“ती. ज्ञान प्रबोधिनीस”

चैत्राली वैद्य - काणे (1995 तुकडी)

इथे झळाळी कर्तृत्वाची 
सोन्याचे की काय मोल
पैलू पडता व्यक्तित्वाला
तेज हिऱ्याचे ठरते फोल।

सुजनांची ही मांदियाळी
सुविचारांचा वाहे झरा
तरुणाईचा उत्साह खळाळे      
त्यास दिशा देई तू किनारा।

तुझ्या अंगणी पडले जेव्हा      
पहिले पाऊल माझे गं
ओली माती अन् कुंभाराचे      
जुळले नाते कायमचे गं।

बालपणीचा काळ आठवे        
हात असा धरलास तू
कधीही न विरले घट्ट बंध हे     
आले गेले किती ऋतू।

गुरुजनांच्या छत्रछायेत मिळाला  
संस्कारांचा अमूल्य ठेवा
तू किती करांनी द्यावा         
अन् मी किती करांनी घ्यावा।

अजूनही जेव्हा डोळे मिटता    
ॐकाराचा घुमतो नाद
उपासनेची धीर गंभीरता अन्   
शुचिता भरुनी राहते मनात।

आजही मन कधी चिंतीत होता   
आठव तुझाच येतो
उजळणी करता आठवणींची      
मार्ग आपसूक दिसतो।

आज पुन्हा भेटीला आलो        
घेऊनी एक मागणे
नवचैतन्याने भरून जावे        
आणिक व्हावे ऋणात तुझिया राहणे।
सदैव ऋणात तुझिया राहणे ।।

चैत्राली वैद्य - काणे



Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem