की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

अमित रानडॆ (1999)
ज्ञान प्रबोधिनी... "अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते" - ईशावास्य उपनिषदांमधला ११ वा श्लोक हे बोधवाक्य असलेली एक प्रशाला... पुण्यामध्ये असलेल्या अनेक प्रशालांपैकी एक, ज्याचे वेगळेपण प्रशाले मध्ये प्रवेश घ्यायच्या आधी एका मंदिर रुपी इमारतीच्या रचनेने डोळ्यात भरते, नंतर कालांतराने त्या प्रशालेत प्रवेश मिळाल्यावर बाकीच्या गोष्टींमुळे त्याचे वेगळेपण अजून मनावर अधिराज्य गाजवते... प्रशालेत शिक्षण घेताना, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचे शिक्षण ह्या शाळेमध्ये मिळाले व ते पण कमी की काय... व्यक्तिमत्व विकास, अभिव्यक्ती च्या तासांना शिकलेल्या अनेक विषयांनी आयुष्याला पैलू पाडले. आज प्रशालेमध्ये शिक्षण घेऊन २० वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा दैनंदिन व्यवहार, नोकरी व व्यवसाय करताना प्रत्येक वेळेला मनात सुखात्मक जाणीव होते की ह्या सर्व गोष्टींचा पाया पक्का करून घेतला तो फक्त ज्ञान प्रबोधिनी प्रशालेनी.

ज्ञान प्रबोधिनी हे शालेय शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, अध्यात्मिक बैठक, व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यासोत्तर उपक्रम व अनेक व्यावहारिक गोष्टींचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचे ज्ञान मंदिर आहे. प्रशालेत येणारा विद्यार्थी हा एक उपासक असतो व त्याची उपासना सिद्धीस नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर लीलया पेलणारे गुरुजनरुपी ताई आणि दादा असतात.

प्रशालेच्या इमारती मध्ये आल्या आल्या उपासना मंदिर, त्यामध्ये लावलेली "ओम्" आणि अखंड हिंदुस्थानची प्रतिकृती, त्याखाली अधोरेखित केलेले "मातृभूमी हे दैवत येथे स्थापियले पुजियले" अशी पंक्ती... हे सर्व प्रत्यक्षात अनुभवताना मनामध्ये एक विचार दृढ होतो की आपल्याला आयुष्यात मातृभूमीची सेवा करायची संधी ह्याच ज्ञान मंदिरात मिळणार आहे.

प्रबोधिनी ही एक विचारधारा आहे... एक नीतिमत्ता आहे... एक  उपासना आहे... एक विशेषण आहे... एक व्यवस्था आहे... एक शास्त्र आहे... एक कला आहे आणि प्रबोधिनी ही सर्वसमावेशक संस्था आहे. प्रबोधिनी म्हणजेच एक संघटन आहे, एक संस्कृती आहे, एक संज्ञा आहे, एक प्रत्यक्षात उतरलेली संकल्पना आहे आणि मुख्य म्हणजे प्रबोधिनी हे सर्व युवती आणि युवक प्रबोधकांचे एक माहेर घर आहे.

प्रशालेनी अनेक कार्यकर्ते देशाला दिले, त्यातले काही जण आज भारतीय सैन्याचे अविभाज्य घटक असून उच्च आणि सर्वोच्च पदांवर कार्यरत आहेत, अनेक माजी विद्यार्थी आज एक उत्तम प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवत आहेत तर काही जण देश सेवेसाठी प्रशासक घडवत आहेत. उत्तमोत्तम अभियंते, वकील, सनदी लेखापाल, डॉक्टर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व अनेक उच्चपदस्थ व्यक्ती ह्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत जे आज भारत देशात व भारताबाहेर सुद्धा यशस्वीरीत्या आपल्या सेवा अर्पण करत आहेत.

आज मी जो कोणी आहे त्यामध्ये मोलाचा वाटा हा माझ्या आई वडिलांसोबत प्रबोधिनीचा व सर्व शिक्षकांचा आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. मी स्वतः काही लेखक नाही किंवा माझे लेखन कौशल्य व शैली फार काही उठावदार आहे अशातला काही भाग नाही... पण प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न सविनय अर्पण...

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने,
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने,
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे,
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतींचे...

--- अमित रानडे (१९९९)

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem