर्वी पोहोचल्याने काम संपवून घरी जाणाऱ्यांची वर्दळ होती. सैन्यातील विविध पदांवर काम करणारे अनेक अधिकारी त्यांच्या रुबाबदार गणवेशात कार्यालयातून परतत होते. सुरक्षा कर्मचाऱ्याने मोबाईल जमा करून ठेवला मित्राच्या कार्यालयाच्या स्वागतकक्षात मी वाट पाहात होतो. ब्रिगेडियर यांनी चहा की कॉफी असे विचारून मराठीतच संभाषणास सुरूवात केली! सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर कार्यालयात प्रवेश मिळाला. नंतर जवळपास अर्धातास अनेक विषयांवर गप्पा झाल्या.
· आसाम – अरुणाचल
· काश्मिरमधे युवक-महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार हवा आहे.
· पुण्याहून अरुणाचलला मैत्री यात्रेसाठी सायकलने गेलेला गट काश्मिरमधे काम करणारी दुसरी संस्था
· कोहिमा-पेरेन (मी जालुकीत काही काळ होतो) नागालॅंड!
· मुख्यधारेत कोणाला आणायचं? उर्वरित भारताने मोठ्या संख्येने ईशान्य भारताशी नाते जोडले पाहिजे - तीच खरी मुख्य धारा आहे!
· सरकारी  खासगी क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करताना येणारी आव्हाने त्यांच्यावर उत्तरे काढण्याचा प्रयत्न, कामाच्या पद्धतीतील फरक- संस्कृती .
      निघताना डॉ. गिरीश बापट, संचालक, ज्ञान प्रबोधिनी यांनी  डिसेंबर २२ च्या कार्यक्रमाला पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले. गप्पा अजूनही चालल्या असत्या पण त्याच रात्री/मध्यरात्री कामासाठी परदेशी दौरा असल्याने मीही घड्याळाकडे लक्ष ठेवून निरोप घेतला.  भारतीय लष्कराच्या उपप्रमुखांच्या त्या भव्य खोलीत आपल्या वर्गमित्रासह 'अभ्यास देशस्थितीचा समतोल राहो'  हे गीत पुन्हा आठवले. त्याच कार्यालयातील एक जवान मला दुसऱ्या मजल्यावरून गेट क्र. पर्यंत सोडण्यास आला.
      हे पान लिहावे का नाही याचा मला संभ्रम आहे, पण मी लिहायचे ठरवले. जनरल नरवणे यांच्या भेटीनंतर दुसऱ्या मजल्यावर लिफ्टसमोर जवानासोबत वाट पाहात असताना अचानक एक धिप्पाड माकड (हो - माकड!) शांतपणे चालत-चालत जिन्यावरून येऊन आमच्या समोरून अधिकाऱ्यांच्या खोल्यांकडे गेले. मला हे पूर्णपणे अनपेक्षित होते.
बरोबरचा जवान सहज म्हणाला - “सर, ये आते रहते है, कुछ करना नही, नही तो काटते भी हैं कभी कभी।"
      मी सुन्नपणे लिफ्टमधून बाहेर पडलो. जनरल नरवणे यांच्या खोलीतील सुंदर गप्पांना उजळणी देत असताना ह्या 'माकडानेही' माझा पिच्छा मनातून सोडलेला नाही. साऊथ ब्लॉकसारख्या सर्वोच्च अधिकारी असलेल्या जागी अशी 'माकडे' सहज संचार करू  शकतात? त्याची आपल्यालाही सवय झाली आहे?!
      देशभरातच जणू  अशी 'अनेक माकडे' संचार करत आहेत. आर्थिकसामाजिकसुरक्षा-सीमा सर्वत्रच. त्यांचा जनरल नरवणे, त्यांचे हजारो - लाखो जवान, अधिकारी आपण सर्वच नागरिक कसा सामना करणार आहोत, हा प्रश्नच परतताना मनात राहिला.
ता.. -  कालच रात्री मनोज लष्कर प्रमुख झाल्याची वार्ता आली.

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे!
अभिनंदन -  अभिनंदनअभिनंदन!
                                         
 अजित कानिटकर१९७६ची तुकडी


Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem