सुवर्ण यत्न सिंचन

प्रा. रागिणी नाईक 
समन्वयक, 
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
सन १९६९ चा एप्रिलचा महिना. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन शिक्षणतज्ज्ञांची समिती केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाळेस मान्यता देण्याच्यानिमित्ताने पाहणी करण्यास आली आहे. पाहणीचे सोपस्कार उरकले. समितीने अहवाल दिला....  "यांच्याकडे शाळेसाठी आवश्यक जागा नाही. अध्यापक नाहीत, शालेय सुविधा नाहीत, त्यासाठी आवश्यक निधी नाही, विद्यार्थीही नाहीत..... परंतु आहेत ध्येयवेडी माणसे, अभिनव कल्पना आणि दुर्दम्य आत्मविश्वास, ज्यावर या समितीचा विश्वास आहे व हा नावीन्यपूर्ण/रोचक असा शैक्षणिक प्रयोग सिद्ध झालेला पाहण्याचे औत्सुक्य आहे.....” ...आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या शून्यातून सुरू झालेल्या एका आगळ्या स्वप्नाची आज ५0 वर्षे पूर्ण होत आहेत.
    ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि.वि. पेंडसे एक द्रष्टे समाजव्रती शिक्षणतज्ज्ञ. स्वातंत्र्यपूर्व  काळात स्वातंत्र्यसाठीच्या लढ्यात अग्रणी राहून स्वातंत्र्यानंतर देशउभारणीच्या कार्याचे असिधाराव्रत आप्पांनी स्वत:हून स्वीकारलेले.  स्वतंत्र भारताच्या जलद प्रगतीसाठी बुद्धिमान, स्वयंस्फूर्त, समर्पणशील युवक-युवतींची गरज त्यांनी ऒळखली आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांना मूर्तरूप देणारा चारित्र्यसंपन्न नेतृत्वाच्या निर्मितीचा प्रयोग 'प्रबोधशाळा' या रूपाने सुरू झाला. पुण्यातील वेगवेगळ्या शाळांतील ८वीतील निवडक, बुद्धिमान मुलांना शालान्त परीक्षेत उत्तम यश मिळेल यासाठी मार्गदर्शन करायचे व त्याचवेळी त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीविषयी भान आणून द्यायचे असं त्याचं स्वरूप होते. या ‘निवडक’ प्रयोगाचे सकारात्मक फलित पाहून याप्रकारची पूर्णवेळ शाळाच का काढू नये, असा विचार झाला व ज्ञान प्रबोधिनीची पूर्णवेळ प्रशाला सुरू झाली. 
'अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतं अश्नुते' हे ज्ञान प्रबोधिनीचे ब्रीद. भारतीय परंपरेशी नाळ कायम राखून, पाश्चात्य संस्कृतीतील स्वीकारणीय ते सर्व घेत ही 'आधुनिकातील आधुनिक, सनातनातील सनातन' अशी कार्यपद्धती सर्वसमावेशकतेचा एक आदर्श घालून देताना दिसते. वेदवचनांच्या प्रकाशात राहूनही शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अंगीकार प्रबोधिनीत दिसून येतो. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या कामाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न!

प्रशालेचे उद्दिष्ट : 'सामाजिक विकासासाठी बुद्धिमत्तेचे विकसन' या उद्दिष्टाने ज्ञान प्रबोधिनी प्रशाला कार्यरत आहे. बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासास, मानसिक विकसनास,  बौद्धिक प्रगल्भतेस खतपाणी घालून त्यांच्यात सामाजिक जाणीवनिर्मिती करण्यासाठीचे, नेतृत्वगुण वाढीसाठीचे उपक्रम योजणे, जेणेकरून राष्ट्राचे हे मोलाचे संसाधन राष्ट्राच्या उन्नतीसाठी उपयोगी होईल या विचाराभोवती प्रशालेचे कार्य गुंफले आहे. 
संलग्नता व प्रवेशप्रक्रिया : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न, खाजगी, विनाअनुदानित माध्यमिक शाळा आहे. 
    प्रशालेचे उद्दिष्ट हे भारतापुढील विविध क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी श्रेष्ठ चारित्र्याचे व कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते हे आहे. या प्रकारच्या नेतृत्वाची गरज ही सर्वदा असणार आहे. राष्ट्राच्या उत्थानासाठी आवश्यक असे हे नेतृत्व घडायचे असेल तर त्याचे उगमस्थान म्हणजे देशातील कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या होत. या निसर्गदत्त देणगीला आवश्यक ते प्रशिक्षण देऊन साधनांची जोड देऊन आवश्यक गुण-कौशल्ये विकसित करून वरील उद्दिष्ट जलद गतीने गाठणे शक्य आहे. यासाठी  ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस विभागातर्फे विकसित केलेल्या प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे इ. ५ वी साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. ४० विद्यार्थी व ४० विद्यार्थीनी असलेले इ. ५ वी, ते १० वी पर्यंतचे १२ वर्ग अशी साधारणत: ४८० ची क्षमता असणारी प्रशाला गेल्या ५० वर्षांत ३५०० विद्यार्थ्यांवर शिक्षणातील निरनिराळे प्रयोग करीत आलेली आहे.

अभ्यासक्रम : देशप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चारित्र्यघडणीसाठी मनुष्यघडणीसाठी शिक्षण हे प्रशालेचे मूळ तत्त्वज्ञान. याच्या पूर्ततेसाठी केवळ पुस्तकी अभ्यासक्रम शिकवणे पुरेसे ठरणार नव्हते. त्यामुळेच सुरुवातीपासूनच शिक्षणातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची प्रयोग करणारी प्रयोगशाळा असेच प्रशालेचे स्वरूप राहिले आहे. 
सी.बी.एस.ई. बोर्डाच्या नियमानुसार इ. ९ वी, १० वी साठी आवश्यक अभ्यासक्रम येथे शिकवला जातो.
इ. ५वी ते ८वी या वर्गांमध्ये  अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य घेतले जाते. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांचा अंतर्भाव ८वी पर्यंतच्या अध्ययनात केला आहे. सर्व विषय हे विविध पुस्तकांचा वापर करून, संदर्भासाहित्य वापरून शिकवले जातात. केव्हाही उपलब्ध असणाऱ्या  मुक्तद्वार प्रयोगशाळा व ग्रंथालय हे प्रशालेचे अलंकार आहेत. इ. ५ वी, ते १० वी पर्यंत किंबहुना पुढेही आपल्याला पडलेल्या प्रश्नावर उत्तर शोधून काढण्यासाठी प्रयोग करून पाहण्याचे स्वातंत्र्य सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहे. इतिहास विषयाचे महत्त्व प्रशालेत थोडे जास्तच आहे. महाराष्ट्राचा, भारताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अध्यापकांनी स्वत: अभ्यासपूर्वक इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली आहेत व त्यांचा उपयोग दैनंदिन अध्ययनासाठी केला जातो. 
प्रशालेत शालेय विषयांच्या जोडीनेच स्वयंअध्ययन कौशल्ये, नेतृत्वगुण विकसन, प्रतिभाविकसन, संवाद-कौशल्य, जीवन-कौशल्य, प्रकल्प, वर्गोदिष्ट, संघटनकौशल्य, अभिव्यक्ती विकसन, शारीरिक क्षमता संवर्धन हाही अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग मानला आहे.  

अध्यापन पद्धती : प्रशालेची अध्यापन प्रक्रिया ही ठरावीक साच्यात बसवता येईल अशी कधीच नव्हती. अभ्यासक्रमाच्या  स्वातंत्र्यबरोबर कसे व कधी शिकावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अध्यापक व विद्यार्थी यांना दिलेले आहे. नेहमीच्या व्याख्यानपद्धतीबरोबरच प्रश्नोत्तरी, चित्रपट, दृकश्राव्य साधने, सादरीकरणे, संदर्भपुस्तके, सहाध्यायदिन, संस्थाभेटी, चर्चा, स्वयंअध्ययन इ. विविध प्रकारांचा वापर शिकण्या-शिकवण्यामध्ये होतो. मुलांना एखाद्या विषयाची उत्सुकता वाटली तर तो विषय सखोलपणे शिकणे हा त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचा भाग सहजपणे होऊ शकतो. प्रशालेत 'शिकावे कसे' ही समजण्याची प्रक्रिया ही माहितीचे हस्तांतरण करण्यापेक्षा नेहमी उजवी मानली जाते. १९७४ सालापासून प्रकल्प पद्धतीचा अंतर्भाव प्रशालेच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीमध्ये झाला. यासाठी दोन अध्यापिका त्यावेळी प्रकल्पातून अध्यापन कसे करावे, हे शिकण्यासाठी सहा महिने इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेऊन आल्या होत्या. प्रत्येकाने स्वत:स भावणारा विषय स्वत:हून सखोल समजावून घेऊन त्यामधील नवनिर्मिती करावी,  छोटे का होईना पण विषयाचे नवे आयाम शोधावेत, स्वत:च्या हाताने एखादी चलप्रतिकृती उभारावी, नव्या पद्धतीने एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे अशी आपली बुद्धी ‘कामी’ लावावी यासाठी प्रकल्पांचा निश्चित उपयोग होतो. या पद्धतीमध्येही खास प्रबोधनी तंत्राप्रमाणे अनेकानेक नव्या रचना बसल्या, प्रयोग झाले, प्रत्येक इयत्तेसाठी त्यांच्या क्षमतेनुसार करता येतील असे प्रकल्प प्रकार निश्चित करण्यात आले. इयत्ता पाचवीमध्ये संग्रहात्मक प्रकल्प, इयत्ता सहावीमध्ये माहिती कात्रणसंग्रह, इयत्ता सातवीमध्ये चलप्रतिकृती तयार करणे, इयत्ता आठवीमध्ये भाषिक नवनिर्मिती, इयत्ता नववीमध्ये शास्त्र, गणितामधील समस्या-निराकरण, कृती संशोधन प्रकारातील प्रकल्प तर इयत्ता दहावीमध्ये एखाद्या समस्येचा मुळाशी जाऊन तिची सद्यस्थिती समजून घेऊन तिचे भविष्य मांडणारे भविष्यवेध शास्त्रातील प्रकल्प अशी चढती भाजणी दिसते. हे प्रकल्प विद्यार्थी वर्षभर शक्यतो गटांमध्ये करत असतात. प्रकल्पाच्या निमित्ताने एखाद्या विषयाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती, संदर्भ शोधणे,  विषयांची संगतवार मांडणी करणे, त्यासाठी आवश्यक लेखी- मौखिक भाषिक कौशल्याचे विकसन, सादरीकरण कौशल्य, गटात काम करणे, प्रयोगशीलता, सर्जनशीलता, चिकाटी, स्वावलंबन, 'शिकावे कसे? ' हे शिकणे अशा अनेकानेक गुणांची वाढ विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसते.
एखाद्या गोष्टीची माहिती पुस्तकातून मिळविणे वा ऐकणे यापेक्षाही प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेणे यातील अध्ययन पातळीमध्ये निश्चित फरक असतो. अनुभव शिक्षणावर प्रशालेत भर आहे. प्रयोग करणे, प्रकल्प करणे याबरोबरच व्यक्तीभेटी, मुलाखती ,अभ्यास दौरे, ग्रामीण जीवन परिचय शिबिरे, विस्तार शिबिरे, श्रमकार्ये, एखाद्या संस्थेस, कारखान्यास, गावास प्रत्यक्ष भेट देऊन तेथे घडणाऱ्या प्रक्रिया समजावून घेण्यावर भर दिला जातो. वर्गासाठी एखाद्या उपक्रमाचे स्वतः नियोजन करणे, स्वयं अध्ययन कौशल्य शिकणे हे स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्यास शिकण्यासाठी उपयोगी ठरते.

सामाजिक जाणीव संवर्धन : समाजाभिमुख व्हायचे असल्यास आपल्या समाजबांधवांविषयी आस्था आणि आपुलकी वाटायला हवी. माझ्या भोवतालचा समाज कसा आहे, त्यास काय हवे आहे, मी या समाजाचा   भाग कसा आहे हे विद्यार्थ्यांना जाणवायला हवे. म्हणजे बुद्धी ही समाजकेंद्रीत होऊन, या राष्ट्राशी एकरूप होऊन त्याचे प्रश्न माझे प्रश्न आहेत असे लक्षात घेऊन, त्याच्या प्रगतीसाठी पुढाकार घेऊ शकेल.  यासाठी चाकोरीबद्ध शिक्षणाच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष समाजात मिसळण्याच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना दिल्या जातात. गणेशोत्सवातील बरची पथके, मेळे, श्रमकार्य, आपत्तीग्रस्त भागातील मदतकार्य, नागरी वस्त्यांमधील कामात सहभाग, ग्रामीण जीवन परिचय शिबीरे,  साखर शाळा आश्रमशाळा सारख्या उपक्रमातील सहभाग, विस्तार शिबिरे, सायकलसहली यामधून या समाजाचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या संधी व जे त्यांच्यापासून वंचित आहेत असा गट यांमधील दरी लक्षात घेतात. सर्वंकष विकासाच्या वाटेवर सर्वांनी मिळून जायचे असल्यास काय प्रकारचे काम करावे लागेल  याविषयी चर्चा करतात, व्याख्याने परिसंवाद ऐकतात, माहिती गोळा करतात. 'सर्वांच्या आनंदात माझा आनंद आहे' अशी वृत्ती वाढण्यास या उपक्रमांचा हातभार लागतो.

दैनंदिन क्रीडा दले : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत घटक म्हणजे  शारीरिक कौशल्ये. सुदृढ, सतेज असे शरीर तयार करून त्याचा साधन म्हणून अन्य विकासासाठी उपयोग केला पाहिजे. प्रशालेतील युवक-युवती विभागांतर्फे प्रशाला विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन सायंकालीन दले घेतली जातात. प्रशालेकडे स्वतःचे मैदान नसले तरी आसपासच्या मोकळ्या जागांचा उपयोग यासाठी केला जातो.  शारीरिक कौशल्यांबरोबरच संघाचा भाग होणे, संघाचा नेता म्हणून काम करण्यासदेखील विद्यार्थी शिकतात. पद्ये, वैचारिके, पथकश: दले, पथकश: सामने, बरची सराव, क्रीडाशिबिरे, प्रात्यक्षिके, विक्री उपक्रम, गिरीभ्रमण सहली, शिबिरे अशा विविधांगी उपक्रमांमधून दलांवर शारीरिक कौशल्यांबरोबरच संघटनात्मक व  व्यक्तिमत्व विकसन अशी ही विद्यार्थीघडणीची साखळी अखंड चालू राहते.

प्रार्थना-उपासना-संस्कार-कार्यक्रम : प्राचीन भारतीय शिक्षण परंपरा आधुनिक काळास अनुरूप करून पुढे चालू ठेवण्यासाठी प्रशालेत विविध संस्कार-कार्यक्रमांचा समावेश केला आहे. वैदिक काळापासून अध्ययन -अध्यापनाची जी हिंदू परंपरा चालत आली आहे, त्यातील वर्षारंभ, वर्षांत व विद्याव्रत संस्कार या उपक्रमांचे अनुसरण प्रबोधिनीत केले आहे. नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात होताना केली जाणारी वर्षारंभ उपासना ही वर्षभराच्या कामात माझ्या व्यक्तिमत्त्वात मी/आम्ही काय भर घालू इच्छितो, अशी संकल्प पूर्वक केली जाते व वर्षांत म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी केली जाणारी ही उपासना केलेल्या संकल्पांची पूर्ती किती झाली हे पाहण्यासाठी वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी वाङ्मयात उद्धृत केलेल्या सुवचनांच्या आधारे केली जात.  याशिवाय प्रशालेची संपूर्ण शिक्षणप्रक्रिया ज्याच्याभोवती गुंफलेली आहे, जिचे प्रशालेत अनन्यसाधारण महत्त्व येते आहे, ती म्हणजे विद्याव्रत उपासना. इयत्ता आठवीमध्ये 'विद्येचे व्रत' घेण्याची ही उपासना प्रत्येक विद्यार्थ्यास आयुष्यभराचा ठेवा देऊन जाते. विद्याव्रताच्या निमित्ताने व्यक्तिमत्त्व विकासाची संकल्पना स्पष्ट करणारी व्याख्याने, गटचर्चा ,स्वाध्याय ,शिबिरे आयोजिली जातात. या विविध मार्गांनी विद्यार्थी विद्याव्रताचे महत्त्व समजावून घेतात. स्वतःच्या वागण्यासंबंधी, शिक्षणासंबंधी आणि आयुष्यासंबंधी काही संकल्प करतात. युक्ताहार विहार, इंद्रिय संयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय-प्रवचन, सद्गुरूसेवा, राष्ट्रअर्चना याविषयी संकल्प करून सामूहिकरित्या या संकल्पांचे उच्चारण करून त्यांचे स्मरण राहण्यासाठी व्रतचिह्न घेतात. भावनाकोशाची समृद्धी करून संकल्पशक्तीच्या वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
दर शनिवारी सामूहिक उपासना केली जाते. एकात्मता मंत्र, शिवमंत्र, विरजा मंत्र, गायत्री मंत्र यांचा समावेश उपासनेमध्ये असतो. एका ठिकाणी बसून एकाग्रचित्ताने स्वतःच्या दिवसाचा आढावा व  नियोजन, संकल्प चिंतन असे स्वगतचिंतन करून स्वतःची उत्स्फूर्तीसंपन्नता वाढवण्याचा अनुभव यातून विद्यार्थ्यांना दिला जातो. दैनंदिन प्रार्थनेतही उत्तम संगीताच्या आधारे संतवचने, गीता गीताई,  स्फूर्तीदायक पद्ये यांचे सामूहिक गायन नवी ऊर्जा देणारे ठरते.

उल्लेखनीय उपक्रम
अग्रणी योजना: अाप्पा पेंडसे स्वतः एक मानसतज्ज्ञ होते. त्यांनी स्वतः 'नेतृत्वशैली-नेतृत्व विकसन' या विषयातील विद्यावाचस्पती पदवी मिळविली होती. अशा अभ्यासपूर्ण निष्कर्षातून देशाचे रूप पालटण्यासाठी आवश्यक नेतृत्व निर्माण प्रशालेची उभारणी झाली आहे. त्यामुळे प्रशालेमध्ये नेतृत्वासाठी आवश्यक गुणांची जोपासना करण्यासाठी 'अग्रणी योजना' राबवली जाते. नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुणकौशल्ये; जसे कल्पकता, समस्यापरिहार, निर्णयकौशल्य, नियोजन, संवादकौशल्य, वक्तृत्व, गटबांधणी, गटकार्य इत्यादी नेतृत्वगुणांची पायाभरणी होण्यासाठी इयत्ता सातवी ते दहावीसाठी तासिकांची योजना असते. त्याबरोबर इयत्ता दहावीमध्ये या कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी देणारे असे उपक्रम वर्षभर चालू असतात. दररोज एखादा गट हाताळणे, स्वतः अभ्यास करून एखाद्या गटास काही प्रशिक्षण देणे किंवा एखादा कार्यक्रम नियोजन करून स्वतः घडवून आणणे अशा प्रकारच्या उपक्रमांचा यात समावेश होतो. यातून आपले म्हणणे/विचार समोरच्या व्यक्तीस समजतील अशा भाषेत पोहोचवणे, त्यासाठी आवश्यक कृती करवून घेणे, संवाद साधणे, नियोजनपूर्वक काम करणे, निर्णय घेणे, अडचणी आल्यास त्या सोडवणे व हे सर्व एक गट म्हणून पार पाडणे याचा अंतर्भाव होतो. एखादे उद्दिष्ट मनात धरून त्यासाठी पुढाकार घेऊन, गट जमवून,त्यांना आपल्या कामाचे महत्त्व पटवून, काम करून घेण्याची क्षमता या निमित्तानं वाढवण्याचा हा प्रयत्न असतो.

अभिव्यक्ती विकसन :बुद्धीच्या बरोबरीनेच मनुष्याच्या भावनांचा परिपोष महत्त्वाचा आहे.  कलांचा भावनाकोश विकसनामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. प्रशालेमध्ये प्रत्येक व्यक्तीस किमान एकतरी कला समजली पाहिजे व ती आत्मसात केली पाहिजे यावर भर आहे.  पाचवीसाठी मध्ये मुलांना नृत्य, नाट्य, गायन, पेटी, तबला, चित्रकला,शिल्पकला लेखन व वक्तृत्व या कलांची तोंडओळख होते व इयत्ता सातवी ते दहावीत यातील एखादी कला निवडून त्यावर विद्यार्थी अधिक मेहनत घेतात. स्वतःचे विचार मांडण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी बुद्धिमान विद्यार्थ्यांना यांची खचितच आवश्यकता असते.

विशेष उद्दिष्ट गट : देशप्रश्न  सोडवणुकीसाठी देशाच्या पुढील प्रश्नांची माहिती होणे गरजेचे आहे. त्यावर काम होत असल्यास ते पाहणे व त्यावर  परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा प्रत्यक्ष काम करणाऱ्या बरोबर अनुभव घेणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ही काम करणे हे समस्येचा आवाका येण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उद्दिष्ट गटांची योजना केली आहे. देशासमोरील विविध आव्हानात्मक प्रश्नांपैकी जो प्रश्न विद्यार्थ्याला भिडेल त्या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते.  या तज्ज्ञ व्यक्ती स्वतः अशा प्रश्नांवर काम करीत असल्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष काय करावे लागते हे विद्यार्थी पाहू शकतात. या मार्गदर्शकांबरोबर स्थळभेटी, व्याख्याने, क्षेत्रकार्य, गटचर्चा, अभ्यासपूर्ण मांडणी करणे व भविष्यवेध शास्त्राच्या आधारे त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी करावयाच्या उपाययोजना कशा असाव्यात इथपर्यंतचा अभ्यास विद्यार्थी करू शकतात. याचा परिणाम पुढे त्यांना स्वतःचे कार्यक्षेत्र निवडण्यासाठी होतो आहे, असेही अनुभवास येत आहे.

विशेष अभिरुची गट : शालेय अभ्यासक्रम व अन्य पूरक कौशल्यांबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य विषयांमध्येही विशेष आवड असते असे लक्षात आले.   मात्र या प्रत्येक विषयाचा दैनंदिन अध्यापनामध्ये समावेश करणे अवघड आहे. त्यासाठी विशेष अभिरुची गटांची निर्मिती झाली. किमान दहा विद्यार्थ्यांच्या गटाने एखादा विषय समजून घेण्याची उत्सुकता दाखवल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेशिवायच्या वेळातही मार्गदर्शनाची सोय प्रशालेमध्ये केली जाते. आज विद्यार्थी या माध्यमातून विविध परदेशी भाषा, संगणक प्रोग्रामिंग, नाट्य, चित्रकला, अभियांत्रिकी कौशल्य, इतिहास,  बुद्धिबळ अशा विविध आवडीच्या विषयांचे पाठ्यक्रमापलिकडे जाऊन अध्ययन करत आहेत.

अधिमित्रत्व : उत्तम पाठ्यक्रम, उत्तम अध्यापन, अन्य आवश्यक कौशल्य शिकवण्याची सुयोग्य व्यवस्था उपलब्ध करून देऊन व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया सुरू होते. यांच्याबरोबरच या व्यावहारिक जगात यशस्वी होण्यासाठी उत्तम मनुष्य म्हणून घडण्यासाठी मित्र- सुहृद- मार्गदर्शक म्हणून ध्येयनिष्ठ अध्यापकांचा हातभार हा उपयुक्त ठरतो याची अनेक उदाहरणे आपणास ऐतिहासिक काळापासून दिसतात. प्रशालेच्या सहा वर्षांच्या प्रवासात व त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या बरोबर राहून, त्यांना सर्व बाजूंनी समजावून घेण्याचा प्रयत्न करीत, प्रत्येकाच्या गुण-कमतरता समजावून घेऊन ममत्वाने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्या-त्या वर्गाचे अधमित्र घेत असतात.सहा वर्षे दररोज वर्गातील संवाद, अनौपचारिक संवाद, सहली-सहाध्यायदिन,व्याख्याने, उपक्रम या सगळ्यांत अधिमित्र आपापल्या वर्गाच्या बरोबरीने सहभागी होऊन, विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ  व व्यक्तिनिष्ठ अशा दोन्ही प्रकारची निरीक्षणे नोंदवून ,त्याआधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन व मदत करत असतात. या अनौपचारिक संवाद/संपर्कामुळे मुले व अधिमित्र यांचे आयुष्यभरासाठीचे घट्ट नाते निर्माण होते.

विक्री कौशल्य : नेतृत्व विकासनइतकेच महत्त्व उद्योजकता विकास करण्यास दिले जाते. शैक्षणिक प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे विद्यार्थी घरोघरी जाऊन राख्या, आकाशकंदील ,पणत्या, तिळगूळ, छात्र प्रबोधनचे दिवाळी अंक, दिवाळीचे साहित्य इत्यादी वस्तूंची विक्री करतात. काही वेळा स्वतः तात्पुरती  दुकाने उभारून ती सांभाळतात. काहीवेळा वस्तूंचे उत्पादन, भांडवल उभारणीही करतात. आपल्या वस्तूबद्दल अनोळखी लोकांशी बोलताना संवाद कौशल्य व आत्मविश्वास वाढतो . उद्योजक होण्याची प्रेरणा लहान वयातच या उपक्रमाद्वारे देण्याचा हा प्रयत्न असतो. प्रशालेतून बाहेर पडून स्वत:चे उद्योग सुरू केलेल्यांचे प्रमाण जवळपास ५०% इतके आहे.

प्रभुत्व अध्ययन अथवा स्तर पद्धती  : पाठ्यपुस्तकी अभ्यास शिकवताना विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार करण्याची गरज असते. काही विद्यार्थी काही विषयांमध्ये प्रवीण असतात तर काहींना तेच विषय शिकण्यासाठी जास्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते.  प्रशालेत इयत्ता पाचवीत इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमातून मुले येत असल्यामुळे ही बाब विशेषत्वाने जाणवते. त्यामुळे इंग्रजी व गणित या दोन विषयांसाठी प्रभुत्व अध्ययनाचा प्रयोग चालू आहे. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी वरील दोन्ही विषय स्वतःच्या क्षमतेनुसार, ते जेथे आहेत तेथून  शिकण्यास सुरुवात करतात म्हणजे या इयत्तांमध्ये अपेक्षित अभ्यासक्रम आठ वेगवेगळ्या स्तरांत विभागला आहे. वेगवेगळ्या स्तराच्या चाचण्या देऊन ज्या स्तरातील अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शनाची विद्यार्थ्यास गरज पडते त्या स्तरात, मग तो विद्यार्थी पाचवीचा असो अथवा सातवी-आठवीचा, शिकायला सुरुवात करतो.  या विषयांचे इयत्ताश: वर्ग न भरता स्तराप्रमाणे संमिश्र वर्ग भरतात. यामुळे जो विद्यार्थी त्याच्या इयत्तेपेक्षा पुढचे शिकू शकतो त्यास अधिक वरचे शिकण्याचे प्रोत्साहन मिळते व ज्याला आधीचे ज्ञान मिळवण्याची गरज आहे त्याला त्याचे मार्गदर्शन मिळू शकते.अध्यापन करतानाही साधारणत: एकसारख्या क्षमता असणारी मुले एकत्र आल्याने अध्यापकांना शिकवण्याची, सरावाची योजना करणे सोपे जाते. ठराविक स्तरातील आशय/कौशल्यांवर निश्चित केलेल्या प्रभुत्वाची पातळी गाठल्यास विद्यार्थी भराभर वरच्या स्तरात सरकू शकतात. एकूणातच अभ्यासाची गोडी व गती वाढून सर्वजण किमान काही स्तर गाठू शकतील असा हा शिक्षणाचा प्रयोग आहे.

बुद्धिगुण विकास योजना : महाराष्ट्र शासनाची इयत्ता आठवी (पूर्वीची सातवी)  शिष्यवृत्ती परीक्षा प्रशालेचे विद्यार्थी देत. मात्र त्यास पात्र ठरूनही केवळ बोर्ड वेगळे असल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसे. त्यामुळे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी प्रशालेने इयत्ता सातवी वर्गासाठी प्रशालेतर्फे शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. यामध्ये  मानसतज्ज्ञ जे. पी. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रारूपावर आधारित विविध आशय,प्रक्रिया व निष्पत्ती यांवर आधारित बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणार्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या कौशल्यांमध्ये उत्तमता गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. 

स्वयंअध्ययन कौशल्ये : विद्यार्थी जीवनात परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी केवळ घोकंपट्टी करता कामा नये तर विषय पूर्ण समजून घेऊन आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यास करताना उत्तम कामगिरी करण्यासाठी पुस्तकी अध्यापनाबरोबरच स्वयंअध्ययन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यात निरीक्षण, वाचन,टिपणे काढणे, सारशब्द शोधणे, लेखन कौशल्य, विस्तार/संक्षेप करणे, परस्पर संबंध जोडणे, इत्यादी कौशल्ये शिकवली जातात.  एकदा पाठय़पुस्तकी अभ्यासासाठी या कौशल्यांवर जम बसला की प्रशालेच्या विद्यार्थ्यांना पुढेही स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवताना या माहितीस्फोटाच्या युगात माहितीचा भडिमार होत असताना योग्य प्रकारे कोणताही विषय स्वतः अभ्यासण्याची सवय लागलेली दिसते.

माजी विद्यार्थी सहभाग :'आपण एकदा प्रबोधिनीचा भाग झालो की हे नाते आयुष्यभराचे होते'. माजी विद्यार्थ्यांच्याबाबतीत ही बाब शब्दश: खरी ठरते. दहावीतून बाहेर पडल्यानंतर प्रशालेच्या दैनंदिन दलांची जबाबदारी हे महाविद्यालयीन विद्यार्थी घेत असतात. प्रशालेत नियुक्त क्रीडा प्रशिक्षक नाहीत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकसनाची जबाबदारी हे युवक-युवती घेतात. प्रशालेतील अध्यापन प्रक्रियेतही माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. दैनंदिन अध्यापनापासून प्रशालेतील विद्यार्थ्यांना मृदु कौशल्ये, करिअर निवड, प्रकल्प, स्पर्धा इत्यादी अन्य विषयांमध्येही ते मार्गदर्शन करीत असतात. प्रबोधनीचे अनेक विभाग हे माजी विद्यार्थी सांभाळत आहेत. माजी विद्यार्थ्यांची ही साखळी, प्रबोधिनीवरचे त्यांचे अतूट प्रेम ही प्रबोधनीची जमेची बाजू व  खास वैशिष्ट्य आहे.

प्रशालेच्या उपक्रमांना शब्दबद्ध करणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण ही एक अतिशय गतिशील प्रक्रिया आहे. बाह्यत: सातत्याने बदलणारी मात्र आतमध्ये मूळ तत्त्वज्ञान घट्ट रुजलेली अशी ही त्रिवेणी शिक्षणप्रणाली स्वतः सिद्ध करून अन्य प्रशालांमध्ये, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेरही रुजत आहे. पन्नास वर्षांपूर्वी आप्पांनी पाहिलेले एक मनस्वी स्वप्न त्यांनीच घालून दिलेल्या उत्तमता, प्रयोगशीलता, कल्पकतेच्या वाटेवरून मोठे होत अनेकांची वृत्तीघडण करत आहे.... त्यांच्यातील प्रेरणा जागृत करत आहे. प्रबोधिनीची 'एकाच छताखाली अनेक उपक्रम' या पद्धतीने चालणारी कार्यपद्धती हे प्रशालेय विद्यार्थ्यांसाठी अधिवासितेचे (internship)  खुले, सुपीक मैदानच आहे. व्यक्तिमत्व विकसन, सामाजिक जाणीव, राष्ट्रअर्चना अशा अनेक गोष्टी समजून घेत असताना त्याप्रमाणे आचरण करणार्या व्यक्तीही विद्यार्थी सहज पाहतात, त्यांच्या कामात सहभागी होतात, हे अनुभवशिक्षण - सहवासातून शिक्षण त्यांना आयुष्याची दिशा देण्याचे काम करते. प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी आज प्रबोधिनीच्या कार्याचा विस्तार करत आहेत, नवे विभाग उभारत आहेत, चालू विभागात जबाबदाऱ्या घेत आहेत.. ही एक न थांबणारी प्रक्रिया असणार आहे. अन्य विद्यार्थी प्रबोधिनीबाहेर आपापल्या ठिकाणी दिशादर्शक, अभिमानास्पद अशी कामगिरी करताना दिसत आहेत.   

सतत नावीन्याचा ध्यास हा   प्रबोधिनीचा आत्मा आहे. कालच्यापेक्षा आज पुढे गेले पाहिजे,  दररोज नवीन काहीतरी सुचले पाहिजे असा सळसळत्या उत्साहाचा झरा बनून राहण्याचा भाव इथे दिसून येतो. आजवर झालेले प्रयोग, त्यातून मिळालेले संचित, त्यावर आधारित पण अधिक उत्तम अशा नव्या सोपानांची चढण नेहमीच खुणावत राहणार आहे. आणि आणखी पन्नास वर्षांनीही हा प्रयोग 'एक अभिनव शैक्षणिक प्रयोग' हे बिरुद अभिमानाने मिरवीत असेल
साभार शब्दोत्सव दिवाळी अंक २०१९

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem